दरोड्यानंतर फिल्मी डायलॉगबाजी करत दरोडेखोरांचे पलायन
पश्चिम चंपारण : Bettiah jewellery showroom robbery बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेतिया येथे सशस्त्र दरोडेखोरांनी भरदिवसा एका सराफा दुकानावर दरोडा टाकून सुमारे ३० ते ४० कोटी रुपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, बेतियाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दरोडा मानला जात आहे. शहरातील गजबजलेल्या सुप्रिया रोडवरील ‘सेन्को गोल्ड अँड डायमंड्स’ या शोरूमवर हा दरोड पडला.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन दुचाकींवरून आलेले आठ दरोडेखोर सुरुवातीला ग्राहक असल्याचे भासवत शोरूममध्ये शिरले. काही वेळ त्यांनी शोरूममधील परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यानंतर अचानक शस्त्रे काढून तेथील कर्मचारी व ग्राहकांना ओलीस धरले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, दरोडेखोरांनी विरोध करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण करत शिवीगाळ केली. शोरूममधील ग्राहकांना एका कोपऱ्यात बसवण्यात आले, तर काहींचे हात बांधून ठेवण्यात आले. कोणालाही पोलिसांशी संपर्क साधता येऊ नये यासाठी दरोडेखोरांनी कर्मचारी आणि ग्राहकांचे मोबाईल फोनही काढून घेतले.
शस्त्रांच्या धाकामुळे शोरूममध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर दरोडेखोरांनी शोकेस आणि तिजोरीतील सोने व हिऱ्यांचे दागिने गोळा केले आणि घटनास्थळावरून पलायन केले. प्राथमिक अंदाजानुसार, दरोडेखोरांनी सुमारे ३० ते ४० कोटी रुपये किमतीचे दागिने लुटून नेले आहेत. मात्र, चोरीला गेलेल्या ऐवजाचे नेमके मूल्यांकन अद्याप सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
‘आम्ही पुन्हा येऊ, हा तर फक्त ट्रेलर आहे’
विशेष म्हणजे, दरोडा टाकून पळताना दरोडेखोरांनी अत्यंत उद्दामपणे फिल्मी संवाद फेकल्याचे शोरूममधील एका महिलेने सांगितले. ‘आम्ही पुन्हा येऊ, हा तर फक्त ट्रेलर आहे,’ असे म्हणत हे दरोडेखोर दागिन्यांसह पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपमहानिरीक्षक हरकिशोर राय, पोलीस अधीक्षक कुमार गौतम आणि पोलीस उपाधीक्षक अजित कुमार यांच्यासह विविध पोलीस ठाण्यांचा फौजफाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शोरूमची पाहणी करून कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
Read About : IndiGo Air Hostess Murder Varsha Turkar – इंडिगोच्या एअर होस्टेसची धारदार शस्त्राने हत्या
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.