Ad Advertisement Ad Advertisement

Bhau Beej 2026 – वेड्या बहिणीची ही वेडी माया…

भाऊबीज विशेष : लोकगीतांतील निर्मळ, पवित्र अन् अतूट बंधूप्रेम!

Bhau Beej 2026 मराठी लोकसंस्कृतीत आणि लोकगीतांमध्ये भाऊबीज या पवित्र सणाला अत्यंत भावुक आणि मानाचे स्थान आहे. दिवाळीचा झगमगाट आणि लखलखाटात भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचा उत्सव म्हणजे भाऊबीज होय. ग्रामीण भागात माय-भगिनी जात्यावर दळताना गायल्या जाणाऱ्या आशय आणि नातेसंबंधातील भावपूर्ण ओव्या, लग्नाची गाणी आणि पारंपरिक लोकगीतांमधून भाऊबीजेचे आणि भाऊ-बहिणीतील अतूट, निर्मळ, पवित्र अशा नात्यातील विविध पैलू अत्यंत सुंदरतेने, हळूवारपणे उलगडले आहेत. भाऊबीजेनिमित्त लोकगीत, लोकगाणी आणि ओव्यांतून भाऊ-बहीण यांच्या नात्यातील विणला गेलेला हा गोफ…”

मराठवाड्यासह ग्रामीण महाराष्ट्रात खेड्यापाड्यांत पूर्वी स्त्रिया पहाटे जात्यावर दळण दळताना आपल्या भावाबद्दल आणि भाऊबीजेबद्दल ओव्या गात असत. हल्ली गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी असे चित्र असले तरी सासरी गेलेल्या बहिणीला भाऊबीजेला आपल्या माहेराची आणि भावाची किती ओढ असते, याचे लोकगीतांमधील वर्णनाचा झरा आजही आटलेला नाही. लोकगीतांच्या माध्यमातून व्यक्त होणारी भाऊबीज विविध वैशिष्ट्यांनी नटलेली आहे.

वैशिष्ट्यपूर्ण सण-संस्कृती

भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांना केवळ धार्मिक किंवा पारंपरिक विधींचे स्वरूप नाही, तर मानवी नातेसंबंध अधिक दृढ करणारे सामाजिक अधिष्ठानही आहे. प्रत्येक सणामागे काही सांस्कृतिक मूल्ये, कौटुंबिक भावना आणि सामाजिक संदेश दडलेले असतात. दिवाळी हा आनंद, प्रकाश आणि समृद्धीचा उत्सव असला, तरी या उत्सवाची सांगता करणारी भाऊबीज ही नात्यांमधील प्रेम, विश्वास भावबंध आणि बांधिलकी व्यक्त करणारी अनोखी परंपरा आहे. कार्तिक शुद्ध द्वितीयेला साजरा होणारा हा सण बहीण-भावाच्या पवित्र आणि अतूट नात्याचे प्रतीक मानला जातो.

गाडी घुंगराची गं दिसते…

आली आली हो दिवाळी, बहीण भावाला ओवाळी, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, गाडी घुंगराची भाऊरायाची गं दिसते…अशा ओव्यांमधून भाऊ गाडी घेऊन किंवा घोड्यावर बसून बहिणीला घ्यायला येत असल्याचा आनंद बहिणीला झाला आहे आणि तो तिने ओवीतून व्यक्त केला आहे. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊराया रे। वेड्या बहिणीची रे वेडी माया या गीतांतूनही भाऊ-बहीणीच्या अतूट आणि वेड्या प्रेमाच्या नात्यातील वीण अधोरेखित होते.

बहीण-भावाच्या प्रेमाची वीण असलेल्या आशयावर ओव्या, लोगीतांसह चित्रपटांतूनही मऱ्हाटी धाटणीच्या एकाहून एक सरस अशा लोकगाण्यांनी लोकसाहित्यात मोलाची भर टाकली आहे. एवढेच नव्हे तर विविध प्रकारच्या ओव्या आणि लोकगीतांमध्ये माहेरची श्रीमंती आणि भावाचे कौतुक, भावाचा उल्लेख नेहमी ‘भाऊराया’ असा आदराने केलेला आढळतो. बहीण सासरी कितीही सुखात असली, तरी भाऊबीजेला भावाने दिलेली एक साधी चोळी-कापड किंवा ओवाळणी तिच्यासाठी मोलाची असते.

