धारदार शस्त्र आणि पेव्हर ब्लॉकने हल्ला केल्याचा आरोप; ‘याला म्हणतात दहशत’ अशी आरडाओरड करत संशयित पसार, पोलिसांकडून शोध सुरू
नाशिक : Nashik Crime News शहरातील गजबजलेल्या जुन्या आग्रा रोडवरील त्र्यंबक नाका सिग्नल चौकात सोमवारी (दि. १२) रात्री रिक्षाचालकांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले. धारदार शस्त्र आणि पेव्हर ब्लॉकने हल्ला केल्यानंतर ‘याला म्हणतात दहशत’ अशी आरडाओरड करत संशयित घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. भरवस्तीत आणि वाहतूक पोलिसांच्या जवळ हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली.
वादाचे रूपांतर हाणामारीत
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, त्र्यंबक नाका सिग्नल परिसरात रिक्षाचालकांच्या दोन गटांमध्ये अचानक वाद सुरू झाला. काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या वेळी संशयितांनी धारदार शस्त्र आणि पेव्हर ब्लॉकने हल्ला केल्याचा आरोप आहे. डोक्यासह शरीराच्या विविध भागांवर गंभीर दुखापत झाल्याने दोघे जखमी झाले.
हल्ल्यानंतर वाहतूक विस्कळीत
हल्ल्यानंतर जखमींना घटनास्थळी सोडून संशयितांनी पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यावेळी ‘याला म्हणतात दहशत’ अशी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेमुळे जुन्या आग्रा रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
तीन पोलिस ठाण्यांचे अधिकारी घटनास्थळी
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई नाका, सरकारवाडा आणि भद्रकाली पोलिस ठाण्यांतील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पिनॅकल मॉलसमोरील हा परिसर मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने संबंधित पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
जखमींना प्रथम जिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केल्याची माहिती आहे. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
Read About : Lucknow Murder Case : उद्योजक शिव शर्मा मृत्यू प्रकरणाला नवे वळण; सोशल मीडिया इन्फ्लुएंसर प्रेयसीसह पाच जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.