Ad Advertisement Ad Advertisement

Indian Epics and Traditional Art Forms : महाकाव्ये आणि चित्रशैली

Indian Epics and Traditional Art Forms : एक लाखापेक्षा अधिक श्लोक असलेले महाभारत हे जगातील सर्वांत मोठे महाकाव्य समजले जाते. बुद्धचरित्र हे महाकाव्य लिहिणारा अश्वघोष हा पहिल्या शतकातील कनिष्क राजाचा समकालीन असावा. त्याने बुद्धाच्या जन्मापासून निर्वाणापर्यंतचे जीवन या संस्कृत महाकाव्यामध्ये मांडले आहे. त्याने सौंदरानंद, सारीपुत्रप्रकरण, सूत्रलंकार यांसारख्या साहित्यकृतीदेखील संस्कृत भाषेत लिहिल्या आहेत. गुप्त साम्राज्याच्या काळात कालिदासाने रघुवंश हे संस्कृत महाकाव्य लिहिले, ज्यामध्ये कालिदासाने राम, त्याचे पूर्वज आणि त्याचे वंशज यांचे जीवन २१ वृत्त आणि १,५६४ श्लोकांचा वापर करून रंगवले आहे. त्याने कुमारसंभव हे संस्कृत महाकाव्यदेखील लिहिले आहे, ज्यामध्ये शिवपुत्र कार्तिकेयाचे कथानक रंगवले आहे. रसनिष्पत्तीच्या बाबतीत कुमारसंभव ही कालिदासाची सर्वात उत्कृष्ट कलाकृती मानली जाते.

संस्कृतमध्ये अशी महाकाव्ये रचली जात असतानाच संगम काळामध्ये तामिळी भाषेमध्येदेखील अनेक महाकाव्यांची रचना झाली. आज जसे सिनेमाचे सिक्वेल येतात तसे दुसऱ्या शतकात शिलापदिकरम आणि मनिमेकलाई अश्या दोन महाकाव्यांची मालिका तामिळी भाषेमध्ये रचली गेली. इलांगो अडिगल यांनी शिलापदिकरम या महाकाव्यात कोवलनची पत्नी कन्नगी ही एक सामान्य गृहिणी असताना ती देवतेच्या पदाला कशी पोचली याचे वर्णन केले आहे. याच्या पुढच्या भागात म्हणजे मनिमेकलाई या महाकाव्यामध्ये कोवलनला माधवी या गणिकेपासून झालेल्या मुलीची मणिमेकलाईची कथा रंगवली आहे. या महाकाव्याचा निर्माता सीथलाई साथनार हा बौद्ध होता. ही दोन्ही काव्ये संपूर्णत: एकाच वृत्तामध्ये रचली आहेत.

महाभारत आणि रामायण यानंतर भारतातील सर्वांत मोठे महाकाव्य मणिपुरच्या मैतेई भाषेमध्ये आहे. ”खंबा थोईबी शेरेंग” नावाच्या या महाकाव्यामध्ये ३९००० श्लोक आहेत, मैतेई भाषेमधील खंबा थोईबी शेरेंग या नावाचा अर्थ होतो की ”खंबा आणि थोईबीची कविता.” खुमान जमातीचा खंबा आणि मोइरांग राज्याची राजकुमारी थोईबी, यांची प्राचीन मणिपूर म्हणजे कांगलीपाक इथे रंगलेली ही प्रेमकहाणी आहे. सामुरो प्रांतातील भाट हिजाम अंगघाल याने ही रचना केली आहे. थोईबी ही राजकुमारी पहिल्या भेटीतच गरीब, अनाथ खंबाच्या प्रेमात पडते, मात्र अतिमानवी शक्ती असलेल्या खंबाला अद्याप स्वत:ला अनेक पातळ्यांवर सिद्ध करायचे असते. तो राज्यातील स्पर्धांमध्ये भाग घेऊन धावण्याची स्पर्धा तसेच कुस्तीमध्ये जिंकतो. शेवटी पुन्हा एका हाताने पिसाळलेला बैल अडवायचे चमत्कार वगैरे करून त्याचे थोईबीसोबत लग्न होते असे कथानक या महाकाव्यात रंगवले आहे.

