Ad Advertisement Ad Advertisement

Bihar Liquor – बिहारमध्ये दारूबंदी, तरी दारूची वाहतूक? ट्रक उलटताच सत्य समोर – 2026

बिहारमधील खरहट टोल प्लाझाजवळ अपघात; रस्त्यावर विखुरलेल्या बाटल्या घेण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड

अररिया (बिहार) : Bihar Liquor बिहारमध्ये गेल्या एक दशकापासून पूर्ण दारूबंदी लागू असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला, तरी या कायद्याचे वास्तव एका रस्ते अपघातामुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. अररिया जिल्ह्यातील खरहट येथील टोल प्लाझाजवळ दारूची बेकायदेशीर वाहतूक करणारा एक भरधाव ट्रक उलटला. मात्र, अपघात घडताच ट्रकमध्ये लपवून ठेवलेला दारूचा साठा उघड झाला. हा साठा लुटण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी एकच झुंबड उडवली.

महिला आणि मुलांची दारू लुटण्यासाठी पळापळ

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रकमधून दारूच्या शेकडो बाटल्या रस्त्यावर आणि बाजूच्या खड्ड्यात पसरल्या. ही माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच काही मिनिटांतच आजूबाजूच्या गावातील शेकडो लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. धक्कादायक बाब म्हणजे, यामध्ये केवळ मद्यधुंद तरुणच नव्हे, तर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलेही हातात पिशव्या, डबे आणि पोती घेऊन दारूच्या बाटल्या गोळा करताना दिसले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, त्यात लोक मिळेल ती बाटली घेऊन पळताना दिसत आहेत.

पोलीस ठरले हतबल

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हातातील लाठ्या उगारून गर्दीला पांगवण्याचा आणि दारूची लूट थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, लोकांची संख्या इतकी प्रचंड होती की त्यांच्यासमोर पोलीस प्रशासन पूर्णपणे हतबल आणि असहाय्य ठरल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांच्या डोळ्यादेखत लोक दारू घेऊन पसार होत होते.

सरकारच्या दारूबंदीवर प्रश्नचिन्ह

बिहारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारने एप्रिल २०१६ पासून दारूचे उत्पादन, विक्री, वाहतूक आणि सेवनावर पूर्णपणे कायदेशीर बंदी घातली. असे असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी कशी होत होती? टोल प्लाझापर्यंत हा ट्रक सुरक्षित कसा पोहोचला? असे अनेक गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. पोलिसांनी सध्या हा ट्रक जप्त केला असून, दारू तस्करांचा शोध घेण्यासाठी कसून तपास सुरू केला आहे.

Read About : Rajkot Fake Currency – इन्स्टाग्राम रील पाहून भाजी विक्रेत्याने छापल्या बनावट नोटा; राजकोट पोलिसांची मोठी कारवाई
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.