Dhanteras Significance and Rituals : आश्विन वद्य त्रयोदशीपासून दिवाळीचा प्रारंभ मानला जातो, म्हणून हा दिवस दिवाळीचा पहिला दिवस. या दिवशी यमराजाला प्रसन्न करण्यासाठी दीपदान करण्याची प्रथा आहे. नवीन कपडे व दागिने या दिवशी खरेदी करणे शुभ मानलं जातं. घरातील पैसा व दागिने पेटीतून बाहेर काढून साफसूफ करणे व पुन्हा योग्य ठिकाणी ठेवणे तसंच उपवास करणे इत्यादी विधी या दिवशी केले जातात. कुबेर, विष्णू-लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून त्यांना पायसाचा नैवेद्य दाखवतात. उंच ठिकाणी तेलाचे दिवे लावणे तसेच अखंड दिवा लावणे हे या सणाचं एक वैशिष्ट्य आहे.
या सणाची एक व्रतकथा आहे, त्यानुसार हेमराज नावाच्या राजाला एक मुलगा होतो. षष्ठीपूजनाच्या दिवशी सटवी देवीने त्याचं भविष्य सांगितलेलं असतं. त्यानुसार तो मुलगा लग्नानंतर चवथ्या दिवशी मरणार असतो. राजा त्या मुलाला एका गुहेत लपवून ठेवतो. यमदूत त्याला लग्नानंतर घ्यायला जातात, पण तेथील विलाप ऐकून त्याचं मन द्रवतं. यमराज राजाला म्हणतो, ‘धनत्रयोदशीच्या दिवशी जो दीपदान व व्रत करेल त्याला अपमृत्यू येणार नाही.’ या कथेवरून सटवी व यमाशी संबंधित हा सण आहे हे स्पष्ट होतं. तसंच कुबेर, नाग या यक्षसंस्कृतीशी संबंधित देवतांचाही त्याचा संबंध आहे असं दिसून येतं. या दिवशी यमराजाला प्रसन्न करण्यासाठी दीपदान करतात. उंच जागी तेलाचे दिवे लावतात. घरातील सोने, नाणे व अलंकार स्वच्छ करून नीट ठेवतात.
उपास करून विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग व द्रव्यनिधी या देवतांचे पूजन करतात. या दिवशी अखंड दीप लावावा, पायसाचा नैवेद्य करावा आणि यथाशक्तिपरोपकार करावा असे सांगितले आहे. या व्रताची कथा अशी-
एकदा यमराजाने आपल्या दूतांना विचारले, ‘तुम्ही प्राण्यांचे प्राण हरण करता त्या वेळी तुम्हाला दु:ख होत नाही का? त्या मरत्या प्राण्यांची तुम्हाला दया येत नाही का?’ त्यावर ते यमदूत म्हणाले, ‘एकदा असा प्रसंग आला होता. हेमराज नामक राजाला एक पुत्र झाला. षष्ठीपूजनाच्या दिवशी सटवी देवीने येऊन त्याचे भविष्य सांगितले की, ‘हा मुलगा लग्नानंतर चौथ्या दिवशी मरेल.’ ते ऐकून राजाने मुलाला एका गुहेत लपवून ठेवले. पण, सोळाव्या वर्षी त्याचे लग्न होताच आम्ही त्याचे प्राण हरण करायला गेलो, त्या वेळी तिथे झालेला विलाप ऐकून आमचे मन द्रवले. महाराज, आपली आज्ञा मोडणे शक्य नव्हते म्हणूनच आम्ही त्याचा जीव काढून घेतला. पण, त्या प्रसंगी आम्हाला फारच दु:ख झाले. म्हणून म्हणतो, महाराज! जीवाचा अपमृत्यू टाळण्यासाठी तुम्हीच काहीतरी उपाय सांगा.’ तेव्हा यमराज म्हणाले, ‘धनत्रयोदशीच्या दिवशी जो दीपदान व व्रत करेल, त्याला अपमृत्यू येणार नाही.’
पुराणातील या कथेतून धनत्रयोदशीचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, या दिवशी आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वंतरी याचा जन्मही झाल्याची कथा आहे, म्हणून वैद्य लोक या दिवशी त्याची जयंती साजरी करतात. भारतीय संस्कृती आणि पौराणिक ग्रंथांमध्ये भगवान धन्वंतरी यांना आयुर्वेदाचे जनक किंवा प्रवर्तक (संस्थापक) मानले जाते. ते हिंदू धर्मात आरोग्याचे देव आणि देवांचे वैद्य (चिकित्सक) म्हणून पूजनीय आहेत.
पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या शेवटी कार्तिक कृष्ण त्रयोदशीला (धनत्रयोदशी) भगवान धन्वंतरी हातामध्ये अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले होते, म्हणूनच हा दिवस संपूर्ण भारतात ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिन’ म्हणून साजरा केला जातो.
पौराणिक संदर्भानुसार, धन्वंतरींनी पुढे पृथ्वीवर काशीचे राजा ‘दिवोदास’ म्हणून जन्म घेतला. या अवतारात त्यांनी महर्षी सुश्रुत (प्लास्टिक सर्जरी आणि शल्यचिकित्सेचे जनक) यांच्यासह अनेक ऋषी-मुनींना शल्यक्रियेचे (सर्जरी) आणि औषधशास्त्राचे विधीवत शिक्षण दिले.
थोडक्यात सांगायचे तर आयुर्वेदाचे अथांग ज्ञान सर्वसामान्य मानवापर्यंत पोहोचवण्याचे आणि ते शास्त्रोक्त पद्धतीने रुजवण्याचे मुख्य श्रेय भगवान धन्वंतरी यांनाच जाते. ज्या समुद्र मंथनामधून धन्वंतरीचा जन्म झाल्याचे सांगण्यात येते, ती पुराणांमधील समुद्रमंथनाची कथा आजवर अनेक क्षेत्रांतील प्रतिभावंतांना आपल्या कलाकृतीच्या निर्मितीसाठी प्रेरणा देत राहिली आहे. याकथेचे स्वरुप असे..
एकदा देवांचा राजा इंद्र हत्तीवर बसून जात असता दुर्वास ऋषींनी आपल्या गळ्यातील फुलांची माळ त्याला दिली. इंद्राने ती हत्तीच्या मस्तकावर ठेवली, पण ती खाली पडली व तुडवली गेली, त्यामुळे संतापलेल्या दुर्वास ऋषींनी इंद्राला ‘तुझे वैभव व राज्य नष्ट होईल’ असा शाप दिला. त्यामुळे इंद्रासकट साऱ्या देवांची शक्ती नष्ट झाली. देवांचे असुरांशी युद्ध झाले असता देवांचा त्यात पराभव झाला. देवांची शक्ती क्षीण झाल्यामुळे ते युद्धात मरू लागले. दानवांना शुक्राचार्यांनी संजीवनी विद्येमुळे मेल्यावरही जिवंत केले. शेवटी देव विष्णूकडे गेले, तेव्हा विष्णूने त्यांना दानवांशी समझोता करण्याचा सल्ला दिला. दानवांच्या मदतीने समुद्रमंथन करून अमृत मिळवा व अमर व्हा, असे सांगून विष्णुने दानवांना अमृत मिळणार नाही अशी व्यवस्था मी करीन असे आश्वासन दिले.
महाभारताच्या आदिपर्वात लक्ष्मीला सागरकन्या म्हटलेले आहे. समुद्रमंथनाच्या कथेत ती समुद्रातून बाहेर निघाल्यानंतर लक्ष्मीने विष्णुच्या वक्षस्थलाचा आश्रय घेतला असा उल्लेख आहे. ब्रह्मांडपुराणात ही कथा आलेली असून त्याचा काळ इ. स. ३२५ हा आहे. पद्मपुराण, विष्णूपुराण, हरिवंश या पुराणांनी लक्ष्मीला विष्णूशी पक्के जोडले. या पुराणांचा काळ इ.स. ३ ते ४ वे शतक असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. हा काळ गुप्त साम्राज्याच्या भरभराटीचा काळ होता. ते विष्णूपूजक होते. या काळालाच काही इतिहासकारांनी सुवर्णयुग असे म्हटलेले आढळते. विष्णूचे महात्म्य रचणारी पुराणे याच काळात रचली गेली आहेत. असेच एक पुराण म्हणजे ब्रह्मांड पुराण इ.स. पाचव्या शतकात जावा सुमात्रा बेटांमध्ये नेले. तेथील भाषांमध्ये त्याचा अनुवाद आजही प्रचारात आहे.
धन्वंतरी हा नागकुळातील होता हे अभ्यासकांनी सिद्ध केले आहे. त्याची मूर्ती नाग रूपात दाखविण्यात येते. अशा धन्वंतरीची जयंती म्हणजे धनत्रयोदशी होय.
अशोक राणा
संपर्क : ९३२५५१४२७७
Read About : India Poverty Reduction : गरिबी कमी झाली; जीवनमान बदलले का?
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.