आगामी काळात ‘पाणीबाणी’ ची शक्यता; मराठवाडा विभागातील भीषण परिस्थिती
छत्रपती संभाजीनगर Marathwada Water Storage : मराठवाडा विभागात पाणीसाठ्याची स्थिती अतिशय चिंताजनक असून, सद्यस्थितीत एकूण ९३१ प्रकल्पांत ३७.५८ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम आणि लघु प्रकल्पांत कमी पाणीसाठा असून, पाणीपातळीत सातत्याने घट होत आहे. आगामी काळात लहान धरणांवर अवलंबून असलेल्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट होण्याची शक्यता आहे.
मोसमी पाऊस कमी झाल्यामुळे मराठवाड्यातील धरणात पुरेसा पाणीसाठा नाही. पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्याचे आदेश राज्य शासनाने काढलेले आहेत. नोव्हेंबर महिन्यातच पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे पुढील सहा महिने पाणीपुरवठा करण्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वात मोठ्या जायकवाडी धरणातील पाणी सिंचनासाठी आणि पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मोठ्या प्रकल्पांत ५१ टक्के साठा
विभागातील मोठ्या धरणात ५१.८५ टक्के पाणीसाठा आहे. ८१ मध्यम प्रकल्पात १७.२५ टक्के आणि ८०६ लघु प्रकल्पांत १३.७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विभागातील एकूण ९३१ प्रकल्पांत ३७.५८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडूप प्राप्त झाली. चार जिल्हे अवलंबून असलेल्या जायकवाडी धरणात ६९.७४ टक्के पाणीसाठा आहे. माजलगाव प्रकल्पात १९.६२ टक्के, मांजरा – ४.८९, सिद्धेश्वर – १५.६६, येलदरी – ५४.९८, विष्णुपुरी – ५९.९७, निम्न दुधना – १२.२६, निम्न तेरणा – १७.७ आणि निम्न मनार प्रकल्पात १७.८३ टक्के असा धरणनिहाय पाणीसाठा उपलब्ध आहे.
विहिरींनी गाठलाय तळ
मध्यम आणि लघु प्रकल्पासह साखळी बंधारे, कोल्हापुरी बंधारे, पाझर तलाव, शेततळे, विहिरी यात अजिबात पाणीसाठा शिल्लक नाही. विहिरींनी तळ गाठल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. रब्बी हंगामात पुरेसे पाणी नसल्यामुळे गहू व हरभरा ही पिके घेणेसुद्धा कठीण झाले आहे. दरवर्षीच्या तुलनेत रब्बीचे केवळ २० टक्के क्षेत्र राहण्याची शक्यता आहे.
लघु प्रकल्पांत १३ टक्के पाणी
लघु प्रकल्पात फक्त १३ टक्के पाणीसाठा आहे. कोरड्या लघु प्रकल्पांची संख्या जास्त आहे. एका धरणावर परिसरातील १० ते १५ गावे अवलंबून आहेत. या गावांना पिण्यासाठीही पाणी मिळत नसल्यामुळे आतापासूनच परिस्थिती गंभीर झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यातच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बीड, जालना, परभणी या जिल्ह्यांची स्थिती गंभीर आहे. जानेवारीनंतर पाणी टंचाईच्या झळा अधिक बसतील, असे अभ्यासकांनी म्हटले आहे.
जायकवाडीतून विसर्ग सुरू
जायकवाडी धरणातून रब्बी हंगामासाठी डाव्या व उजव्या कालव्यातून सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. डाव्या कालव्यातून २२०० क्युसेक आणि उजव्या कालव्यातून १३०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड या जिल्ह्यांना रब्बीत सिंचनाचा फायदा होणार आहे. या पाण्यावर शेतकऱ्यांना गव्हाचे पीक घेणे शक्य होणार आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत गव्हाची पेरणी करता येईल, असे कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले.
Read About: Anirudh Ravichander Wedding – ग्रीसमधील विवाहानंतर अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारनचे चेन्नईत जल्लोषात स्वागत
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.