Hingoli road accident हिंगोली : पिकअपने दिलेल्या जोरदार धडकेत ऑटोरिक्षाचा भीषण अपघातात झाला. यात चार जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले असून मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे. औंढा नागनाथ ते परभणी मार्गावरील कळंबा पाटीजवळ सोमवारी (दि.७) दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथहून काही प्रवासी ऑटोरिक्षाने (एमएच-२२-एपी-२१४९) परभणीकडे जात होते. कळंबा पाटीजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप (एमएच ४७ वाय ७३३९) वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिली. यामुळे रिक्षा रस्त्याखाली जाऊन उलटली.
अपघातात अर्चना संभाजी थोरात (रा. गुरव पिंपरी, ता. घनसावंगी, जि. जालना), पूजा संदीप साळवे (२०, रा. सिद्धार्थनगर, औंढा नागनाथ) आणि आद्विका संदीप साळवे (२, रा. सिद्धार्थनगर, औंढा नागनाथ), ओंकार पंडीत रणखांबे (१२. रा. परभणी) यांचा मृत्यू झाला. जखमींमध्ये सुरेश दत्तराव जाधव (३५, रा. जोडजवळा, ता. वसमत), रेखा रणखांब (३०, रा. साईबाबा नगर, परभणी) आणि साई संभाजी थोरात (रा. गुरव पिंपरी, ता. घनसावंगी, जि. जालना) यांच्यासह अन्य दोघांचा यात समावेश आहे.
जखमींवर परभणीत उपचार
जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. १०८ रुग्णवाहिकेद्वारे जखमींना परभणी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच हट्टा पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत सदर घटनेप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.
