Ad Advertisement Ad Advertisement

Meena Kumari Life Story : जेलर बदलले, हुकूम तेच राहिले

Meena Kumari Life Story : त्या भल्या पोलीस अधिकाऱ्यानं धर्मेंद्रलाच नव्हे तर मीनाकुमारीला देखील बदनामीपासून वाचवलं होतं. त्यानं आपलं चाहत्याचं कर्तव्य चोख पार पाडलं होतं. मीनाकुमारी अशी नेहमीच धर्मेंद्रच्या पाठिशी उभी राहिली. तो मात्र कळत नकळत तिचं नुकसान करत होता.

20 ते २५ चित्रपटांच्या उपेक्षेनं त्याला प्रसिद्धीचं महत्त्व लक्षात आलं होतं आणि आता तो त्यासाठी मीनाकुमारीचा पुरेपूर उपयोग करून घेत होता. दुसरीकडे मीनाकुमारीनं चालवलेल्या प्रेम वर्षावामुळे त्याचा अहंकार आणि आत्मविश्वास दोन्ही तरारले होते. एखाद्या लहान मुलानं नवं खेळणं सर्वांना दाखवत सुटावं तशा या प्रेमाच्या पताका सर्वत्र लावत होता. म्हणजे एकापरीनं प्रेमाची जाहिरातच करत होता.

सातत्यानं फिल्मी नियतकालिकांमधून प्रेमातली जवळीक जगजाहीर करत होता. अतिशय खेदाची आणि तितकीच संतापकारक अन् चिंतेची गोष्ट म्हणजे मीनाकुमारी या बाबतीत गाफिल होती. धर्मेंद्रला या गैरवर्तनात अजाणतेपणाने ती सहकार्य करत होती. ती त्यावेळी अशा सार्वभौम सुस्थितीत होती; तिला आता प्रसिद्धीसाठी मुलाखत आणि फोटोज काय, पण मुळात प्रसिद्धीची गरज राहिली नव्हती.

उलट प्रसिद्धीपासून थोडं दूर राहण्याची गरज होती. याबाबतीत तिच्या काही समकालीन अभिनेत्रींपासून तिला धडा घ्यायला हवा होता. इतर अभिनेत्रींचीदेखील प्रेम प्रकरणं चालू होती, पण ती त्यांनी शहाणपणानं छुपी ठेवली होती. तसं वागणं योग्यही होतं. कारण चंदेरी दुनियेतसुद्धा प्रेमिकांच्या जोड्या तुटतात तेव्हा पुरुष सहीसलामत निसटून जातो आणि स्त्रीला मात्र बदनामी सहन करावी लागते.

मीनाकुमारीलादेखील अशीच किंमत मोजावी लागली. त्याबद्दल तीच दोषी होती. गॉसिप पत्रकार त्या काळात तिच्यामागे अक्षरश: हात धुवून लागले होते. तिचा भूतकाळ खोदून खणून तिच्याबद्दल विकृत वार्ता पसरवत होते. इथे पुन्हा एकदा ती पराभूत झाली. एकटी पडली. या जहरी दुष्टतेचा प्रतिकार करणं तिला जमत नव्हतं आणि तिच्या बचावासाठी तिच्या रक्षणासाठी तिच्या कुटुंबात कोणीच नव्हतं.

इतर अभिनेत्रींचे भाऊ, मेहुणे किंवा तत्सम जवळचे नातलग अशा वादळी परिस्थितीत सापडलेल्या स्त्रीकरिता ढाल बनत होते. इथे मात्र ढाल बनण्याऐवजी तेच हात तलवार बनून आपल्याच माणसाला शिकाऱ्यांपुढे ढकलत होते. त्यांना स्वत:च्या चोळीसाठीसुद्धा मीनाकुमारीचं रक्षण करावसं वाटत नव्हतं. स्वार्थासाठी भुरट्या चोऱ्या करण्याकडे त्यांचा कल होता.

पण, मीनाकुमारी वाचली तर आपली जन्मभराची ददात मिटेल हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं. मात्र, त्यांना दोष देण्यात अर्थ नव्हता. बोलून चालून हे लोक म्हणजे शिताभोवती गोळा झालेली भूतं होती. खरी चिंता होती मीनाकुमारीचं, तिला स्वत:चं हित का कळत नव्हतं. एकदा केलेली चूक पुन्हा करण्याची घोडचूक तिनं केली होती: ती पुन्हा एकदा विवाहित माणसाच्या प्रेमात पडली होती. फक्त विवाहित माणसाच्या नव्हे, तर चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडली होती.