महाकाव्ये अथवा गुहेमधील भिंती, मानव या माध्यमातून आपली अभिव्यक्ती प्रकट करत आला आहे. मध्य प्रदेशातील भीमबेटका गुहांमध्ये आपल्याला ३० हजार वर्षांपूर्वीच्या मानवाची कलाकारी पाहायला मिळते. याच प्रकारची चित्रकला आज झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यात सोहराई आणि खोवर चित्रशैलीमध्ये पाहायला मिळते. दिवाळीनंतर येणाऱ्या सुगीच्या काळात सोहराई सण असतो. याप्रसंगी घराच्या भिंती रंगवल्या जातात म्हणून त्यास सोहराई म्हणतात. माती आणि शेणाने भिंती सारवून घेतल्या जातात. नंतर त्यावर पांढरा थर द्यायचा. नंतर चिखल किंवा रंगात बुडवलेल्या हाताची बोटं आणि काड्या यांचा वापर करून भिंतीवर रचना करायची. ही रचना करताना मानवाचे निसर्गाशी नाते जोडायचे. काव, कोळसा आणि तांदळाचे पीठ रंग तयार करण्यासाठी वापरायचे. रोजच्या जीवनातील शिकार, शेती यांसारखे प्रसंग हे चित्राचे विषय असतात. सुफलाम जमिनीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लाल रंग, शंकराचे प्रतीक म्हणून काळा आणि आलेल्या समृद्धीसाठी पांढरा रंग वापरून भिंतीवर वेगवेगळे आकार साकारायचे.

खोवर चित्रकला ही लग्नविधींशी संबंधित असलेली तसेच प्रजननक्षमतेचे चित्रण करणारी एक पवित्र कला समजली जाते. चित्र रंगवताना एकच रंग वापरला जातो. भिंतीला पूर्ण काळ्या रंगाने रंगवून तिला गर्भाशयाचे रुप द्यायचे, मग त्यावर शुक्राणूचे प्रतीक असलेला चिखलाचा पांढरा थर चढवायचा. हा थर अर्धवट वाळलेला असेल तेव्हाच कंगव्याच्या साह्याने विविध आकार कोरायचे. पशुपक्षी, फुलांचा आकार वापरून एक कृष्णधवल चित्र तयार करायचे. नवदाम्पत्याची खोली असेल तर त्यात गर्भवती लांडोर रंगवणे शुभ समजले जाते. भारतामध्ये वारली, मधुबनी यांसारख्या चित्रशैली हजारो वर्षांपूर्वी उदयाला आल्या, ज्या आज जगप्रसिद्ध झाल्या आहेत. वारली चित्रकलेचे पुरावे आपल्याला अगदी पाच हजार वर्षांपूर्वीच्या काळात घेऊन जातात. बांबूपासून आपली झोपडी बनवून ती चिखल आणि शेणाने सारवून घेतली जाते. त्यावर कावेचा रंग दिला जातो. त्यावर मग स्त्रिया पांढऱ्या रंगाच्या साह्याने छान आकृत्या काढतात. भिजवलेल्या तांदळाचे पीठ दळून, मळून पांढरा रंगाचा खडू तयार केला जातो.

वारली चित्रांमध्येदेखील आपल्याला निसर्गाची पूजा आढळते. इथे तुम्हाला कोणतेही नागरी संस्कृतीतील देवदेवता आढळणार नाही. गोल, त्रिकोण असे सोपे आकार वापरून आदिवासींच्या रोजच्या जीवनातील पशू, पक्षी, पाने, फुले, नृत्याचे प्रसंग, वाघोबा, नागोबा यांसारखे देव वारली चित्रात साकारलेले असतात. मधुबनी शैली ही रामायणातील जनक राजाच्या काळापासून सुरू आहे असे संगितले जाते. जनक राजाने सीतेचे स्वयंवर आणि रामासोबत लग्न हे प्रसंग चितारण्यासाठी अनेक चित्रकार मिथिलेच्या दरबारात बोलावले होते. सुरुवातीला भिंतीवर असलेली ही चित्रशैली आता कागदांच्या माध्यमातून जगभर पोचली आहे. सारवलेल्या भिंती आणि तांदळाचे पीठ यावर वेगवेगळ्या नैसर्गिक रंगांचे कुंचले, हाताची बोटं, काड्या, फांद्या यांच्या साह्याने वापर करून निसर्ग आणि पुराणातील पशुपक्षी तसेच मानवी पात्रे रंगवली जातात. वारली चित्रांप्रमाणे मधुबनी चित्रकलेचेदेखील स्त्रियांच्यामार्फत वहन, जतन आणि संवर्धन झाले आहे. आजीकडून आईला आणि आईकडून मुलीला ही कला शिकवली जाते आणि कलेचा हा समृद्ध वारसा जपला जातो.

नितीन हांडे
संपर्क : ८९५६४४५३५७

Read About : Ancient Indian Theatre and Art : नाट्यकला आणि कामशिल्पे
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.