Ad Advertisement Ad Advertisement

Shah Rukh Khan 61st Birthday – अभिनयच नव्हे, विचारांचाही बादशाह शाहरुख खान

यश, अपयश, मैत्री आणि माणुसकीवर किंग खान काय म्हणतो? ६१ व्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याचे प्रेरणादायी विचार

मुंबई : Shah Rukh Khan 61st Birthday – बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान, आपल्या अभिनयाने, रोमँटिक अंदाजाने आणि हटके संवादशैलीने त्याने लाखो चाहत्यांच्या मनात घर केले आहे. मात्र, शाहरुख केवळ अभिनयासाठीच प्रसिद्ध नाही, तर त्याचे विचारही अनेकांना प्रेरणा देतात. आयुष्यात यश मिळवायचे असेल, तर अपयशाला कसे सामोरे जायचे? माणसांशी कसे वागायचे? स्वत:ची ओळख कशी जपायची? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्याच्या विचारांतून मिळतात. २ नोव्हेंबर रोजी शाहरुख खानचा ६१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याचे आयुष्याकडे पाहण्याचे ५ खास दृष्टिकोन

१. स्वत:ची ओळख विसरू नका

२०१२ मध्ये येल विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शाहरुखने एक महत्त्वाचा संदेश दिला होता. जग तुमच्याबद्दल काय विचार करते, यापेक्षा तुम्ही स्वत:ला कसे ओळखता, हे अधिक महत्त्वाचे आहे. कठीण काळात लोक तुम्हाला समजून घेतीलच असे नाही. अशा वेळी दुसऱ्यांच्या मतांमुळे स्वत:ला बदलू नका. तुम्ही जसे आहात तसेच राहा आणि स्वत:वर विश्वास ठेवा, असे त्याने सांगितले होते.

२. चिंता करू नका

२०१५ मध्ये एडिनबर्ग विद्यापीठाने शाहरुखला डॉक्टरेट पदवी दिली होती. या वेळी त्याने विद्यार्थ्यांना एक छान सल्ला दिला. त्याच्या मते, गोंधळून जाण्यात काहीच गैर नाही. कारण अनेकदा गोंधळातूनच योग्य मार्ग सापडतो. प्रत्येक गोष्टीचे उत्तर लगेच मिळाले पाहिजे, असे नाही. स्वत:च्या विचारांवर ठाम राहा, पण इतरांचे मत ऐकायलाही शिका. स्वत:ला फार गंभीरपणे घेऊ नका, असा त्याचा संदेश होता.

३. माणुसकीपेक्षा मोठे काहीच नाही

दुसऱ्यांना मदत करताना त्यांच्यावर उपकार केल्याची भावना ठेवू नका, असे शाहरुखचे मत आहे. कोणाला मदत केल्याने त्या व्यक्तीपेक्षा आपल्यालाच अधिक आनंद मिळतो. त्यामुळे कोणाशीही दयाळूपणे वागा. गरजू व्यक्तीला मदत करा आणि शक्य असेल तेव्हा दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणा. कारण माणुसकीतून मिळणारे समाधान पैशांत मोजता येत नाही.

४. अपयशाला घाबरू नका

यश मिळाले की आनंद होतो, कौतुक होते, पण खरे धडे अपयशातून मिळतात, असे शाहरुख मानतो. अपयश आले म्हणून निराश होऊन थांबू नका. त्यातून काय शिकता आले, याचा विचार करा. पुन्हा प्रयत्न करा आणि स्वत:ला सिद्ध करा. अपयश आल्यावर तुम्ही कसे उभे राहता, हेच तुमचे खरे सामर्थ्य दाखवते, असा शाहरुखचा संदेश आहे.

५. महागड्या भेटींपेक्षा मैत्री महत्त्वाची

शाहरुखच्या मते, कितीही श्रीमंत किंवा प्रसिद्ध झालात तरी माणसांच्या प्रेमाची किंमत कमी होत नाही. तुम्ही मित्राला वाढदिवशी महागडी कार भेट देऊ शकता, पण तुमच्या वाईट काळात तुमचे बोलणे शांतपणे ऐकून घेणाऱ्या मित्राची जागा ती कार घेऊ शकत नाही. त्यामुळे नात्यांमध्ये पैसा नव्हे, तर प्रेम, विश्वास आणि साथ महत्त्वाची असते.

तिकीटाचे पैसे नव्हते, आज कोट्यवधींचा मालक

आज शाहरुख खान आलिशान आयुष्य जगतो. मात्र, एक काळ असा होता, जेव्हा त्याच्याकडे चित्रपटाचे तिकीट खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते. २०१२ मध्ये एका कार्यक्रमात त्याने बालपणीची आठवण सांगितली होती. वडील ताज मोहम्मद खान एकदा त्याला दिल्लीतील चित्रपटगृहात घेऊन गेले होते. मात्र, त्यांच्याकडे तिकीट काढण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे दोघांनी चित्रपट पाहण्याऐवजी रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या पाहत वेळ घालवला.

काही वर्षांनंतर शाहरुख आपल्या मुलाला आर्यनला चित्रपट दाखवण्यासाठी घेऊन गेला. त्या वेळी त्याला वडिलांसोबतचा तो जुना प्रसंग आठवला. मात्र, यावेळी परिस्थिती वेगळी होती. आपल्या मुलाला चित्रपटगृहात बसून चित्रपटाचा आनंद घेता यावा, हे त्याचे स्वप्न होते.

‘किंग’मधून पुन्हा पडद्यावर

शाहरुख खान लवकरच ‘किंग’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांना त्याच्या नव्या भूमिकेची उत्सुकता लागली आहे.

अभिनयाने प्रेक्षकांना जिंकणारा शाहरुख आपल्या विचारांनीही अनेकांना प्रेरणा देतो. यश मिळवा, मोठे व्हा, पण माणुसकी, मैत्री आणि स्वत:ची ओळख कधीही विसरू नका, हाच किंग खानच्या विचारांचा खरा संदेश आहे.

Read About: Dil Ki Bewafaiyaan serial – गौरव-श्रद्धाची जोडी जमली, प्रेमात होणार ‘बेवफाई’?

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.