याचा अर्थ लावण्याची चढाओढ पत्रकारांमध्ये लागली होती. कुणाला वाटत होतं की, आयुष्यात पहिल्यांदाच मीनाकुमारीची स्वातंत्र्याशी ओळख झाली होती आणि तिही फार उशिरा जवळपास पस्तिशीच्या वयात! वयाच्या चौथ्या वर्षापासून बत्तीसाव्या वर्षापर्यंत ती फक्त आज्ञा आणि हुकूम ऐकत आली होती. हुकूम देणाऱ्यांची केवळ नावं बदलली होती, आधी पिता, नंतर पती.

पण, हुकूम आणि शिक्षा त्याच होत्या. जेलर बदलले होते पण बेड्या तशाच होत्या. आज्ञा आणि हुकूम तसेच होते. सहाजिकच विपरीतरित्या का होईना पण स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मीनाकुमारीचा स्वत:वरचा ताबा सुटला होता. कधी नव्हे ते हातात आलेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेताना तिला बऱ्या वाईटाचं भान उरलं नव्हतं, म्हणूनच तिच्यापेक्षा सर्व बाजूंनी लहान असलेल्या आणि अपरिपक्व वृत्तीच्या पुरुषाकडे ती आपल्या आयुष्याची सगळी सूत्र देऊन बसली होती.

त्याला ती जबाबदारी पेलवत नव्हती, पण त्यामुळे मिळणाऱ्या प्रसिद्धीची किंमत समजत होती. त्याच्या अहंकाराचा पिसारा फुलला होता आणि तो तिला त्याचं स्वैर मन पाहिजे तसं झुकवत होता, ती झुकत होती.

तिचा तोल ढळला होता असं म्हणणं चुकिचं होईल. तोल ढळला होता म्हणण्यापेक्षा ती या नव्या अनुभवानं गोंधळून गेली होती. एक साधी गोष्ट कुणाच्याही लक्षात येत नव्हती आणि ती म्हणजे मीनाकुमारी आयुष्यात प्रथमच समवयीन पुरुषाबरोबर वावरत होती, त्यामुळे तिनं निर्भर बालपण अनुभवलं नव्हतं; प्रौढवयीन पतीमुळे ती तारुण्याच्या धुंदीला मुकली होती. पिता आणि पती दोघांचेही तिच्यावर प्रेम होतं यात शंका नाही. पण ते प्रेम एका बालिकेला, एका कन्येला; एका तरुण स्त्रीला, एका पत्नीला हवं असतं तसं नव्हतं.

पुरुषप्रधान संस्कृतीत वाढलेले ते दोन प्रौढ पुरुष ज्याला प्रेम समजत होते, ते वर्चस्ववादी वर्तनच होतं. पिता आणि पती या जीवनातल्या दोन सर्वोच्च नात्यांनी तिला नुसतंच बंधन दिलं होतं. या बंधनामध्ये ओढ नव्हती की ओलावा. तिथे होता हुकूम आणि तो पाळण्याची सक्ती. दोघंही आपापल्या मतानुसार आणि मर्जीनुसार तिच्याशी वागत होते. माहेर आणि सासर दोन्ही घरांमध्ये पैशानं मिळणाऱ्या सुख सुविधा होत्या, पण बरोबरीची वागवणूक नव्हती. खेळीमेळी नव्हती.

स्वातंत्र्याचा तर प्रश्नच नव्हता. हे दोन्ही पार्ट्स तुटले, गुलजारसारखा मित्र आणि धर्मेंद्रसारखा प्रियकर हे दोन्ही समवयस्क जीवनात आले तेव्हा मीनाकुमारीला खरं तारुण्य मिळालं. पुरुषांशीसुद्धा बरोबरीनं वागता येतं, हसता बोलता येतं आणि त्याचवेळी नात्यातला आदर व शालीनता कायम राखता ठेवता येतात हे ती प्रथमच अनुभवत होती. कदाचित फार उशिरा भेटलेल्या या स्वातंत्र्यामुळे मीनाकुमारी भांबावून गेली.

Read About : Rabindranath Tagore Progressive Writers Movement : सभ्यतेचे भवितव्य पणाला लागेल
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.