Ancestor Worship Around the World : भारताप्रमाणेच इतर देशांमध्येही पितरपूजेची परंपरा अस्तित्वात आहे.
पश्चिम आफ्रिकेतील घाना या देशामधील वोडून या धर्मामध्ये पितरांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी ‘वुडू’ या सणादरम्यान आपल्या मृत पूर्वजांचा आत्मा आपल्या नातलगांच्या सहवासात राहतो, अशी वोडून धर्माच्या अनुयायांची श्रद्धा आहे. या सणाच्या प्रसंगी चेहरा झाकणाऱ्या पेहेरावात नृत्य करणाऱ्या ‘इगुनगुन’ या नावाने प्रचलित नर्तकाच्या शरीरात जिवंत आत्मा संचार करतो अशी समजूत या लोकांमध्ये प्रचलित आहे.
मेक्सिकोमधील Día de Los Muertos या नावाने एका सर्वात प्रसिद्ध सणाचा हेतू पूर्वजांप्रती सन्मान दर्शविणे हा आहे. ‘मृतांचा दिवस’ शब्दाने या सणाला संबोधले जाते. यावेळी दिल्या जाणाऱ्या वस्तूंमुळे मृतात्म्यांना त्यांच्या नंतरच्या जीवनात मदत होत असते असा विश्वास प्राचीन मेक्सिको आणि स्पॅनिश कॅथॉलिक परंपरेमध्ये रूढ आहे.
चीनमधील लोकसंस्कृतीमध्ये मृत पूर्वजांविषयी आदर व्यक्त करण्याकरिता ‘शी’ या नावाने प्रचलित एक समारंभ आहे. ‘शी’ या शब्दाचा शब्दश: अर्थ प्रेत असा होतो. प्रेतयात्रा किंवा पूर्वजपूजेच्या प्रसंगी मृताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला पूर्वजाचा प्रतिकात्मक पोषाख धारण करून मृत पूर्वजाचा अभिनय करावा लागतो. मृत पूर्वजाचे नातेवाईक अशा प्रातिनिधिक व्यक्तीला या सणाच्या विधीप्रसंगी त्याला आवडणारे अन्न तसेच पेय प्रदान करतात. मोठ्या प्रमाणात आयोजित केलेल्या ‘शी’ समारंभाचे स्वरूप एक प्रकारच्या कौटुंबिक पुनर्मीलनासारखे असते.
कंबोडिया हा एक बौद्ध धर्मीय देश आहे. पूर्वजांच्या सन्मानाप्रीत्यर्थ या देशात बौद्धांचा ‘हॉलिडे ऑफ प्चुम बेन’ या नावाने एक अतिशय महत्त्वाचा वार्षिक समारंभ प्रचलित आहे. या समारंभात मृत पूर्वजांच्या उपासनेचे विधी पार पडतात. ‘प्चुम बेन’ या नावाने प्रचलित या विधींमध्ये मागील सात पिढ्यांमधील नातलग आणि पूर्वजांची आठवण अतिशय आदराने केली जाते. दरवर्षी साधारणपणे पंधरा दिवस चालणाऱ्या या विधीमध्ये पूर्वजपूजेच्या ठिकाणी नैवेद्य अर्पण करण्याकरिता कुटुंबातील सदस्य एकत्र येतात. प्रत्येक परिवाराकडून प्रामुख्याने शिजविलेला भात नैवेद्य म्हणून बौद्ध भिख्खुंना अर्पण करण्यात येतो.
हा नैवेद्य बौद्ध भिख्खुंच्या द्वारे आत्म्याच्या विश्वातील पूर्वजांना प्राप्त होतो, अशी तेथील बौद्ध धर्मानुयायांची श्रद्धा आहे. जपानमध्ये बौद्ध धर्म आणि शिंतो धर्म या दोन्ही धर्माचे अनुयायी आहेत. शिंतो धर्मामध्ये ‘कामी’ या शब्दाने संबोधली जाणारी असंख्य दैवते किंवा पवित्र आत्मे आहेत. पृथ्वीवरील प्रत्येक घटकांचा या ‘कामी’चा संबंध असतो, अशी येथील लोकांची धारणा आहे. शिंतो धर्मानुसार पूर्वजांना ‘कामी’ या दैवतांच्या श्रेणीमध्ये गणले जाते. त्यांच्याकडून अपेक्षित परिणाम प्राप्त होण्याकरिता शिंतो पूजास्थानांमध्ये अनेक देणग्या आणि वस्तू अर्पण केल्या जातात.
प्राचीन फिलीप्पिनो धर्मात आत्म्यांना ‘अनितो’ या शब्दाने संबोधले जात असून त्यांचा विश्वातील प्रत्येक भागात संचार असतो, अशी तेथील लोकांची समजूत आहे. ‘अनितो’ हे मृत पूर्वजांचे आत्मे असून त्यांचा सर्व जीवसृष्टीवर तसेच त्यांच्या घडामोडीवर प्रभाव असतो, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. येथील ‘पॅगानितो’ समारंभाचे स्वरूप एक प्रकारच्या आत्म्याच्या बैठकीसारखे असते. पारंपरिक पुरोहित आपल्याद्वारे ‘अनितो’आत्म्यांशी संबंधितांचा संपर्क करवितो अशी येथील लोकांची धारणा आहे.
