८५ टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद
Marathwada Crop Loss Survey छत्रपती संभाजीनगर : अपुऱ्या पावसामुळे यावर्षी झालेल्या पीक नुकसानीच्या पंचनाम्यांना मराठवाड्यात वेग आला असून विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत ७६५८ गावांतील पंचनामे पूर्ण झाले आहेत. एकूण ५२.१२ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ४३.९६ लाख हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीची प्राथमिक नोंद करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली आहे.
मराठवाड्यात यावर्षी पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. अनेक भागांत सोयाबीन, कापूस तसेच अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मराठवाड्यातील संपूर्ण ७६ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करीत पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार २९ सप्टेंबरपासून पंचनाम्यांना सुरूवात करण्यात आली. महसूल, कृषी विभागाच्या वतीने पंचनामे करण्यात येत आहेत. यावर्षी जवळपास ५२ लाख हेक्टरवर खरीप पिकांची लागवड करण्यात आली होती. पंधरा दिवसांच्या कालावधीत ४३ लाख ९६ हजार हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. यामध्ये ४ लाख ४४ हजार शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
विभागीय आकडेवारीनुसार गावांच्या तुलनेत ९२.३८ टक्के, क्षेत्राच्या तुलनेत ८४.३४ टक्के आणि शेतकऱ्यांच्या तुलनेत ८५.०२ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. यापूर्वी १२ ऑक्टोबरपर्यंत ६४३३ गावांतील पंचनामे पूर्ण झाले होते. तर १३ ऑक्टोबर रोजीच्या अहवालानुसार, एका दिवसात १२२१ गावांतील पंचनामे पूर्ण करण्यात आले. या प्रक्रियेत ६.७४ लाख हेक्टर क्षेत्राचा समावेश असून, सुमारे ७ ३२ लाख शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद करण्यात आली आहे.
पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही महत्त्वाची ठरणार आहे. पंचनाम्यांची अचूकता आणि प्रत्यक्ष नुकसानीची नोंद याकडे शेतकरी लक्ष ठेवून आहेत. आता डोळे सरकारच्या मदतीकडे लागले आहेत.
बीड, नांदेडमध्ये १०० टक्के पंचनामे
बीड आणि नांदेड जिल्ह्यांत गावांच्या तुलनेत पंचनाम्यांची शंभर टक्के पूर्तता नोंदविण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात गावांच्या तुलनेत ९९.६४ टक्के, तर धाराशिवमध्ये ९७.८२ टक्के काम पूर्ण झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गावांच्या तुलनेत ८१.३९ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित कामे पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : MCOCA Against Rahul Chabukswar संभाजीनगरातील कुख्यात राहुल चाबुकस्वारसह टोळीवर मकोका
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.