मनोज जरांगे पाटील यांचा सवाल, आज नारायण गडावर दसरा मेळावा
Manoj Jarange Patil farmers aid : वडीगोद्री (जि. जालना) : मंत्र्यांच्या बंगल्यांच्या सजावटीवर हजारो कोटींची उधळपट्टी होत असताना संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना भरभरून मदत देण्यात हात का आखडला जातोय? असा संतप्त सवाल मराठा संघर्ष योद्ध मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अवघ्या पाच हजारांची एवढी ‘मोठी’ मदत आतापर्यंत कोणत्याही सरकारने दिली नसावी, असा टोलाही त्यांनी लगावला.
अंकुशनगर येथील त्यांच्या निवासस्थानी सोमवारी (दि.१९) पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटलांनी सरकारवर निशाना साधला. ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कवडीमोल भाव मिळतोय, विहिरी कोरड्या पडल्या असून पिके जळून खाक झाली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. अशा स्थितीत ५ हजार रुपये देणे म्हणजे बळीराजाचा अपमान आहे. ही रक्कम मिळवण्यासाठीही पुन्हा शेतकऱ्यांना कागदपत्रे आणि याद्यांच्या चक्रव्यूहात अडकवून खर्च करायला लावला जात आहे. पिकांचे अतोनात नुकसान आणि आर्थिक विवंचनेमुळे शेतकरी हतबल झाला आहे. मात्र, एकाही शेतकरी बांधवाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही त्यांनी केले. शेतकरी कोणत्याही जाती-धर्माचा असला, तरी मातीशी इमान राखणारा तो आधी शेतकरी आहे. आपण सर्व मिळून या संकटाशी दोन हात करू आणि सरकारकडून आपला हक्क खेचून आणू, असेही ते म्हणाले.
मेळाव्याची जय्यत तयारी
श्रीक्षेत्र नारायणगडावर जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मंगळवारी (दि.२०) सकाळी ११ वाजता ते नारायणगडावर दाखल होतील. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करतील. या मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित राहण्याचा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे.
जेवण, पाणी, निवासाची सोय
नारायणगडाच्या चारही बाजूंनी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, लाखो लोकांसाठी जेवण, पाणी आणि निवासाची सोय आयोजकांनी केली आहे. शेकडो एकर परिसरात सऊंड सिस्टिम्स आणि फ्लेक्स लावण्यात आले आहेत. हा दसरा मेळावा पारंपरिक पद्धतीने होणार असला तरी, जरांगे पाटील उद्या काय बोलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Read about : France Farmer Relief Package : फ्रान्स सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 1 अब्ज युरोचे पॅकेज
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.