Ad Advertisement Ad Advertisement

Marathwada Water Tankers Cross – मराठवाड्यात टँकरची संख्या सातशे पार

दुष्काळाची दाहकता वाढू लागली, सर्वाधिक ३६३ टँकर बीड जिल्ह्यात

छत्रपती संभाजीनगर : Marathwada Water Tankers Cross – मराठवाड्यात पाणी टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला असून विभागातील पाच जिल्ह्यांतील पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या ४५० गावे आणि २८४ वाड्यांना तब्बल ७०६ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. महिन्याभरातच टँकरची संख्या दुपटीवर गेल्याचे दिसून येत आहे. विभागातील तीन जिल्हे अद्याप टँकरमुक्त आहेत.

मराठवाडा आणि दुष्काळ ही समीकरणच बनले आहे. काही वर्षे अतिवृष्टी झाल्यामुळे त्यावर्षी दुष्काळपासून मुक्ती मिळाली होती. यावर्षी जानेवारीपासूनच टँकर सुरू झाले होते. उन्हाळ्यात तर सर्वच जिल्ह्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागला. पावसाळा सुरू झाल्यावर टँकरचा प्रश्न निकाली लागेल, अशी अपेक्षा होती. परंतु सर्वदूर अपेक्षित पाऊस झाला नाही आणि जलस्रोत आटलेल्या गावांची तहान भागविण्यासाठी ग्रामस्थांना जूननंतर देखील टँकरचा आधार घ्यावा लागला.

जुलै महिन्यात झालेल्या पावसानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात टँकरच्या संख्येत घट झाली होती. परंतु त्यानंतर अपवाद वगळता कुठेही दमदार पाऊस न झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत गेला आणि सोबतच तहानलेल्या गावांच्या संख्येसह टँकरच्या संख्येत भर पडत गेली. २० ऑक्टोबर दरम्यान विभागातील २५५ गावे आणि १८२ वाड्यांना ४४१ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. तर आजघडीला विभागातील पाच जिल्ह्यांतील पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या ४५० गावे आणि २८४ वाड्यांना ७०६ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

यात सर्वाधिक गंभीर परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यातील २१९ गावे आणि २०४ वाड्यांना ३६३ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. जिल्ह्यातील १३४ गावे आणि ३९ वाड्यांना मिळून १९८ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. जालना जिल्ह्यातील ७९ गावे आणि ४१ वाड्यांना ११७ टँकरद्वारे तर धाराशिव जिल्ह्यातील १७ गावांना २७ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तर गेल्या काही महिन्यांपासून टँकर मुक्त असलेल्या परभणी जिल्ह्यात देखील टँकर सुरू झाले आहे. या जिल्ह्यातील एका गावात एका टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि लातूर हे तीन जिल्हे सुदैवाने टँकरमुक्त आहेत.

१२३८ विहिरींचे अधिग्रहण

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन हिंगोली जिल्हा वगळता मराठवाड्यातील उर्वरित सात जिल्ह्यांतील खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. १६ नोव्हेंबरच्या अहवालानुसार एकूण १२३८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८६, जालना १२२, परभणी २७, नांदेड १, बीड २४२, लातूर ३८०, तर धाराशिव जिल्ह्यातील ३८० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

Read About : Diwali Darkness in Rural Villages – जिल्ह्यात गावगाड्यांसह शेतशिवारातील दिवाळी काळोखात
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.