राज्यात सध्या उपयुक्त पाणीसाठा ६४ टक्क्यांवर; मराठवाड्यातील स्थिती चिंताजनक, धाराशिव-जालन्यात केवळ ६ टक्के पाणी
मुंबई : Maharashtra dam water levels 2026 राज्यात यंदा झालेल्या अपुऱ्या पावसाचा परिणाम धरणांतील पाणीसाठ्यावर दिसू लागला आहे. राज्यातील ३४ महसुली जिल्ह्यांमधील ३ हजार ४२ धरणांमध्ये १७ नोव्हेंबरअखेर ९२३.६० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून तो एकूण क्षमतेच्या ६४ टक्के आहे. गतवर्षी याच दिवशी धरणांमध्ये ९० टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात २६ टक्क्यांची घट झाली आहे. विशेषत: मराठवाड्यातील धरणांची स्थिती चिंताजनक असून, आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचे नियोजन करण्याचे आव्हान जलसंपदा विभागासमोर उभे राहिले आहे.
जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील १३८ मोठ्या धरणांमध्ये ७२४.२८ टीएमसी (७१ टक्के), २६६ मध्यम धरणांमध्ये ११६.४२ टीएमसी (५७ टक्के), तर २ हजार ६३८ लघुप्रकल्पांमध्ये ८२.९१ टीएमसी (३८ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. विभागनिहाय स्थिती पाहता कोकण विभागात सर्वाधिक ८१ टक्के, पुणे विभागात ७५ टक्के, नाशिक विभागात ७४ टक्के, नागपूर विभागात ५६ टक्के आणि अमरावती विभागात ५२ टक्के पाणीसाठा आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वांत कमी ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीसाठ्याची स्थिती अधिकच गंभीर आहे. धाराशिव आणि जालना जिल्ह्यांत प्रत्येकी अवघा ६ टक्के, बीडमध्ये ८ टक्के, लातूरमध्ये ९ टक्के, तर परभणीत १३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे या भागात रब्बी हंगामासह आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती समाधानकारक
पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती तुलनेने समाधानकारक आहे. सांगली जिल्ह्यात ७३ टक्के, साताऱ्यात ७६ टक्के, कोल्हापुरात ८६ टक्के, पुण्यात ८० टक्के, तर सोलापूर जिल्ह्यात ४७ टक्के पाणीसाठा आहे. मात्र, राज्यातील प्रमुख १० मोठ्या धरणांमध्येही गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी झाला आहे. या धरणांमध्ये सध्या २७३.७६ टीएमसी म्हणजेच ६६ टक्के पाणी उपलब्ध आहे. गतवर्षी याच दिवशी ३९७.१३ टीएमसी (९६ टक्के) पाणीसाठा होता.
मुंबई, पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत ८४ टक्के पाणीसाठा
दरम्यान, मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या सहा प्रमुख धरणांमध्ये सध्या ६२.६३ टीएमसी म्हणजेच ८४ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी या धरणांमध्ये ७०.८४ टीएमसी (९५ टक्के) पाणी होते. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत या धरणांतील पाणीसाठ्यात ११ टक्क्यांची घट झाली आहे.
भातसा धरणात २८.७२ टीएमसी (८६ टक्के), तानसामध्ये ४.८३ टीएमसी (७९ टक्के), बारवीमध्ये १०.७५ टीएमसी (९० टक्के), अप्पर वैतरणामध्ये ११.०४ टीएमसी (९४ टक्के), मध्य वैतरणामध्ये ५.१९ टीएमसी (७६ टक्के), तर मोडकसागरमध्ये २.१० टीएमसी (४६ टक्के) पाणी उपलब्ध आहे.
प्रमुख धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती
धरणाचे नाव, सध्याचा पाणीसाठा, गतवर्षीचा पाणीसाठा (टक्के)
कोयना – ८०.७५ टीएमसी (८१ टक्के) – ९७ टक्के
जायकवाडी – ५१.२६ टीएमसी (६७ टक्के) – १०० टक्के
उजनी – ३३.५० टीएमसी (६३ टक्के) – १०० टक्के
गोसीखुर्द – २६.१४ टीएमसी (१०० टक्के) – ७९ टक्के
इसापूर – २०.५२ टीएमसी (६० टक्के) – १०० टक्के
खडकवासला समूह – १८.८७ टीएमसी (७४ टक्के) – ९४ टक्के
मुळा – ११.५० टीएमसी (५३ टक्के) – ९८ टक्के
Read About : Maharashtra E-Peek Pahani Deadline – ई-पीक पाहणीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.