Ad Advertisement Ad Advertisement

Mob Attacks Police – गोवंश वाहतुकीवरून राडा; जमावाची पोलिसांवर दगडफेक

छावणीतील घटना; पोलिसाचे डोके फोडले, वर्दी रक्ताने माखली

छत्रपती संभाजीनगर : Mob Attacks Police : छावणीत गोवंश वाहतुकीवरून प्रचंड राडा झाला. तुम्ही पकडलेला गोवंशाचा ट्रक सोडता कसा? असे म्हणत ६० ते ७० जणांच्या जमावाने पोलिसांवर तुफान दगडफेक करीत हल्ला चढविला. यात एका पोलिसाचे डोके फुटले असून वर्दी रक्ताने माखल्याने एकच गोंधळ उडाला. ४ ऑक्टोबरला मध्यरात्री १२ वाजता छावणीतील केशर मॉलसमोर हा प्रकार घडला. या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नितीन चौधरी, ऋषभ यादव, ओमकार भंडारी, धीरज साकल, व्यंकटेश यादव, जगदीश यादव, सागर केसरे, जगदीश यादव, लखन यादव ऊर्फ बाबा (सर्व रा. छावणी) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे असून यातील व्यंकटेश, ऋषिकेश, नितीन आणि ओमकार आदी ६ जणांना अटक केल्याचे सहायक पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांनी सांगितले.

छावणी पोलीस ठाण्याचे अंमलदार दीपक सोनवणे हे रविवारी (दि. ४) रात्री गस्तीवर होते. रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास नियंत्रण कक्षाकडून त्यांना छावणीतील केशर मॉल, नेहरू चौक येथे सार्वजनिक रस्त्यावर भांडण सुरू असल्याची माहिती मिळाली. ते होमगार्डसोबत तिथे पोहोचले असता, सुमारे ६० ते ७० तरुणांचा जमाव एका ट्रक (एम.एच.१६, डीएल ५२८५) भोवती जमलेला होता. या ट्रकमध्ये १० ते १२ गोवंश होती. जमावातील तरुणांनी ट्रकची चावी काढून घेतली होती आणि ते ट्रक चालकाशी वाद घालत होते.

हुज्जत घातली अन् थेट हल्ला

अंमलदार सोनवणे यांनी तरुणांना ट्रकची चावी देण्यास सांगितले, जेणेकरून कायदेशीर कारवाईसाठी ट्रक पोलीस ठाण्यात घेऊन जायचा होता. मात्र, तुम्ही गोवंश असलेला ट्रक सोडता कसा?, असा जाब विचारत या आक्रमक जमावाने पोलिसांशीच हुज्जत घालण्यास सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून सोनवणे यांनी गस्त अधिकारी उपनिरीक्षक सुरेश माळी व इतर कुमक बोलावून घेतली. वरिष्ठ येईपर्यंत ट्रक सुरक्षितस्थळी हलवण्याचा ते प्रयत्न करत असतानाच, तिथे उपस्थित असलेल्या तरुणांनी थेट पोलिसांवरच हल्ला चढवला.

दगडाने डोके फोडले; पाठलाग करून लाथाबुक्क्यांनी मारहाण

या हल्ल्यादरम्यान ओमकार ऊर्फ चिन्ना भंडारी या तरुणाने रस्त्यावर पडलेला मोठा दगड उचलून थेट अंमलदार दीपक सोनवणे यांच्या डोक्यात मारला. या वर्मी घावामुळे सोनवणे यांचे डोके फुटून भळाभळा रक्त वाहू लागले. काही क्षणात वर्दी रक्ताने माखली. जीव वाचवण्यासाठी सोनवणे मैदानाकडे पळत असताना ऋषभ यादव, लखन ऊर्फ बाबा यादव, ओमकार भंडारी, धीरज साकल, व्यंकटेश यादव, नितीन चौधरी, सागर केसरे आणि जगदीश यादव यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली व शिवीगाळ केली.

१६ गोवंशाची सुटका; चालक ताब्यात

गोवंश वाहतुकीप्रकरणी छावणी पोलिसांनी कारवाई केली. उपनिरीक्षक सुरेश माळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, या ट्रकमध्ये अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने १६ गोवंश बांधून नेली जात होती. पोलिसांनी २५ लाख ७० हजार रुपये किमतीचा ट्रक आणि जनावरे, असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ट्रक चालक रोशन संजय थिटे (वय २६, रा. गारगाव, ता. श्रीगोंदा) याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read About : Engineer Robbed in CSN – तुझ्याकडे ड्रग्स आहे म्हणत चाकूच्या धाकावर अभियंत्याला लुटले!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.