भावनिक लोकबंध

भाऊबीज म्हणजे केवळ बहिणीने भावाला ओवाळण्याचा विधी नव्हे, तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याचा भावनिक संकल्प आहे. बालपणापासून एकत्र वाढलेली भावंडे मोठी झाल्यानंतर शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि विवाहामुळे वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक होतात. जीवनाच्या धावपळीत भेटीगाठी कमी होतात. मात्र, भाऊबीजेच्या निमित्ताने हे नाते पुन्हा एकदा नव्याने फुलते. त्यामुळे हा सण भारतीय कुटुंबव्यवस्थेतील भावनिक एकात्मतेचा महत्त्वाचा दुवा आहे, हे पारंपरिक ओव्यांसह लोकगीतांमधून प्रकट झाले आहे.

नातेसबंधांचे पुनिर्मिलन

बहिणीचे लग्न झाल्यानंतर ती दुसऱ्या घरी म्हणजे सासरी जाते. भावाचेही शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायामुळे वेगळे आयुष्य सुरू
होते. तरीही माहेर आणि भावंडांशी असलेले नाते तिच्यासाठी भावनिक आधार ठरते. भाऊबीज हा या नात्याच्या पुनर्मिलनाचा दिवस असतो. बहिणीच्या घरी जाणारा भाऊ केवळ औक्षण करून घेण्यासाठी जात नाही, तर तिच्या सुख-दु:खात सहभागी होण्याचा संदेशही देतो, अशी आशय-विषय असलेल्या अनेक ओव्यांचे संकलन आणि संशोधन डॉ. तारा भवाळकर यांनी केले आहे.

भावाच्या सुखासाठी काय पण…

भारतीय समाजव्यवस्थेत कुटुंबसंस्थेला अनन्यसाधारण, नव्हे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कुटुंब ही केवळ एकत्र राहणाऱ्या
व्यक्तींची व्यवस्था नसून प्रेम, त्याग, सहकार्य, जबाबदारी आणि परस्परावलंबित्व यांवर उभी असलेली संस्था आहे. भाऊबीज हा सण या कुटुंबव्यवस्थेतील भावनिक नात्यांचे महत्त्व अधोरेखित करतो. भावाला ओवाळताना ती त्याच्या दीर्घायुष्याची आणि यशाची प्रार्थना करते. भावाचे घर धनधान्याने भरलेले असावे, अशी लोकगीतांमधून देवाकडे आळवणी बहीण करते, अशी असंख्य वर्णने लोकगीत आणि ओव्यांमधून आलेली आहेत.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील कोळी बांधवांमध्ये आणि इतर लोकसंस्कृतीत भाऊबीजेची खास गाणी गायली जातात. यामध्ये भावाच्या सुख-समृद्धीची कामना करतानाच भाऊ बहिणीच्या रक्षणासाठी कसा धावून येतो याचे सुंदर चित्रण असते. हल्ली सर्वत्र विभक्त कुटुंबपद्धती वाढते आहे. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्ताने अनेक कुटुंबांतील सदस्य वेगवेगळ्या शहरांत, देशांत, परदेशांत राहतात. त्यामुळे पूर्वीप्रमाणे नियमित भेटी-गाठी शक्य होत नाहीत. अशा परिस्थितीत भाऊबीज, रक्षाबंधन आणि अन्य कौटुंबिक सण नात्यांना पुन्हा एकत्र आणण्याचे काम करतात.

