Ad Advertisement Ad Advertisement

AI vs Human Brain – एआय माणसासारखा विचार करू शकत नाही

मानवी मेंदू आणि कृत्रिम बुद्धिमत्तेतील नेमका फरक काय?

मॉन्ट्रियल : AI vs Human Brain – आज कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) माणसाप्रमाणे लेख लिहिते, प्रश्नांची उत्तरे देते, कविता तयार करते आणि कठीण प्रश्नही सोडवते. त्यामुळे एआय आता माणसासारखा विचार करू लागला आहे का, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, एआयचे उत्तर माणसासारखे असले तरी त्याची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. माणूस प्रत्यक्ष अनुभवातून शिकतो, तर एआय उपलब्ध माहितीच्या आधारे अंदाज बांधते. ‘द कन्व्हर्सेशन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासातून हा फरक स्पष्ट करण्यात आला आहे.

कप उचलण्याच्या साध्या कृतीतही मेंदूचे मोठे काम

समजा, टेबलवर ठेवलेला एक कप तुम्ही उचलत आहात. तो जड आहे की हलका, किती ताकद लावायची आणि तो पडणार तर नाही ना, याचा अंदाज तुमचा मेंदू घेतो. समजा, रिकामा कप भरलेला आहे असे तुम्हाला वाटले, तर तो उचलताना हात जास्त ताकद लावेल. कप हलका असल्याचे लक्षात येताच मेंदू लगेच हाताची हालचाल बदलतो. म्हणजेच, माणूस पाहून, स्पर्श करून आणि अनुभव घेऊन शिकतो.

एआयला अनुभव नसतो, ती माहितीवर काम करते

चॅटजीपीटी सारखे एआय चॅटबॉट मोठ्या प्रमाणातील माहितीचा अभ्यास करून पुढे कोणता शब्द येईल, याचा अंदाज लावतात. उदाहरणार्थ, टेबलच्या कडेला असलेला कप धक्का लागल्यामुळे खाली पडेल, असे एआय सांगू शकते. मात्र, कप हातात धरल्याचा किंवा तो फुटल्याचा प्रत्यक्ष अनुभव एआयला नसतो. त्यामुळे एखाद्या गोष्टीचे योग्य उत्तर देणे आणि ती गोष्ट प्रत्यक्ष समजणे यात फरक आहे.

‘वर्ल्ड मॉडेल्स’मुळे एआय शिकणार जगाचे नियम

एआयला प्रत्यक्ष जगातील गोष्टी समजाव्यात यासाठी ‘वर्ल्ड मॉडेल्स’ हे नवे तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. व्हिडिओ, संगणकीय प्रयोग आणि रोबोटच्या अनुभवातून एआयला वस्तू कशा वागतात हे शिकवले जाते. उदाहरणार्थ, कप जास्त जोरात पकडल्यास तो फुटू शकतो, हे रोबोटला शिकता येते.

थोडक्यात सांगायचे तर, एआय माणसाप्रमाणे उत्तरे देऊ शकते, पण माणसाप्रमाणे अनुभव घेऊ शकत नाही. कारण माणूस जगतो, पाहतो, चुका करतो आणि त्यातून शिकतो. त्यामुळे एआय कितीही प्रगत झाले, तरी योग्य उत्तर देणे आणि एखादी गोष्ट खऱ्या अर्थाने समजणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

Read About: Anti-Jamming FPV Drone – लडाखमध्ये 18000 फूट उंचीवर ‘अद्विक’ ड्रोनची यशस्वी चाचणी

E-Paper: Punyanagari E-Paperआर्थिक

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.