Ancient Indian Theatre and Art : भारतामध्ये नाट्यकला ही शिल्पकला आणि संगीताच्या जोडीनेच विकसित झाली. आपल्याला नाट्यकलेची मुळे अगदी ऋग्वेदामधील ऋचांपासून सापडतात. ऋग्वेदातील यम आणि यमी यांचा संवाद हे नाटक नाही तर दुसरे काय आहे? जेव्हापासून मानव टोळीमध्ये राहिला असेल, तेव्हापासून त्याने नाट्य, अभिनय, नक्कल या साऱ्यांचा प्रयोग केला असेलच.
भरतमुनींचे ”नाट्यशास्त्र” हा नाट्यकलेतील सर्वात प्राचीन ग्रंथ मानला जातो. हजारो वर्षांपासून साठलेल्या ज्ञानाला भरतमुनींनी नाट्यशास्त्र या ग्रंथाचे स्वरूप दिले. या ग्रंथाला ”नाट्यवेद” असेदेखील संबोधण्यात येते. कारण त्यात ऋग्वेदातील धडे, सामवेदातील गायन, यजुर्वेदातील अभिनय तसेच अथर्ववेदातील रस समाविष्ट आहेत. या पाचव्या वेदाची निर्मिती ब्रम्हदेवाने केली आणि भरतमुनीला त्याचा प्रसार करण्यासाठी भूलोकावर पाठवलं अशी आख्यायिका आहे. नाट्यशास्त्र या ग्रंथात ३६ अध्याय आणि ३६०० श्लोक आहेत. नाटकाची निर्मिती, पार्श्वभूमी, नाटकांचे वेगवेगळे प्रकार, नाटकातील रस आणि भावनांचे प्रकार, अभिनय क्रिया, शरीराच्या हालचाली, वेगवेगळ्या मुद्रा, गीत संगीताचा वापर या सर्वांची सांगोपांग चर्चा या ग्रंथात केली आहे.
नवरसांमागील सौंदर्यशास्त्राची मांडणी करत शरीराच्या १० तर मानेच्या व हातांच्या ३६ मुद्रांचा उल्लेख भरत मुनींनी केला आहे. भरतमुनींनी स्त्री-पुरुष पात्रांच्या निवडीसंदर्भातदेखील सविस्तर मार्गदर्शन केलं आहे. देश, काल, वय, अवस्था आणि भाषा यांच्या अनुषंगाने तुम्ही पात्रांची निवड करू शकता. पात्रासाठी निवड करण्यापूर्वी कलाकाराचे रूप, शरीर, सुरांचे ज्ञान यांसोबत त्याचा स्वभावदेखील विचारात घ्यावा असे भरतमुनी म्हणतात. नाट्यशास्त्र या ग्रंथातून प्रेरणा घेत पुढे नाट्यशास्त्र विकसित होत गेलं, त्यावर अनेक ग्रंथ आले. अभिनव गुप्ता यांचा अभिनवभारती हा त्यातील महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो.
आजही आधुनिक नाटकशास्त्र शिकवतानादेखील नाट्यशास्त्र या ग्रंथाचा आधार घेतला जातो. इसवीसनाच्या दोन शतके आधी शुद्रकाने चारुदत्त आणि वसंतसेना यांची प्रेमकहाणी सांगणारे मृच्छकटिकम नाटक लिहिले होते. भास आणि कालिदास हे भारतीय भूमीत जन्मलेले प्रमुख नाटककार मानण्यात येतात. आजपासून सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी जन्मलेल्या भासाने १३ नाटके लिहिली, ज्यामध्ये उरोभंग, स्वप्नंवासवदत्ता आणि कर्णभार यांसारख्या महाभारतावर आधारित असलेल्या कलाकृतीचा समावेश होता. शाकुंतल आणि मेघदूतसारखी नाटके लिहून अजरामर झालेला कालिदास आपल्या नाटकातून नवरसांचे अद्भुत, विस्मयकारक दर्शन घडवत आला आहे. शाकुंतल हे इंग्रजी तसेच इतर भाषेत अनुवादित झालेले पहिले संस्कृत नाटक आहे.
”सप्तद्वीपानुकारणां नाट्यमेतद्भवविष्यति” अर्थात नाट्यगृहामध्ये सातही खंडांचे दर्शन घडते. नाटकांवर जसा समाजाच्या स्थितीचा प्रभाव पडतो, तसा नाटकांचादेखील समाजावर परिणाम होत आला आहे. नाट्यशास्त्राचा प्रभाव इतर कलांवरदेखील पडला आहे. नाट्यशास्त्रातील तांडवलक्षण या चौथ्या अध्यायात शिव-पार्वतीच्या नृत्याची लक्षणे सांगितलेली आहेत. शास्त्रीय नृत्यातील विशिष्ट हालाचालींना ‘करण’ म्हणतात. भरतनाट्यम् नृत्यप्रकारात वापरल्या जाणाऱ्या अशा १०८ करणांचे वर्णन भरतमुनींनी केलं आहे. या नृत्यमुद्रांमधून प्रेरणा घेऊन चिदंबरमच्या नटराज मंदिरात असलेल्या तांडव शैलीतील शिवप्रतिमा तयार झाल्या आहेत. तंजावरमधील प्रसिद्ध बृहदीश्वर मंदिरात तसेच इतर ठिकाणच्या मंदिरांच्या स्तंभांवर, भिंतींवर आणि प्रवेशद्वारांवरदेखील आपण नाट्यशास्त्राची छाप पाहू शकतो.