उत्तर आणि दक्षिण कोरिया या दोन्ही भागांत ‘चुसिऑक हॉलिडे’ या नावाने प्रचलित उत्सव साजरा होतो. अमेरिकेतील आभारप्रदर्शनाच्या सुट्यांसारखा हा उत्सव असून पिकांच्या स्वागताप्रीत्यर्थ तसेच शरद ऋतूच्या प्रचुरतेसाठी तो साजरा केला जातो. भरपूर पिकांच्या प्राप्तीमागे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद कारणीभूत आहे, या भावनेने बरेचदा पितरपूजा म्हणूनही तो साजरा केला जातो. यावेळी केल्या जाणाऱ्या विधीला ‘चार्वे’ या शब्दाने संबोधले जाते. आपल्या मृत पूर्वजांना अर्पण करण्यासाठी विविध प्रकारची पक्वान्ने आणि सुगंधी द्रव्ये यावेळी सादर केली जातात. पूर्वजांच्या गुहांना अनेक परिवार भेटी देतात आणि त्या स्वच्छ करण्यासाठी हातभार लावतात. हिवाळ्याच्या प्रारंभीच्या दिवसाला वेल्समध्ये कालन गाईफ या शब्दाने संबोधले जाते.
सर्व जीवितांमध्ये या दिवशी त्यांच्या पूर्वजांचे आत्मे वावरत असतात, अशी तेथील लोकांची धारणा आहे. अशावेळी चर्चच्या परिसरात जाणे वेल्समधील लोक टाळतात. त्या ठिकाणी अशा मृत पूर्वजांच्या भटकणाऱ्या आत्म्यांना फाशी दिली जाते, अशी तेथील लोकांची समजूत आहे. पूर्वजांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि दुष्ट आम्यांच्या प्रभावापासून स्वत:ला सुरक्षित ठेवणे हा या उत्सवाचा हेतू आहे. त्यासाठी पर्वताच्या कातळावर अग्नीच्या सान्निध्यात आपले नाव लिहिण्याची परंपरा वेल्समध्ये प्रचलित आहे. अशा उत्सवाच्या प्रसंगी पूर्वजांचे आत्मे पृथ्वीवर येऊन आपल्या वंशजांमध्ये वावरतात अशी समजूत बहुतांश देशांमधील संस्कृतीमध्ये आहे. परंतु, प्रत्यक्षात ते खरे असण्याची शक्यता नाही, हे मात्र खरे.
मेक्सिकोतील आस्तेक लोक अधोलोकातील आपल्या पूर्वजांची आराधना करीत असत. परंतु, जीवित व्यक्ती आणि मृत पूर्वज यांच्यामध्ये त्यांनी सीमारेखा आखली होती. उत्तर अमेरिकेच्या पठारी प्रदेशातील ब्लॅकफूट नावाच्या जमातीमध्ये प्रचलित भूतकथा या मृत आणि जीवित व्यक्तींच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या आहेत. धावणारा ससा हा आपला पूर्वज आहे, अशी तेथील लोकांची धारणा आहे.
दक्षिण अमेरिकेच्या कुना जमातीमध्ये आजार, दुर्दैव, मृत्यू यांसारख्या आपत्तींमध्ये त्यांच्या पूर्वजांचे आत्मे मदतीला येतात अशी समजूत आहे, त्यामुळे मृत पूर्वजांना विविध प्रकारच्या भेटवस्तू व अन्न अर्पण करण्याची प्रथा तेथे आहे. इंडोनेशियाच्या सागरी भागात वसलेल्या इबान जमातीमध्ये पूर्वज हे आपले गुप्त मदतगार असतात अशी समजूत रूढ आहे. उत्तर अमेरिकेच्या ग्रानचाकॉ प्रदेशातील लेन्ग्वा जमातीमध्ये प्रचलित समजुतीनुसार आपल्या दैनंदिन जीवनात मृत पूर्वजांचे आत्मे हस्तक्षेप करीत असतात, त्यामुळे त्यांच्या विषयीचा दरारा त्यांच्या मनात असतो.
मध्य आशियातील युरेशियामध्ये असलेल्या लेप्चा आदिवासींमध्ये नैसर्गिक शक्तींना आपले पूर्वज मानून त्यांची आराधना करण्याची प्रथा आहे.
उत्तर अमेरिकेच्या पठारी प्रदेशातील नेज पर्सेस नावाच्या लोकांमध्ये मृत पूर्वजांचे आत्मे हे आपले रक्षक आहेत अशी धारणा प्रचलित आहे. उत्तर अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रदेशातील ‘पोमो’ लोक आपल्या पूर्वजांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भूत महोत्सव साजरा करतात. युरोपच्या युरेशिया या भागातील रोमन धर्मामध्ये पूर्वजपूजा ही पवित्र मानली जाते.
डॉ. अशोक राणा
संपर्क : ९३२५५१४२७७
Read About: Josef Mengele : डॉक्टर की सैतान?
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.