Ad Advertisement Ad Advertisement

Gaganyaan Mission Latest Update : गगनयान मोहिमेला विलंब नाही, इस्रो प्रमुखांचा खुलासा

रॉकेटचे सर्व सुटे भाग तयार; ऑर्बिटल मॉड्यूलवर काम सुरू असल्याची इस्रो अध्यक्ष व्ही. नारायणन यांची माहिती, खासगी उद्योगांचा सहभाग

नवी दिल्ली : Gaganyaan Mission Latest Update भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘गगनयान’ मोहिमेला कोणताही विलंब झालेला नसून मोहिमेची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. रॉकेटचे सर्व सुटे भाग तयार झाले असून सध्या ‘ऑर्बिटल मॉड्यूल’वर काम सुरू आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी मंगळवारी दिली. लवकरात लवकर मिळणाऱ्या पहिल्या संधीत या मोहिमेचे प्रक्षेपण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

येथे आयोजित पाचव्या भारतीय आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषदेच्या निमित्ताने ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. डिसेंबर २०२६ चे उद्दिष्ट पुढे ढकलले असून गगनयानची पहिली मानवरहित मोहीम फेब्रुवारी २०२७ पूर्वी प्रक्षेपित होण्याची शक्यता नसल्याचे वृत्त काही माध्यमांत प्रसिद्ध झाले होते. या पार्श्वभूमीवर नारायणन यांनी हे स्पष्टीकरण दिले. ”ही अतिशय तंत्रज्ञानकेंद्रित मोहीम आहे आणि तिला कोणताही विलंब झालेला नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

खासगी उद्योगांचा वाढता सहभाग आणि ‘पीएसएलव्ही’ निर्मिती

भारताच्या अवकाश कार्यक्रमात खासगी उद्योगांचा सहभाग वाढवण्यासाठी सरकारने मोठी पावले उचलल्याचे नारायणन यांनी नमूद केले. प्रक्षेपण वाहनांची (रॉकेट) निर्मिती आता खासगी भागीदारांकडे सोपवली जात आहे. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनाचा (पीएसएलव्ही) संदर्भ देत ते म्हणाले की, पूर्वी उद्योगांच्या मदतीने केवळ ‘इस्रो’च याची निर्मिती करत असे. आता एल अँड टी आणि एचएएल यांच्या समूहाकडे पाच ‘पीएस्एलव्ही’ रॉकेटच्या निर्मितीचे काम सोपवण्यात आले आहे. पुढील वर्षी पहिले प्रक्षेपक सज्ज करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

‘विक्रम’ प्रोसेसर विकसित

उपग्रह आणि प्रक्षेपण वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक सुटे भाग आणि संगणक चिप्स लागतात. पूर्वी हे सर्व साहित्य आयात करावे लागत होते. मात्र, आता चंडीगड येथील सेमीकंडक्टर प्रयोगशाळेच्या (एससीएल) सहकार्याने इस्रोने स्वदेशी ‘विक्रम’ प्रोसेसर विकसित केला आहे. ‘विक्रम १६’ मालिका आधीच वापरात असून आता ‘विक्रम ३२’ चिप देखील तयार झाली आहे आणि लवकरच ती बाजारात आणली जाईल, असे नारायणन यांनी सांगितले.

४४० हून अधिक अवकाश स्टार्टअप्सची भरारी

संदेशवहन, दिशादर्शन आणि पृथ्वी निरीक्षण यासाठी भारताला मोठ्या प्रमाणात अतिरिक्त उपग्रहांची गरज आहे आणि ही गरज केवळ सरकारी क्षेत्राकडून पूर्ण होऊ शकत नाही. सध्या भारताकडे ५६ उपग्रह आहेत. केंद्र सरकारच्या अवकाश क्षेत्रातील सुधारणा आणि ‘इन-स्पेस’च्या पाठबळामुळे देशातील अवकाश स्टार्टअप्सची संख्या एकावरून ४४० हून अधिक झाली आहे. पुढील पाच वर्षांत याचे मोठे फायदे देशाला पाहायला मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘तंत्रज्ञान मागणारा’ ते ‘तंत्रज्ञान देणारा’ देश

आंतरराष्ट्रीय सहकार्याबाबत बोलताना इस्रो प्रमुख म्हणाले की, भारत सध्या ६४ देशांसोबत काम करत आहे. एक काळ असा होता जेव्हा आपण तंत्रज्ञानासाठी इतर देशांकडे पाहत होतो, पण आज भारत जगाला तंत्रज्ञान देणारा देश बनला आहे. गेल्या १२ वर्षांत भारताने ३४ देशांसाठी ४०० हून अधिक उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. विकसित भारत २०४७ चे स्वप्न साकार करण्यासाठी उद्योग, स्टार्टअप्स आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन देशाची अवकाश परिसंस्था अधिक बळकट करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Read About : Space Plant Disease Experiment : चंद्र आणि मंगळावर शेतीसाठी अंतराळात वनस्पतींची चाचणी

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.