Advertisement Advertisement

Kerala Alert : विहिरीच्या पाण्यामुळे अमिबाजन्य मेंदूज्वराचा धोका तिप्पट, ICMR चा मोठा खुलासा

अक्लोरिनयुक्त विहिरीच्या पाण्यामुळे अमिबिक मेनिन्गोएन्सेफलायटीसचा वाढता धोका

तिरुवनंतपुरम : केरळममध्ये गेल्या काही काळापासून चिंतेचा विषय ठरलेल्या अमिबिक मेनिन्गोएन्सेफलायटीस म्हणजेच अमिबाजन्य मेंदूज्वराबाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयसीएमआर(ICMR) आणि केरळ (Kerala) आरोग्य विभागाच्या संयुक्त अभ्यासानुसार, घरातील विहिरींचे अक्लोरिनयुक्त (क्लोरिन न टाकलेले) पाणी हा या जीवघेण्या आजाराचा एक प्रमुख धोकादायक घटक असल्याचे स्पष्ट झाले आहे. केरळमधील एक मोठी लोकसंख्या दैनंदिन वापरासाठी विहिरीच्या पाण्यावर अवलंबून असल्याने या निष्कर्षाने खळबळ उडवून दिली आहे

विहिरीच्या पाण्यामुळे आजाराचा धोका तब्बल तिपटीने जास्त

चेन्नई येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी (ICMR -National Institute of Epidemiology) च्या तज्ज्ञांनी केलेल्या सखोल संशोधनातून असे दिसून आले आहे की, जे नागरिक विहिरीच्या अक्लोरिनयुक्त पाण्याने आंघोळ करतात किंवा चेहरा धुतात, त्यांना अकॅन्थामिबा मुळे होणाऱ्या मेंदूज्वराचा धोका तब्बल २.९५ पटीने अधिक असतो. संशोधकांच्या मते, जर सर्व विहिरींच्या पाण्यात नियमितपणे आणि योग्य प्रमाणात क्लोरिनचा वापर केला गेला, तर या आजाराचे सुमारे ३४.२% रुग्ण कमी करता येणे सहज शक्य आहे.

तलाव, कालव्यांमध्ये पोहणे ठरतेय अधिक घातक

या अभ्यासात इतर नैसर्गिक जलस्रोतांबाबतही धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. तलाव, नद्या किंवा कालव्यांच्या साचलेल्या पाण्यात पोहणे किंवा सूर मारल्यामुळे या अमिबाचा संसर्ग होण्याचा धोका ४.७ पटीने वाढतो. धक्कादायक बाब म्हणजे, जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर आधीच काही जखमा किंवा अल्सर असतील आणि ती व्यक्ती अशा दूषित पाण्याच्या संपर्कात आली, तर हा धोका थेट २५.४ पटीने वाढतो. २०२५ च्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये आढळलेले बहुतांश रुग्ण हे सामान्यत: ब्रेन-ईिंटग अमिबा मुळे नसून, प्रामुख्याने अकॅन्थामिबा प्रजातीमुळे बाधित झाले होते.

आजाराची लक्षणे, शरीरावर होणारा परिणाम

हा आजार अत्यंत दुर्मिळ असला तरी मानवी शरीराच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर थेट हल्ला करतो. सर्वसामान्यपणे यामध्ये खालील तीन प्रकारच्या शक्यता किंवा लक्षणे रुग्णामध्ये दिसून येतात
१. तीव्र डोकेदुखी आणि ताप : संसर्ग झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णाला असह्य डोकेदुखी, तीव्र ताप, चक्कर येणे आणि उलट्यांचा त्रास होतो.
२. मान आखडणे आणि मानसिक संभ्रम : अमिबा मेंदूपर्यंत पोहोचल्यास मान आखडते, प्रकाशाचा त्रास होतो, रुग्णाची मन:स्थिती गोंधळलेली होते आणि गंभीर रुग्णांना झटके येऊ लागतात.
३. त्वचा आणि सायनसचा संसर्ग : अकॅन्थामिबा हा त्वचेवरील उघड्या जखमांमधून किंवा श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करत असल्याने, मेंदूज्वरापूर्वी त्वचा किंवा सायनसचा तीव्र संसर्ग देखील उद्भवू शकतो.