Ad Advertisement Ad Advertisement

Illegal Plotting Unauthorized Construction Action – अवैध प्लॉटिंग, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश

चिकलठाण्यातील घटनेनंतर आयुक्त येडगे यांनी घेतला आढावा : झोन अधिकारी, इमारत निरीक्षकांना देणार प्रशिक्षण

छत्रपती संभाजीनगर : Illegal Plotting Unauthorized Construction Action : शहरातील अवैध प्लॉटिंग आणि अनधिकृत बांधकामांवर नियमित लक्ष ठेवावे. शहरातील एकाही प्रभागात अवैध प्लॉटिंग, अनधिकृत बांधकाम होणार नाही, याची दक्षता सर्व सहाय्यक आयुक्त व इमारत निरीक्षकांनी घ्यावी. अवैध बांधकामे, अनधिकृत प्लॉटिंग सुरू असल्याचे निदर्शनास आल्यावर संबंधितांना नोटिस बजावून कारवाई करावी,असे आदेश मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी मंगळवारी (दि.१७) दिले.

चिकलठाणा परिसरात गट क्रमांक ४०९,४१० मध्ये सुरू असलेल्या अनधिकृत इमारतीच्या बांधकामादरम्यान स्लॅब कोसळून एका मजूराचा मृत्यू झाल्याची घटना ३० ऑक्टोबर २०२६ रोजी घडली आहे. या घटनेनंतर तब्बल ४० तासांनी स्लॅबखाली दबलेल्या मजुरांचा मृतदेह सापडला होता. या घटनेने अनधिकृत बांधकामांचा मुद्दा चर्चेत आला. अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी कठोर पावले उचलले जातील, अशी ग्वाही आयुक्त येडगे यांनी दिली होती. त्यानंतर मंगळवारी (दि.१७) त्यांनी महानगरपालिका मुख्यालयात सर्व झोन कार्यालयातील सहाय्यक आयुक्त, इमारत निरीक्षक, नगररचना विभाग व अतिक्रमण विभागाची संयुक्त बैठक घेतली.

बैठकीला अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, अतिक्रमण विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहूळे, उपायुक्त विकास नवाळे, नंदकिशोर भोंबे, नगररचनाकार कौस्तुभ भावे, उपायुक्त अतिक्रमण सविता सोनवणे आदींची उपस्थिती होती. आयुक्त म्हणाले की, प्रत्येक सहाय्यक आयुक्त व इमारत निरीक्षकांनी आपापल्या प्रभागात सुरू असलेल्या अवैध प्लॉटिंग आणि अनधिकृत बांधकामांवर नियमित लक्ष ठेवावे. अशी प्रकरणे निदर्शनास येताच संबंधितांना तातडीने नोटीस बजावून बांधकामाचे काम थांबविण्याची कारवाई करावी. ज्या इमारती नियमानुसार नियमित करता येणे शक्य आहे, त्यांना नियमानुसार नियमित करण्याची प्रक्रिया राबवावी. ज्या इमारती नियमित करता येणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करावी.

इमारत निरीक्षकांना देणार प्रशिक्षण

शहरात मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग पाडून प्लॉट विक्री तसेच बांधकामे सुरू आहेत. संबंधितांना प्लॉटिंगला व इमारतींच्या बांधकामासाठी मनपाच्या नगर रचना विभागाकडून परवानगी घेतलेली आहे का, याची पडताळणी करण्यासाठी नगररचना विभागामार्फत सहाय्यक आयुक्त व इमारत निरीक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात हे प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षणात बीपीएमएस (बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टिीम) प्रणालीचा वापर कसा करावा, याची माहिती दिली जाणार आहे.

अनधिकृत होर्डिंग, जाहीरात फलक काढा

शहरातील अनधिकृत होर्डिंग व फलकांविरुद्धची कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. विशेषत: वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे तसेच प्रथमदर्शनी धोकादायक ठरणारे होर्डिंग तातडीने हटविण्यात यावे, असे आदेश आयुक्त अमोल येडगे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Read About : Potters Free Clay Royalty – पिढीजात कुंभारांना वर्षाला 700 ब्रास माती मोफत रॉयल्टीवर
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.