Ad Advertisement Ad Advertisement

Rare Plant Discovered in Arunachal Pradesh – अरुणाचलच्या जंगलात सापडली नवी दुर्मिळ वनस्पती

केवळ २० ते २५ रोपे शिल्लक, नामकरण झाले जन्मभूमीच्या नावावर

इटानगर : Rare Plant Discovered in Arunachal Pradesh – जंगलातील झाडाच्या खोडावर वाढणारी एक छोटीशी वनस्पती…दिसायला सुंदर, पण अस्तित्वासाठी मोठा संघर्ष करणारी, अरुणाचल प्रदेशात अशाच एका नव्या फुलांच्या वनस्पतीचा शोध लागला आहे. विशेष म्हणजे, या दुर्मिळ वनस्पतीची संख्या केवळ २० ते २५ असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे तिच्या संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अरुणाचल प्रदेशातील लेपारडा जिल्ह्यात शास्त्रज्ञांना फुलांच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. ‘आइसिनेंथस बासरेंसिस’ असे या वनस्पतीचे नाव ठेवण्यात आले आहे. बासर हे या प्रदेशातील ठिकाण असून, संशोधक आणि संवर्धनवादी एगम बासर यांच्या जन्मभूमीचा सन्मान म्हणून हे नाव देण्यात आले आहे. भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभागाच्या (बीएसआय) इटानगर येथील शास्त्रज्ञांनी सोई गावातील संवर्धन क्षेत्रात हे संशोधन केले. एगम बासर यांनी या भागातील वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांना भेट देण्याची सूचना केली होती.

रक्तवर्णी फुले हे खास वैशिष्ट्य

ही वनस्पती इतर झाडांच्या खोडावर वाढते. तिची पाने तीन ते चार सेंटीमीटर लांब असून वरच्या बाजूने हिरवी आणि खालच्या बाजूने तांबूस तपकिरी असतात. तिची गडद लाल रंगाची फुले हे विशेष आकर्षण आहे. फुलांचा आकार साधारण दोन ते २.२ सेंटीमीटर आहे.

केवळ २५ रोपांचे अस्तित्व

संशोधकांच्या मते, ही वनस्पती सध्या केवळ दोन ठिकाणी आढळते. तिची प्रौढ रोपे फक्त २० ते २५ असल्याचा अंदाज आहे. झूम शेती आणि भूस्खलनामुळे तिच्या नैसर्गिक अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तिला तात्पुरते ‘अतिधोकाग्रस्त’ श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
या संशोधनात डॉ. कृष्णा चौलू, एगम बासर, चंद्रमोहन कोलागणी आणि गोपाल कृष्णा यांनी सहभाग घेतला.

एका नव्या वनस्पतीचा शोध ही आनंदाची बाब असली, तरी तिची कमी होत चाललेली संख्या चिंतेचा विषय आहे. निसर्गाने दिलेला हा अनमोल ठेवा जपला नाही, तर भविष्यात ही सुंदर लाल फुले केवळ पुस्तकांमध्येच पाहायला मिळतील. त्यामुळे या दुर्मिळ वनस्पतीचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.

Read About: Giant Fungus D Rex – चीनमध्ये महाकाय बुरशीचा शोध; चिलीमध्ये 25 कोटी वर्षांपूर्वीच्या सागरी जीवाचे जीवाश्म सापडले

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.