Ad Advertisement Ad Advertisement

Diwali Folk Culture 2026 – लोकसंस्कृतीतील ‘दिवाळी’चा गोडवा!

लोकसाहित्यातील दिवाळीची विविध रूप

Diwali Folk Culture ”दीपावलीची ठायी-ठायी रूपे लोकसाहित्यात आढळतात. ती जानपद गीतांच्या निमित्ताने. पाडवा, भाऊबीज, देवदिवाळी आदी सणांच्या निमित्ताने पती-पत्नी, भाऊ-बहीण यांचे रेशीमबंध उलगडणाऱ्या अनेक ओव्या आढळतात. परंपरेने चालत आलेली ही मौखिक समृद्धी दिवाळीच्या आनंदात अधिक भर टाकते.”

महाराष्ट्रात ऋतुपरत्वे सणांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. श्रावणात शिवभक्ती, त्यानंतर गणेशभक्ती, नवरात्रौत्सव, दसरा आणि दसऱ्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, अश्विन आणि कार्तिक महिन्याच्या संधिकाळात मुख्यत्वे दीपावली हा सण साजरा करतात. दीपावलीला दीपोत्सवाच्या रूपाने महाराष्ट्रात वातीचे दिवे लावून प्रकाशमय करून साजरा केला जातो. भारतात सर्वत्र साजरा होणारा हा सण अतिप्राचीन असून, त्याला धार्मिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. या काळात लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटते. ऐन थंडीच्या काळात येणारी दिवाळी शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदमय वातावरण घेऊन येत असते. खरिपाचा हंगाम संपून रब्बीचा हंगाम सुरू होतो. खळ्या-दळ्याची रास पुजून शेतकऱ्याच्या हातांमध्ये पै-पैसा येतो.


दिवाळी उगमाचे पुरावे

लक्ष्मीच्या रूपाने ऐन दीपावलीच्या दिवशी प्रकाशमय वातावरणात धार्मिक विधी म्हणून ‘लक्ष्मीपूजन’ केले जाते. लक्ष्मीपूजनाला धार्मिक स्वरूप प्राप्त झाल्याने या उत्सवात निरनिराळ्या दिवशी विधी केले जातात. दिवाळीच्या उगमासंबंधित ऐतिहासिक पुरावे सापडतात. सम्राट अशोक दिग्विजय होऊन आल्यानंतर हा महोत्सव सुरू झाला. त्यालाच ‘दीपोत्सव’ किंवा ‘शुभ दीपावली’ असे म्हटलेले आहे. सम्राट चंद्रगुप्त, विक्रमादित्य यांच्या राज्याभिषेक समारंभात जो आनंदोत्सव साजरा केला, त्यात दीपमाळा पेटवून सगळीकडे आनंदाच्या वातावरणात दीपोत्सव साजरा केला, तेव्हापासून हा सण आजतागायत लक्ष्मीपूजनाच्या रूपाने साजरा होतो.

दानधर्म, भोजनदानाची प्रथा

धनत्रयोदशीच्या दिवशी उंच जागी तेलाचे दिवे लावून घरातील धनसंपत्तर, सोने, अलंकार स्वच्छ करून नीट ठेवतात. विष्णू, लक्ष्मी, कुबेर, गणेश या देवतांचे पूजन करून अखंड दीप लावण्याची परंपरा पुराणात सापडते. लक्ष्मीपूजन अश्विनी अमावस्याच्या दिवशी साजरी करतात. रामप्रहरी मंगल स्नान करून देवतापूजन केले जाते. चौरंगावर लक्ष्मीचे प्रतीक ठेवून लक्ष्मी, विष्णू देवता, कुबेर यांचे पूजन करतात. लक्ष्मी देवतेला लवंग-वेलची, गाईच्या खव्याचा नैवेद्य दाखवून पै-पाहुणे, आप्तेष्टांना मानसन्मानाने घरी बोलावले जाते. नंतर सामूहिक भोजनाचे आयोजन करून लाडू-करंज्या, चकल्या, शंकरपाळे, चिवडा इ. मिष्टान्न सग्या-सोयऱ्यांना देण्याची प्रथा आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि शांती लाभावी म्हणून आपल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म आणि भोजनदान करण्याची प्रथा अतिप्राचीन आहे. जिथे स्वच्छता, प्रामाणिकपणा, शोभा, रसिकता आढळते. तिथेच लक्ष्मी आकर्षित होते, अशी लोकमानसाची भावना आहे. शिवाय ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त व क्षमाशील पुरुष त्याचप्रमाणे गुणवती, पातिव्रत्य जपणारी स्त्री वास्तव्य करते, त्याच्या घरी लक्ष्मी उदार अंत:करणाने संचार करत असते.


