Ad Advertisement Ad Advertisement

Sindhudurg Fort – सिंधुदुर्ग

Sindhudurg Fort : ‘सिंधू’ म्हणजे समुद्र आणि ‘दुर्ग’ म्हणजे किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्राला कधी अडथळा मानलंच नाही; त्यांनी समुद्रालाच आपल्या स्वराज्याच्या संरक्षणाचा सर्वांत भक्कम साथीदार बनवलं!

गर उंच असतो. त्यावर चढणं कठीण असतं. उंचावरून चारही दिशांवर नजर ठेवता येते, शत्रू आला तर दूरवरून दिसतो आणि म्हणूनच सह्याद्रीच्या उत्तुंग डोंगररांगांमध्ये एकामागोमाग एक अजिंक्य आणि अभेद्य किल्ले उभे राहिले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४ मध्ये सिंधुदुर्ग या सागरी किल्ल्याच्या बांधकामाचा आदेश दिला आणि अवघ्या तीन वर्षांत (१६६४ ते १६६७) हा चमत्कार पूर्ण झाला. ‘शिवछत्रपतींचे विश्वासू शिलेदार’ आणि वास्तुरचनाकार हिरोजी इंदुलकर यांच्या अद्भूत मार्गदर्शनाखाली, तीन हजारांहून अधिक कुशल कामगारांनी समुद्राच्या लाटांशी दोन हात करत हा किल्ला उभा केला.

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ भूमीवरील युद्धाचे नव्हे, तर भारतीय सागरी रणनीतीचे शिल्पकार होते. त्यांना ‘समुद्रावर ज्याचं नियंत्रण, त्याचं किनाऱ्यावर नियंत्रण आणि किनाऱ्यावर नियंत्रण म्हणजे व्यापारमार्गांवर आणि स्वराज्याच्या सार्वभौमत्वावर ताबा’ हे गणित माहिती होतं, म्हणूनच महाराजांनी मराठा आरमाराची भक्कम पायाभरणी केली आणि सिंधुदुर्गसारख्या अजिंक्य जलदुर्गांना स्वराज्याची भक्कम ढाल बनवलं. सिंधुदुर्ग हा केवळ ‘समुद्रात बांधलेला एक किल्ला’ नव्हता, तर परकीय आक्रमकांना समुद्रातच रोखणाऱ्या एका अत्यंत मोठ्या आणि महान लष्करी व्यूहरचनेचा मुख्य केंद्रबिंदू होता.

या किल्ल्यासाठीच्या जागेची निवड हीसुद्धा काळजीपूर्वक केली होती. मालवणच्या किनाऱ्यापासून थोडं आत असलेलं हे खडकाळ बेट सरळ नजरेत येत नाही. चहूबाजूंनी उधाणलेला समुद्र आणि पाण्याखाली लपलेले धोकादायक खडक यांमुळे शत्रूच्या मोठ्या जहाजांना किल्ल्याच्या अगदी जवळ येणं अशक्य होतं.

छत्रपती शिवरायांनी निसर्गाचाच आपल्या संरक्षणासाठी कसा वापर करावा, याचा हा उत्तम नमुना होता! शत्रूला किल्ल्याच्या भिंतीपर्यंत पोहोचण्याआधी उधाणलेला समुद्र पार करावा लागणार होता आणि तो सरळ मार्ग नव्हता. भरती-ओहोटी, लाटांचे तडे आणि पाण्याखालचे खडक हेच शत्रूसाठी पहिले प्राणघातक अडथळे ठरणार होते. नैसर्गिक संरक्षणावर विसंबून न राहता, महाराजांनी बेटाभोवती सुमारे ४८ एकर क्षेत्रात प्रचंड तटबंदी उभारली. समुद्राच्या खऱ्याखुऱ्या लाटा आणि वादळे सतत भिंतीवर आदळणार हे माहिती असूनही, ३० फूट उंच आणि १२ फूट जाड तटबंदी उभारताना शिशाचा आणि चुन्याचा अत्यंत कल्पक वापर करण्यात आला.

डोंगरावरच्या किल्ल्यांना पावसाशी आणि वाऱ्याशी झगडावं लागतं, पण सिंधुदुर्गाला रोज समुद्राच्या अथांग शक्तीशी झगडावं लागतं.
आज ३५० पेक्षा जास्त वर्ष उलटूनही समुद्राच्या लाटांशी दोन हात करत उभी असलेली ही तटबंदी शिवकालीन स्थापत्यशास्त्राच्या आणि शिवछत्रपतींच्या भव्य कल्पकतेचा भक्कम पुरावा आहे.

सिंधुदुर्गाच्या वास्तुरचनेतील सर्वात हुशार आणि थक्क करणारा भाग म्हणजे त्याचे ‘महाद्वार’ (प्रवेशद्वार)! सामान्य किल्ल्यांमध्ये मुख्य दरवाजा लांबूनच स्पष्ट दिसतो, ज्यामुळे शत्रूला कुठे हल्ला करायचा हे कळते. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने सिंधुदुर्गाच्या महाद्वाराची रचना अशी करण्यात आली की, तटबंदीजवळ अगदी ५० फुटांवर पोहोचलं तरी दरवाजा कुठे आहे हे शत्रूच्या नजरेला अजिबात दिसत नाही!
तटबंदीच्या दोन बुरुजांच्या वळणात हे छद्म प्रवेशद्वार (तटबंदी/सभोवतालच्या रचनेशी एकरूप झालेलं, शत्रूच्या नजरेस न पडणारं) अत्यंत हुशारीने लपवण्यात आलं आहे. शत्रूसाठी समोर फक्त एक सलग दगडी भिंत; पण किल्ल्यातल्या मराठ्यांच्या पराक्रमी सैनिकाला मात्र आत जाण्याचा नेमका मार्ग माहिती असायचा!

चहूबाजूंनी खारट समुद्राच्या पाण्याने वेढलेल्या या किल्ल्यात गोड्या पाण्याच्या विहिरी म्हणजे अद्भुत चमत्कारच आहे! दीर्घकाळ चालणाऱ्या वेढ्यात बाहेरून अन्न-पाणी मिळणं अशक्य असतं, याची शिवरायांना उत्तम प्रकारे कल्पना होती, म्हणूनच त्यांनी किल्ल्याच्या बांधकामासोबतच ‘दूधबाव’, ‘दहीबाव’ आणि ‘साखरबाव’ यांसारख्या गोड्या पाण्याच्या विहिरी खोदल्या. यातून छत्रपती शिवाजी महाराजांची दृष्टी किती सूक्ष्म आणि दूरगामी होती हे लक्षात येतं.

किल्ल्यात हनुमान, भवानीमाता तसंच महादेवाची मंदिरं उभारण्यात आली आणि सर्वांत विशेष म्हणजे, इथे शिवछत्रपतींच्या हस्तकमळांचे आणि पदकमळांचे ठसे आजही जतन करून ठेवलेलं छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित असलेलं एकमेव ऐतिहासिक मंदिरही याच भूमीवर आहे! या किल्ल्याला ‘सिंधुदुर्ग’ असं नाव दिलं गेलं. ‘सिंधू’ म्हणजे समुद्र आणि ‘दुर्ग’ म्हणजे किल्ला.!

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.