Ad Advertisement Ad Advertisement

Bawankule about OBC – ओबीसीसाठी 6,840 कोटींच्या निधीची शिफारस; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

ओबीसी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांना गती देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक

मुंबई : Bawankule about OBC – राज्यातील 18 पगड जाती आणि ओबीसी घटकांना न्याय देण्यासाठी विधिमंडकाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि वसतिगृह बांधकामासाठी तब्बल 6,840 कोटी रुपयांच्या निधीची शिफारस करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री तथा ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला.

ओबीसी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांना गती देण्यासाठी आणि कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात बैठक पार पडली. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे आणि ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे ऑनलाइन उपस्थित होते.

‘महाज्योती’साठी 700 कोटी रुपये

केंद्र शासनाच्या एनएसपी पोर्टलवर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती प्रक्रियेसाठी 1,800 कोटी रुपये अपेक्षित असताना सध्या केवळ 83 कोटींची तरतूद असल्याने हा निधी तात्काळ वाढवून देण्याची आवश्यकता बैठकीत अधोरेखित करण्यात आली. तसेच ‘महाज्योती’साठी 700 कोटी रुपयांच्या निधीसह पुणे येथील प्रस्तावित संकुलासाठी जागा देणे आणि अनुशेष भरून काढण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली.

जानेवारीत विशेष शिबिरे

विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि भटक्या समाजातील 43 जातींना हक्काची ओळख आणि निवारा मिळवून देण्यासाठी शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. येत्या 6, 7 आणि 8 जानेवारी 2027 रोजी राज्यभरात सुमारे 500 विशेष शिबिरे आयोजित करून या घटकांना 100 टक्के जन्माचे दाखले आणि आधार कार्ड मिळवून दिले जाणार आहेत. या मोहिमेसाठी प्रत्येक सर्कलला 10 हजार रुपये दिले जातील, तसेच ओबीसींच्या विविध योजनांमार्फत बांधण्यात आलेल्या घरकुलांवर दोन महिन्यांच्या आत लाभार्थ्यांच्या नावाचे फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मार्चपासून नव्या वसतिगृहांचे बांधकाम

वसतिगृह उभारणीच्या कामात सुसूत्रता आणताना प्रत्येक जिल्ह्यात 100 आणि विभागीय जिल्ह्यांत 250 मुला-मुलींची वसतिगृहे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याबाबत एमएसआयडीसीने तयार केलेल्या आराखड्यानुसार मार्चपासून प्रत्यक्ष बांधकाम सुरू होणार आहे. सर्व वसतिगृहे पर्यावरणपूरक आणि सौरऊर्जेचा वापर करून बांधावीत तसेच 30 डिसेंबरपर्यंत सर्व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून मार्चच्या अर्थसंकल्पात 10 नवीन वसतिगृहांसाठी तरतूद करावी, अशा सूचना मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.

‘ए-कॅप’ची फाइल मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे

गोरेगाव येथील दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या न्यूझीलंड वसतिगृहात इतर मागास बहुजन कल्याण विभागाला 80 खोल्या देण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. याशिवाय, पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘ए-कॅप’ची फाइल अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली असून लक्ष्मण हाके यांच्या मागण्याही पूर्ण केल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. महात्मा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवण्यासोबतच 9 टक्के आरक्षणाचा नव्याने अभ्यास करून सांख्यिकी विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

Read About : NVIDIA CEO Succession : एआय क्रांतीला ओहोटी की स्पर्धक कंपन्यांना ‘अच्छे दिन’?

E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.