प्रतिटन टन ४००० रुपये ॲडव्हान्स, १०० टक्के पीकविमा देण्याची मागणी
येडशी Sugarcane price protest in Dharashiv : कोल्हापूरच्या धर्तीवर शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रति टन ४ हजार पेक्षा अधिकची पहिली उचल द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने धाराशिव तालुक्यातील येडशी टोलनाक्याजवळ सोमवारी (दि.१६) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते. या आंदोलनामुळे धुळे – सोलापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.
शेतकऱ्यांच्या ऊसदराच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील साखर कारखानदार व ऊस उत्पादक शेतकरी यांची संयुक्त बैठक घेऊन ऊसदराच्या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली होती. याकडे प्रशासनाने मात्र गांभीर्याने लक्ष न दिल्याचा आरोप करीत सोमवारी धुळे – सोलापूर महामार्गावर आळणी चौक येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांना ऊसाला पिकाला योग्य दर द्यावा, ऊसाला पहिली उचल ४ हजार रुपये प्रति टन यापेक्षा अधिकची द्यावी, १५ दिवसांच्या आत ऊसाचे बील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, चालु वर्षाचा खरीप हंगाम पीकविमा १०० टक्के मंजूर करून शेतकऱ्यांना विमा रक्कम वितरीत करावी, २०२३-२४ व २०२४-२५ चा राहिलेला पीकविमा शेकऱ्यांना देण्यात यावा, दुष्काळी स्थितीमुळे जनावरांना चारा शेतकऱ्यांच्या बांधावर उपलब्ध करून द्यावा.
हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत द्या
दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, या मागण्यांसाठी हे रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले. कारखानदारांकडून ऊसाला प्रति टन ३१०० रुपये पहिली उचल देण्यात येत असून जोपर्यंत धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखानदार पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर पहिली उचल प्रति टन ४ हजार रुपयेपेक्षा अधिकची जाहीर करत नाहीत, तोपर्यंत आंदोलनाचा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धारही यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष रविंद्र इंगळे, धनंजय पेंदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साखर कारखानदार, शेतकऱ्यांची उद्या बैठक
बैठक बुधवारी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदराच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या माध्यमातून संंबंधित साखर कारखानदार, गुळपट्टी, खांडसरी कारखानदार व शेतकरी प्रतिनिधी यांची बैठक बुधवारी (दि.१८) दु.३ वा. आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे आंदोलनाचा मार्ग न अवलंबता प्रशासनास सहकार्य करावे, असे पत्र अपर जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष रवींद्र इंगळे यांना दिले आहे.ही बैठक रविवारपेठ सोलापूर येथे होणार आहे.
मांजरा कारखान्यासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन
लातूर : ऊस दरावरुन वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने सुरु आहेत. पश्चिम महाराष्ट्रात अधिकचा दर दिला जात असताना मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्याय का? असे म्हणत शेतकऱ्यांनी येथील मांजरा सहकारी साखर कारखान्याबाहेर शेतकऱ्यांनी ‘हलगी नाद’ आंदोलन केले. ऊसाला ४ हजार २०० रुपये प्रति टन अंतिम दर मिळावा, अशी मागणी केली. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत ऊसाला अधिकचा दर मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी ऊसाला ४,२०० रुपये प्रति टन दर देण्याचे मान्य केले आहे, त्यामुळे लातूरमधील कारखान्यांनीही असाच दर द्यावा, याकरिता हे आंदोलन करण्यात आले. साखर कारखान्यांच्या नफ्यातील ७० टक्के हिस्सा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावा आणि उर्वरित ३० टक्के हिस्सा कारखान्यांनी स्वत:कडे ठेवावा अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी मांजरा साखर कारखान्यासमोर घोषणाबाजी केली.
Read About: Amanda Seyfried – एलिझाबेथ होम्सच्या भूमिकेवर बिली इव्हान्सची सूचक प्रतिक्रिया; म्हणाला, ‘तिला चित्रपटात घेतल्याचा आनंद’
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.