नवव्या आणि दहाव्या शतकात निर्माण झालेली खजुराहो मंदिरातील शिल्पे आज जगाला आश्चर्यचकित करत आहेत. ज्यावेळी इतर सर्व महत्त्वाच्या धर्मामध्ये शारीरिक सुख मिळवण्याची इच्छा बाळगणं हे पाप समजले गेले होते, तेव्हा भारतीय लोक निकोप, निरामय आणि आनंदी कामजीवन हा जीवनात मोक्ष मिळवण्याचा मार्ग आहे हे निक्षून सांगत होते. या संदेशाचे जिवंत शिल्प आपल्याला खजुराहो तसेच भारतातील इतर मंदिरात पाहायला मिळते. काम हे केवळ प्रजोत्पादन करण्यासाठी नसून धर्म, अर्थ आणि मोक्षाप्रमाणे एक पुरुषार्थ आहे, अशी भारतात हजारो वर्षांची धारणा होतीच. या धारणेचे प्रतिबिंब तत्कालीन साहित्यातदेखील उमटले आहे. मात्र, कामतृप्ती ही एक कला आहे असे सांगताना या कलेच्या सर्व बारीकसारीक पैलूंवर सविस्तर मार्गदर्शन तिसऱ्या शतकात वात्स्यायन ऋषी करून गेले आहेत.
लैंगिकता हा मानवाचा स्थायीभाव आहे, त्याकडे दुर्लक्ष न करता त्याला योग्य न्याय दिला पाहिजे असे वात्सायन सांगतो. भिन्नलिंगी व्यक्तींचे आकर्षण का वाटते, तसेच आपल्याला अपेक्षित जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी काय काय मार्ग वापरता येतील, शारीरिक सुख अधिक चांगल्या रीतीने कशाप्रकारे मिळवता येऊ शकते, याचे सविस्तर शास्त्रोक्त मार्गदर्शन यामध्ये आहे. लैंगिक विषयावर अधिक खुलेपणाने चर्चा झाली पाहिजे असा वात्सायनाचा प्रयत्न होता. कामसूत्र हे एक पुस्तक नाही तर सात पुस्तकांचा संच आहे. कामक्रीडेतील विविध टप्पे, जोडीदाराचे वेगवेगळ्या प्रकारे करावयाचे उद्दीपन, वेगवेगळी आसने, वेगवेगळ्या शक्यता यांसारख्या अनेक बाबींवर एकूण ३६ प्रकरणे आणि १२५० श्लोकांमधून कामसूत्र आपल्याला मार्गदर्शन करते.
खजुराहोमधील सर्व शिल्पांचे मूळ आपल्याला वात्सायनाच्या कामसूत्र या ग्रंथात आढळते. मात्र, केवळ खजुराहो नाही तर भारतातल्या अनेक मंदिराच्या भिंती आणि स्तंभावर प्रणयशिल्पे, युगलशिल्पे आढळतात. काळाच्या अधिक मागे गेलो, तर साडे चार-पाच हजार वर्षांपूर्वी अहिल्यानगर जवळील दायमाबाद संस्कृतीमधील एका भांड्यावर युगलचित्र आढळले आहे. महाराष्ट्रातील कार्ला, वेरूळ यांसारख्या लेण्यांमध्ये, तर ओरिसामधील कोणार्कचे सूर्यमंदिर, भुवनेश्वरचे लिंगराज मंदिर, कर्नाटकमधील हम्पीचे विरुपाक्ष मंदिर, गुजरातमधील मोढेराचे सूर्य मंदिर, मध्य प्रदेशमधील सारनाथचा बौद्ध स्तूप, राजस्थानमधील रणकपूरचे जैन मंदिर असे सर्व प्रांतातील आणि सर्व पंथातील मंदिरात आपल्याला कामशिल्पे आढळतात. यावरून आपण निश्चितपणे सांगू शकतो की भारत हा जगाला कामजीवनाकडे पाहण्याची निकोप दृष्टी देत होता, जगाला प्रेम करायला शिकवत होता. विश्वाचा लव्हगुरू म्हणून भूमिका बजावत होता.
नितीन हांडे
संपर्क : ८९५६४४५३५७
Read About : Dhanteras Significance and Rituals : धनत्रयोदशी
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.