२०१९ नंतर नियमित भरती नाही, कायमस्वरूपी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांचा हिरमोड
छत्रपती संभाजीनगर : ST Contract Recruitment महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) गेल्या अनेक वर्षांपासून नियमित कर्मचारी भरती रखडली आहे. २०१९ नंतर कायमस्वरूपी चालक-वाहकांची भरतीसाठी सरकारने मंजुरी दिली नाही. आता डिसेंबरमध्ये कंत्राटी पद्धतीने चालक-वाहकांची भरती होण्याची शक्यता एसटीच्या वरिष्ठ अधिका-यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नियमित भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगार तरुणांना पुन्हा कंत्राटी नोकरीवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, एसटी महामंडळ खासगी प्रवासी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी नवीन बसेस ताफ्यात दाखल करत आहे. मात्र, त्याच वेळी नियमित मनुष्यबळ भरतीऐवजी कंत्राटी पद्धतीवर भर दिला जात असल्याने महामंडळाच्या भविष्यातील कर्मचारी धोरणावर प्रश्न उपस्थित होत आहेत. यापूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ८ हजार ३०० नवीन बसेससाठी १७ हजार ७४२ कर्मचारी कंत्राटी पद्धतीने घेण्याची माहिती विधिमंडळात दिली होती. नियमित भरतीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. एकीकडे एसटीचा विस्तार आणि दुसरीकडे नियमित भरतीचा अभाव, यामुळे महामंडळाची वाटचाल नेमकी सार्वजनिक परिवहन सेवा मजबूत करण्याकडे आहे की कंत्राटी मनुष्यबळावर अवलंबित्व वाढविण्याकडे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा….
एसटीतील नियमित चालक-वाहकांना वेतनवाढ, महागाई भत्ता, नियमानुसार रजा, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), पात्रतेनुसार कर्मचारी पेन्शन योजना, ग्रॅच्युइटी आणि इतर सेवाविषयक लाभ मिळतात. दीर्घकाळ नोकरीची शाश्वती असल्याने निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनालाही आधार मिळतो. महामंडळाच्या कर्मचारी विभागाकडून या सेवाविषयक लाभांचे व्यवस्थापन केले जाते.
कंत्राटी चालक-वाहकांना कोणत्या सुविधांना मुकावे लागू शकते?….
कंत्राटी नियुक्तीमध्ये कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढ, सेवाज्येष्ठता, पदोन्नती, निवृत्तिवेतन आणि नोकरीची शाश्वती मिळेलच असे नाही. पीएफ, विमा, रजा, गणवेश, वैद्यकीय सुविधा आणि इतर लाभही संबंधित कंत्राटाच्या अटींवर अवलंबून असतात. यापूर्वी एसटीने कंत्राटी तत्त्वावर घेतलेल्या निवृत्त चालकांसाठी पीएफ, पेन्शन, रजा आणि भत्ते नसल्याच्या अटी होत्या. एका प्रकारे हा कंत्राटी कर्मचा-यांवर अन्यायच आहे.
कायमस्वरुपी भरती नेहमीच चांगली
पूर्वी शिवशाहीबसवर कंत्राटी चालक होते त्यावेळी अपघाताचे प्रमाण वाढले होते. कंत्राटी पध्दतीने आलेल्या चालकांकडून अपघाताची जास्त भिती असते. सरकारने कायम स्वरुपी भरतीला परवानगी दिली पाहिजे. कायमस्वरुपी भरती नेहमीच चांगली असते.
श्रीरंग बरगे, सरचिटणीस एसटी कर्मचारी काँग्रेस.
Read About: Shraddha Kapoor Eetha Trailer – ‘नाचता नाचता मरेन, पण इतिहास घडवून जाईन’
E-Paper: Punyanagari E-Paperक्राइम


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.