Ad Advertisement Ad Advertisement

Seychelles Giant Tortoise Population – सेशेल्सच्या अल्डाब्रा बेटावर 1.8 लाख महाकाय कासवे!

संवर्धन मोहिमेला मोठे यश, १९९०च्या दशकातील सुमारे एक लाखांच्या अंदाजापेक्षा कासवांच्या संख्येत मोठी वाढ

व्हिक्टोरिया : Seychelles Giant Tortoise Population हिंदी महासागरातील सेशेल्स देशातील अल्डाब्रा अटोल या बेटावर तब्बल १ लाख ८० हजार महाकाय कासवे आढळली आहेत. मुक्तपणे संचार करणाऱ्या या कासवांची ही आतापर्यंतची सर्वाधिक नोंद आहे. सेशेल्स आयलंड्स फाउंडेशन (एसआयएफ) आणि एक्सेटर विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली. २०१८ ते २०२२ या पाच वर्षांतील निरीक्षणांचे विश्लेषण करून हा अंदाज मांडण्यात आला. यापूर्वी १९९०च्या दशकाच्या अखेरीस या बेटावरील कासवांची संख्या सुमारे एक लाख असल्याचे सांगितले जात होते. हा अभ्यास ‘इकॉलॉजी अँड इव्होलुशन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला.

नामशेष होण्याच्या उंबरठ्यावरून पुनरागमन

१९व्या शतकात मोठ्या प्रमाणावर शिकार झाल्यामुळे अल्डाब्रा महाकाय कासवांची संख्या एक हजारांपेक्षाही कमी झाली होती. त्यानंतर संवर्धन कार्यक्रम राबवण्यात आले. १९८१ मध्ये हे बेट कठोर निसर्ग राखीव क्षेत्र बनले, तर १९८२ मध्ये त्याला युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळाला. संशोधकांच्या मते, ही हिंदी महासागरातील संवर्धनाच्या यशाची महत्त्वपूर्ण उदाहरणांपैकी एक आहे.

हवामान बदलाचे आव्हान कायम

संख्या वाढली असली तरी कासवांची संरक्षण मोहीम संपलेली नाही. वाढते तापमान, अधिक काळ टिकणारे दुष्काळ आणि समुद्राच्या पातळीत होणारी वाढ त्यांच्या अधिवासाला धोका निर्माण करू शकते. जंगली मांजरे आणि काळे उंदीर कासवांची अंडी व नवजात पिल्लांवर हल्ले करतात. या परकीय प्रजातींचे नियंत्रण केल्यास कासवांच्या भविष्यातील संरक्षणाला मदत होईल. संशोधकांनी स्पष्ट केले की, संख्या वाढणे हे अंतिम यश नसून, सातत्यपूर्ण निरीक्षण आणि वेळेवर उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Read About: Anthropic Claude AI Policy : त्रास दिल्यास ‘क्लाऊड’ संभाषण थांबवणार!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.