पूजा मंडपात आकांत ४० हून अधिक जखमी चपलांचा खच
Kolkata Durga Puja Stampede Kills 19 – (40-injured-in-west-bengal) कोलकाता : येथील चोरबागानमधील दुर्गा मंडपात उसळलेल्या भाविकांच्या गर्दीत मुसळधार पावसामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 19 जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी मृतांच्या आकड्याला दुजोरा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपये तर जखमींना ५० हजारांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आणि जखमींचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकांनी मंडपाकडे धाव घेतली आणि त्यामुळे चेंगराचेंगरी सुरू झाली, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
शनिवारी सायंकाळी ७:४० च्या सुमारास, पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील गिरीश पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शारदा पार्क (चोरबागान) पूजा मंडपाच्या बाहेरच्या प्रवेशद्वारावर ही चेंगराचेंगरी झाली. मुसळधार पावसात मंडपाजवळ मोठी गर्दी जमल्याने ही घटना घडली. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे पुतणे देवदीप अधिकारी हे देखील या पूजेत सहभागी आहेत. जोरासांकोचे भाजप आमदार विजय ओझा हे पूजा समितीचे अध्यक्ष आहेत. उत्तर कोलकाता जिल्हा भाजप अध्यक्ष तमोगन घोष हे देखील या कार्यक्रमात सहभागी आहेत. या दुर्घटनेचे वृत्त समजताच जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल झाले.
रुग्णालयाच्या सूत्रांनुसार, ४० ते ५० जणांना वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांसोबत मुख्य सचिव मनोज अग्रवाल यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. आरोग्य मंत्री सरदवत मुखर्जी आणि वरिष्ठ अधिकारीही तातडीने रुग्णालयात पोहोचले. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात करण्यात आले आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले दु:ख
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘चोरबागन’ पूजामंडपातील या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या, ‘चोरबागन पूजामंडपात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे मला मोठा धक्का बसला असून, खूप दु:ख झाले आहे. मी माँ दुर्गेकडे प्रार्थना करते की, सर्व जखमी लवकर बरे व्हावेत आणि या कठीण काळात त्यांच्या कुटुंबीयांना धैर्य व शक्ती मिळावी.’
जखमींना दुचाकीवरून नेले रुग्णालयात
चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या अनेकांना स्थानिकांनी मोटरसायकल आणि अन्य साधनांनी नेऊन रुग्णालयात दाखल केले. काही प्रत्यक्षदर्शींच्या मते पावसापासून वाचण्यासाठी मंडपात घुसलेल्या लोकांचा रेटा वाढल्याने लाकडी स्टेज आणि भोवतालची संरचना तुटल्याने हा अपघात झाला. चेंगराचेंगरीनंतर अनेकजण जमिनीवर बेशुद्ध पडले आणि लोक त्यांना मदत करण्यासाठी धावले.
चोरबागान पूजेचे वैशिष्ट्य
चोरबागान दुर्गा पूजा पंडाल यंदा त्याच्या अनोख्या ‘बियॉन्ड साऊंड’ संकल्पनेमुळे चर्चेत आहे. यावर्षी पंडालने आपला ९१ वा वर्धापनदिनही साजरा केला. दैनंदिन जीवनातील गोंगाटापासून दूर जाऊन आंतरिक शांतीचा अनुभव घेणे आणि शांततेद्वारे देवी दुर्गेशी एकरूप होणे याचा अनुभव भाविकांना यावा, अशी मंडपाची रचना करण्यात आली होती.
Read About : Dongarale Murder Case – साडेचार वर्षांच्या बालिकेवरील अत्याचार-हत्या प्रकरणात आरोपीला मृत्युदंड
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.