Ad Advertisement Ad Advertisement

Dr Ramlal Agrawal Tribute – आंतरराष्ट्रीय साहित्यिक डॉ. रामलाल अग्रवाल यांना श्रद्धांजली

शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा गौरव

छत्रपती संभाजीनगर : Dr Ramlal Agrawal Tribute – आंतरराष्ट्रीय साहित्यिक डॉ. रामलाल अग्रवाल यांना श्रद्धांजली- सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ सदस्य तथा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साहित्यिक डॉ. रामलाल अग्रवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संस्थेच्या वतीने सोमवारी (दि.१६) श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयातील सभागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲड. दिनेश वकील होते. डॉ. अग्रवाल यांचे ५ नोव्हेंबर २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील एक अभ्यासू व समर्पित व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. संस्थेचे ज्येष्ठ सदस्य ज्ञानप्रकाश मोदाणी यांनी आपल्या मनोगतात डॉ. अग्रवाल यांच्या साहित्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा गौरव केला.

व्यापारी पार्श्वभूमी असूनही इंग्रजी साहित्याविषयी त्यांना विशेष अभिरुची होती. त्यांच्या लेखनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली होती. संस्थेच्या जालना शाखेच्या शालेय समितीचे अध्यक्ष तसेच जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या. शिक्षण क्षेत्रातील ५५ वर्षांची त्यांची कारकीर्द प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. संस्थेचे सहचिटणीस ॲड. रामेश्वर तोतला यांनी डॉ. अग्रवाल यांच्या संस्थेप्रती असलेल्या निष्ठेचा उल्लेख केला. विविध मान्यवरांवरील त्यांचे लेख विशेष गाजले. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरील लेख उल्लेखनीय होता. साहित्याला वाहिलेल्या ‘वर्ल्ड लिटरेचर’ या आंतरराष्ट्रीय मासिकात १०० लेखकांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश होता, असे त्यांनी सांगितले. संस्थेचे सरचिटणीस डॉ. श्रीरंग देशपांडे यांनी डॉ. अग्रवाल हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इंग्रजी साहित्याचे समीक्षक असल्याचे सांगितले.

रूथ झाबवाला यांच्या इंग्रजी साहित्याचे त्यांनी केलेले समीक्षण प्रथितयश नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील उत्कटता आणि साहित्याप्रती असलेली निष्ठा विशेष उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. सहशिक्षक नंदकुमार चमचे यांनी डॉ. अग्रवाल यांच्या आठवणींना उजाळा दिला. दर रविवारी एका शिक्षकाच्या घरी जाऊन त्यांच्याशी कौटुंबिक नाते जोडण्याची त्यांची सवय होती. शाळेच्या उन्नतीसाठी शिक्षकांना सक्रिय करण्याचे त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोपात ॲड. दिनेश वकील यांनी डॉ. अग्रवाल यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला.

साहित्य क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावण्यासोबतच ते उत्तम क्रिकेटपटू आणि टेबल टेनिसपटूही होते. कोणतेही विधायक कार्य तडीस नेण्याची त्यांची वृत्ती, साधेपणा आणि सरळपणा ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती, असे त्यांनी सांगितले. या श्रद्धांजली सभेला संस्थेचे सदस्य, विविध शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन संस्थेच्या सहचिटणीस डॉ. रश्मी बोरीकर यांनी केले.

Read About : Mahavitaran Abhay Yojana – अभय योजनेचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवा
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.