कुठे पोषण जास्त, तर कुठे ओमेगा-३ ची मात्रा, ९ देशांतील संशोधनातून नवे वास्तव समोर
नवी दिल्ली : Breast Milk Nutrition – आईचे दूध म्हणजे नवजात बाळासाठी निसर्गाने दिलेले अमूल्य वरदान. बाळाच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पण प्रत्येक देशातील आईच्या दुधात पोषक घटकांचे प्रमाण सारखेच असते का? नऊ देशांतील ३०५ मातांच्या दुधाचा अभ्यास केल्यानंतर संशोधकांना याचे आश्चर्यकारक उत्तर मिळाले आहे. काही देशांतील मातांच्या दुधात ऊर्जा आणि चरबीचे प्रमाण अधिक, तर काही देशांत ओमेगा ३ सारख्या महत्त्वाच्या घटकांचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे.
नॉर्वेच्या मातांच्या दुधात सर्वाधिक ऊर्जा
स्वित्झर्लंडमधील नेस्ले रिसर्च आणि नेदरलँडमधील ग्रोनिंगन विद्यापीठाच्या संशोधकांनी हा अभ्यास केला. फ्रान्स, इटली, नॉर्वे, पोर्तुगाल, रोमानिया, स्पेन, स्वीडन, फिलिपिन्स आणि सिंगापूर या नऊ देशांतील मातांच्या दुधाचे नमुने तपासण्यात आले.
अभ्यासानुसार, नॉर्वेतील मातांच्या दुधात सर्वाधिक ऊर्जा म्हणजे ८३.०५ किलोकॅलरी आणि ५.२९ ग्रॅम चरबी प्रति १०० मिली आढळली. याउलट इटलीतील मातांच्या दुधात ऊर्जा ५८.७० किलोकॅलरी आणि चरबी २.८५ ग्रॅम होती.
ओमेगा-३ मध्ये नॉर्वे, तर सॅच्युरेटेड फॅटमध्ये फिलिपिन्स आघाडीवर
दुधातील सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण फिलिपिन्समध्ये सर्वाधिक ५२ टक्के होते. तर ओमेगा-३ फॅटी ॲसिडचे प्रमाण नॉर्वेमध्ये सर्वाधिक २.४९ टक्के आढळले. डीउचए आणि इपीए हे ओमेगा-३ मधील महत्त्वाचे घटक बाळाच्या मेंदू आणि मज्जासंस्थेच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जातात.
मेंदूच्या विकासाशी संबंधित घटकांतही फरक
संशोधकांनी दुधातील जीएम ३ आणि जीडी ३ या गँग्लिओसाइड्सचाही अभ्यास केला. हे घटक बाळाच्या मेंदू आणि मज्जासंस्थेच्या विकासाशी संबंधित आहेत. त्यांचे प्रमाणही वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे आढळले.
मात्र, एखाद्या देशातील मातांच्या दुधात हे घटक अधिक असल्याने तेथील बाळांची वाढ अधिक चांगली होते, असे या संशोधनातून सिद्ध झालेले नाही. आईचा आहार आणि इतर कारणांचाही दुधाच्या पोषणमूल्यांवर परिणाम होऊ शकतो.
एकूणच, आईचे दूध हे प्रत्येक बाळासाठी निसर्गाचे अनमोल वरदान आहे. मात्र, त्यातील पोषक घटकांचे प्रमाण जगभर सारखे नसते, हे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. आईच्या दुधातील या वेगवेगळ्या घटकांचा बाळाच्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो, हे शोधणे आता संशोधकांसमोरचे महत्त्वाचे आव्हान आहे.
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.