जिवाभावाचा अनोखा संवाद

ओवी आणि लोकगीतांमधून भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा, नातेसंबंधांचा मोरपिसारा फुललेला आहे. जिवाभावाचा मर्मग्राही संवाद यांतून साधला गेलेला आहे. कुटुंबातील नात्यांमध्ये संवाद टिकून राहणे महत्त्वाचे आहे. केवळ सणाच्या दिवशी भेटणे पुरेसे नाही, तर वर्षभर एकमेकांच्या अडचणी समजून घेणे, आजारपणात मदत करणे, आर्थिक किंवा मानसिक संकटात आधार देणे आणि आनंदाच्या प्रसंगी सहभागी होणे आवश्यक आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने सामाजिक भान आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होते, ती देखील ओव्यांमधून व्यक्त होताना आढळते.

नात्यांची वीण अधिक घट्ट

आज विभक्त कुटुंब पद्धती वाढत आहे. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्ताने अनेक कुटुंबांतील सदस्य वेगवेगळ्या शहरांत किंवा देशांत राहतात. त्यामुळे पूर्वीप्रमाणे नियमित भेटीगाठी शक्य होत नाहीत. अशा परिस्थितीत भाऊबीज, रक्षाबंधन आणि अन्य कौटुंबिक सण नात्यांना पुन्हा एकत्र आणण्याचे काम करतात, एवढेच नव्हे तर सण-उत्सव आणि मुख्यत्वे भाऊबीज, रक्षाबंधनांसारख्या सणांमधून नात्यांची वीण अधिकच घट्ट होते, असे म्हणटल्यास वावगे ठरू नये. नात्यांतील ही वीण घट्ट करण्यासाठी लोकगीतांसह ओव्यांनी मोठा हातभार लावला आहे.

कुटुंबातील नात्यांमध्ये संवाद टिकून राहणे महत्त्वाचे आहे. केवळ सणाच्या दिवशी भेटणे पुरेसे नाही, तर वर्षभर एकमेकांच्या अडीअडचणी समजून घेणे, आजारपणात मदत करणे, आर्थिक किंवा मानसिक संकटात आधार देणे आणि आनंदाच्या प्रसंगी सहभागी होणे आवश्यक आहे. भाऊबीजेनिमित्त या जबाबदारीची जाणीव निर्माण होते.

बळ अन् भावनिक आधार

विवाहानंतर स्त्रीच्या आयुष्यात अनेक बदल घडतात. नवीन घर, नवीन माणसे, नवीन जबाबदाऱ्या आणि बदललेले सामाजिक
वातावरण यांच्याशी जुळवून घेताना तिला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. अशा वेळी माहेर हे तिच्यासाठी भावनिक आधाराचे ठिकाण असते. आई-वडील आणि भाऊ-बहिणी यांच्याशी असलेले नाते तिला मानसिक बळ देते, भावनिक आधार ठरते.

भाऊबीजेच्या निमित्ताने विवाहित बहिणीला माहेरच्या माणसांची भेट घेण्याची संधी मिळते. तिच्या आयुष्यातील बदल, अडचणी आणि आनंद जाणून घेण्याची संधी भावाला मिळते. त्यामुळे भाऊबीज हा स्त्रीच्या भावनिक सुरक्षिततेशीही जोडला गेलेला एक महत्वपूर्ण असा सण आहे. आजच्या काळात पारंपरिक लोकगीतांना आधुनिक संगीताची जोड देऊन अनेक भाऊबीजेसंबंधीा अनेक विशेष गाणी लोकप्रिय झाली आहेत. ‘ओवाळीते भाऊराया’, ‘भाऊबीज आली बाई’ ही गाणी आजही प्रत्येक मराठी घरात भाऊबीजेच्या दिवशी आवर्जून ऐकली जातात आणि भाऊ-बहिणीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात. तात्पर्य लोकगीतांतील भाऊबीज म्हणजे केवळ एक सण नसून, ती मराठी संस्कृतीतील कौटुंबिक जिव्हाळा, माहेरची ओढ आणि भावा-बहिणीच्या अतूट नात्याचे जिवंत प्रतीक आहे.

  • डॉ. शेषराव पठाडे, लोकसाहित्याचे अभ्यासक

Read About : Cancer Cell Targeted Drug Delivery – कर्करोगाच्या पेशी स्वतःच तयार करणार त्यांना नष्ट करणारे औषध; जपानी संशोधकांचा अभिनव प्रयोग
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.