भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड म्युलर यांची नेमेसिस ताऱ्याची संकल्पना; ऊर्ट क्लाऊडमधील धूमकेतूंच्या कक्षांमध्ये बदल होऊन पृथ्वीवर उल्कापाताचा धोका निर्माण होऊ शकतो, असा सिद्धांत
कॅलिफोर्निया : Nemesis Sun Twin Star Theory सुमारे ६.६ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर आदळलेल्या महाकाय अवकाशीय वस्तूमुळे डायनासोर नामशेष झाले, हे वैज्ञानिक जगतात मान्य असलेले स्पष्टीकरण आहे. मात्र, ही वस्तू पृथ्वीच्या दिशेने आलीच कशी, याबाबत एक वेगळा सिद्धांत पुन्हा चर्चेत आला आहे. सूर्याला एक अदृश्य जुळा तारा असून त्याच्या हालचालींमुळे धूमकेतूंचा वर्षाव होतो आणि त्यातून पृथ्वीवर विनाशकारी घटना घडू शकतात, असा दावा भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड म्युलर यांनी केला आहे.
कॅलिफोर्निया विद्यापीठातील बर्कले येथील म्युलर यांच्या मते, ‘नेमेसिस’ नावाचा हा संभाव्य तारा लाल छोट्या प्रकारातील असू शकतो. सूर्य आणि नेमेसिस हे गुरुत्वमध्याभोवती फिरत असल्याची त्यांची कल्पना आहे. त्यामुळे हा तारा अत्यंत दूर आणि अंधुक असल्याने अद्याप दुर्बिणींना सापडला नसावा, असे त्यांचे म्हणणे आहे.
दर २६ दशलक्ष वर्षांनी धूमकेतूंची गर्दी?
या सिद्धांतानुसार नेमेसिस दर २६ दशलक्ष वर्षांनी सूर्यमालेच्या बाहेरील भागातील ‘ऊर्ट क्लाऊड’जवळून जातो. तेथील बर्फाळ अवकाशीय वस्तूंच्या कक्षांमध्ये बदल होऊन अनेक धूमकेतू अंतर्गत सूर्यमालेकडे वळू शकतात. हा वर्षाव तब्बल दहा लाख वर्षांपर्यंत सुरू राहण्याची शक्यता म्युलर यांनी व्यक्त केली आहे. पुढील संभाव्य घटना सुमारे १.२ कोटी वर्षांनी घडू शकते, असाही त्यांचा अंदाज आहे.
सिद्धांताला वैज्ञानिक आव्हान
१९८२ मधील एका संशोधनात सागरी जीवांच्या नामशेष होण्याच्या घटनांमध्ये साधारण २६ दशलक्ष वर्षांचे चक्र असल्याचा दावा करण्यात आला होता. त्याचा आधार घेत नेमेसिसची कल्पना मांडली गेली. मात्र, २०१४ मध्ये पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या संशोधकांनी नासाच्या ‘वाईज’ दुर्बिणीच्या निरीक्षणांत असा तारा आढळला नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नेमेसिसचे अस्तित्व अद्याप सिद्ध झालेले नाही.
Read About : Giant Baobab Trees – 5 महाकाय बाओबाब झाडे वाचवण्याची धडपड
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.