Ad Advertisement Ad Advertisement

Vibha Thakur Death Case : सासरच्या दारातच विवाहितेवर अंत्यसंस्कार; विष दिल्याचा माहेरच्यांचा आरोप

लग्नाला १२ वर्षे झाल्यानंतर विभा ठाकूर यांचा संशयास्पद मृत्यू; सासरच्या मंडळींवर विष देऊन हत्या केल्याचा माहेरच्या लोकांचा आरोप, संतप्त नातेवाईकांनी सासरच्या घरासमोरच केले अंत्यसंस्कार

Vibha Thakur Death Case : बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एका विवाहित महिलेच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. विभा ठाकूर असं या ३९ वर्षीय महिलेचं नाव असून, त्यांच्या मृत्यूनंतर माहेरच्या नातेवाईकांनी थेट सासरच्या घरासमोरच अंत्यसंस्कार केले. विभा यांना जेवणातून विष देऊन मारल्याचा गंभीर आरोप त्यांच्या वडिलांनी केला आहे.

सासरी छळ केला जात असल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, विभा ठाकूर यांचं लग्न २७ नोव्हेंबर २०१४ रोजी मुझफ्फरपूर जिल्ह्यातील पताही गावात राहणाऱ्या चंदन ठाकूर यांच्याशी झालं होतं. या दाम्पत्याला १२ वर्षांची एक मुलगी आहे. लग्नानंतर पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याचा आणि विभा यांचा सासरी छळ केला जात असल्याचा आरोप त्यांच्या माहेरच्या लोकांनी केला आहे.

जेवणातून विष देण्यात आल्याचा आरोप

विभा यांना यापूर्वी सासरच्या लोकांनी घरातून बाहेर काढल्याचा दावाही त्यांच्या वडिलांनी केला आहे. कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर त्या पुन्हा सासरी राहायला आल्या होत्या. सासरच्या मंडळींकडून धमक्या मिळत असल्याची तक्रार विभा यांनी यापूर्वी केल्याचंही त्यांच्या वडिलांचं म्हणणं आहे.

१५ नोव्हेंबर रोजी जेवण केल्यानंतर विभा यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असतानाच १६ नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. यानंतर विभा यांच्या वडिलांनी जेवणातून विष देण्यात आल्याचा आरोप केला.

वडील बच्चू चौधरी यांनी पती चंदन ठाकूर, सासरे मुरारी प्रसाद ठाकूर, सासू मंजू देवी, नणंद आणि इतर कुटुंबीयांविरोधात मुझफ्फरपूरच्या सदर पोलीस स्टेशनमध्ये हत्येची FIR दाखल केली.

दरवाजासमोर लाकडं रचून तिथेच अंत्यसंस्कार

या घटनेनंतर विभा यांचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला. पोस्टमॉर्टेम झाल्यानंतर मृतदेह माहेरच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर त्यांनी मृतदेह थेट विभा यांच्या सासरच्या घरी नेला. सासरच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर लाकडं रचून तिथेच विभा यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सासरचे लोक घर सोडून फरार

या घटनेनंतर सासरचे लोक घर सोडून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी FIR दाखल केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

विभा ठाकूर यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय, त्यांना खरंच जेवणातून विष देण्यात आलं होतं का आणि या प्रकरणात कोणाचा सहभाग आहे, हे पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आणि पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. सध्या माहेरच्या नातेवाईकांनी केलेले आरोप तपासाचा विषय आहेत.

Read About : Balasaheb Thackeray Death Anniversary – संकटात असलेल्या बळीराजाला शिवसेनेकडून शक्य ती मदत; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.