भारताने आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पाकचा उडवला धुव्वा; चौहान-उल्वाची निर्णायक खेळी
अल अमेरात : India U19 Asia Cup Victory भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावरील द्वंद्वाचा प्रत्यय पुन्हा एकदा १९ वर्षांखालील एकदिवसीय आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पाहण्यास मिळाला. पाकचे ३३८ धावांचे आव्हान सर करताना भारताचा डाव अडचणीत आला होता. मात्र, मधल्या फळीतील मनल चौहान (४७) आणि दहाव्या क्रमांकावरील मोहित उल्वाने नाबाद ४९ धावांची निर्णायक खेळी उभारत भारताला अखेरच्या चेंडूवर १ गडी राखून रोमहर्षक विजय मिळूवन दिला. भारतीय युवा संघाने या बळावर या आंतरखंडीय स्पर्धेतील आपली हुकूमत कायम राखत विक्रमी नवव्यांदा आशियाई चषक पटकावला. तसेच स्पर्धेच्या गत हंगामातील अंतिम फेरीतील पाककडून स्वीकारावा लागलेल्या पराभवाचा वचपा काढला.
आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या आर्यवीर सेहवागची बॅट पुन्हा एकदा तळपली. सेहवागने आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवत ९ चौकारांनी ६१ चेंडूंत ५८ धावा फटकावल्या. कर्णधार लक्ष्य रायचंदानीने वैयक्तिक कामगिरीतील आपला हातखंडा दाखवत १०१ चेंडूंत अवघ्या ५ चौकारांनी संयमी ८० धावांची खेळी सजवली. सेहवाग-रायचंदानी जोडीने १०६ चेंडूंत ९५ धावांची सलामी दिली. त्यानंतर मधल्या फळीतील वीके विनीत (२४), अर्जुन राजपूत (१६), यशबर्दन चौहान (९) आणि अन्वय द्रविड (१९) बाद झाल्यामुळे भारताचा डाव अडचणीत आला.
मात्र, चौहानने आर्यन सावसानी (९)सोबत सातव्या गड्यासाठी ३४ धावांची भागीदारी रचत भारताला सुस्थितीत पोहचवले. विजय दृष्टिपथात आल्यानंतर खेळपट्टीवर जम बसलेला चौहान बाद झाल्यामुळे सामना रंगतदार अवस्थेत पोहचला. पण, उल्वाने (५ चौकार, ३ षटकार) अखेरच्या चेंडूपर्यंत प्रतिकार करीत तळाचा फलंदाज चिगुरुपती वेंकटसोबत १६ चेंडूंत ३० धावांची अभेद्य भागीदारी रचत पाकच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला.
अखेरच्या चेंडूवर चौकार
अंतिम षटकात भारताला विजयासाठी ८ धावांची गरज होती. उल्वा-वेंकट या अखेरच्या जोडीने या परिस्थितीत चिवट झुंज देत एकेरी आणि दुहेरी धावा काढत अखेरच्या चेंडूपर्यंत सामना खेचला. अंतिम चेंडूवर भारताला ३ धावा पाहिजे होत्या आणि उल्वाने चौकार लगावत पाकला जोरदार धक्का दिला.
सलामीवीर खानचे शतक व्यर्थ
पाकने सलामीवीर उस्मान खानच्या शतकी खेळीवर ९ बाद ३३७ धावा उभारल्या. खानने १११ चेंडूंत ११ चौकार, ३ षटकारांनी १०७ धावा काढल्या. मधल्या फळीतील अब्दुल कादिर (८०) आणि कर्णधार फरहान युसूफने ६३ धावांचे योगदान दिले. खानने जोडीदार हयाम खानसोबत ६२ धावांची सलामी दिली. त्यानंतर कादिरसोबत दुसऱ्या गड्यासाठी १३५ धावांची भागीदारी रचली. आघाडीची फळी तंबूत परतल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये पुनरागमन करत धावसंख्येला लगाम घातला. भारताकडून वेगवान गोलंदाज काव्या परेश पटेलने ६८ धावांत सर्वाधिक ४, तर चिगुरुपती वेंकटने ३ बळी घेतले.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : National Sports Awards 2026 – राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.