भाऊ-बहिणीचे रेशीमबंध

मराठवाडा-महाराष्ट्र आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व भारतात दिवाळीचे स्वरूप साधारणपणे सारखेच असते. घर स्वच्छ झाडून, सारवून, रंगवून, आकाशकंदिल, तोरणे वगैरे लावून सुशोभित करतात. निरनिराळ्या राज्यात दिवाळी वेगवेगळ्या प्रकारे साजरी करतात. आनंदाच्या वृद्धीसाठी मंगलस्नान, मनोरंजक खेळ, मिष्टान्न भोजन याबरोबरच शोभेचे दारूकाम करण्याची परंपरा प्राचीन काळी केली जायची. आज त्याचे स्वरूप उत्सवी राहिले नसून, महोत्सवी झाले आहे. चंद्रज्योती, भुईचक्र, भुईनळा, फुलबाज्या, विजेच्या रोषणाईचा झगमगाटाचा आजच्या काळात अतिरेक झाला आहे. एक सांस्कृतिक परंपरा जपायची असेल, तर सौम्य फटाक्यांच्या लडी आणि कमी आवाजाचे फटाके उडवून दीपावली साजरी करावी. दीपावलीची ठायी ठायी रूपे लोकसाहित्यात आढळतात ती जानपद गीतांच्या निमित्ताने. पाडवा, भाऊबीज, देवदिवाळी आदी सणांच्या निमित्ताने पती-पत्नी, भाऊ-बहीण यांचे रेशीमबंध उलगडणाऱ्या अनेक ओव्या आढळतात. परंपरेने चालत आलेली ही मौखिक समृद्धी दिवाळीच्या आनंदात अधिक भर टाकते.
”दिन दिन दिवाळी। गायी-म्हशी ओवाळी।।
गायी म्हशी चौवर। शिंगभाई नव्वर।।
नव्वर कुणाचा। लक्ष्मीमणाचा।।
चवळण मवळण केली गुंजा।
हरकीच्या काठीला खुळखुळ गुंजा।।”
गायी-म्हशींना ओवाळणारी ही दिवाळी कृषी संस्कृतीचा उत्सव आहे. भावाशी लाडाने आणि लटक्या रागाने बोलणारी बहीण दिवाळीच्या निमित्ताने त्याला बजावते,
‘दिवाळीच्या दिशी तुझं दिवाळं काढीन।
गायी खुट्याची सोडीन, चोळी अंजिरी फाडीन।।
इतकी का बरं भावावर रागावली आहे त्याची बहीण ? कारण तो तिला माहेरी न्यायला लवकर आलेला नाही. एका बाजूला ‘बघतेच तुला’ असे म्हणून भावाच्या खुट्याची गाय सोडू पाहणारी बहीण दुसरीकडे मात्र ‘आपला कामाचा पसारा वाढलेला आहे, जरा उशिराच न्यायला ये’ असे सांगते…
‘दिवाळी-दसरा माझ्या कामाचा पसारा
सांगते बंधू माझ्या मूळ धाडावा उशिरा’
‘मूळ’ म्हणजे ‘मुऱ्हाळी’. मुऱ्हाळी उशिरा पाठव, असे ती भावाला सांगते. या मुऱ्हाळ्याला चार युक्तीच्या गोष्टी सांगायलाही बहीण मागेपुढे पाहात नाही.
”मुऱ्हाळ्या माझ्या दादा, घोडं बांधावं जाईला।
सोयऱ्याला रामराम, मग भेटावं बाईला।।”
भाजी-भाकरीच्या पाव्हण्याचं कौतुक बहिणीला असतं. ‘दिन दिन दिवाळी’ या गाण्याची अनेक रूपं लोकसाहित्यात पाहायला मिळतात. अशा लोकपंरपरेतील असंख्य म्हणी, लोकगीते, उखाण्यांनी दिवाळी सणाचा गोडवा माहेरवाशिणींनी गायिला आहे. हेच आपल्या अस्सल मऱ्हाटी संस्कृतीचे मूळ आणि खूळ आहे!

Read About : Ancient Indian Theatre and Art : नाट्यकला आणि कामशिल्पे
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.