Advertisement Advertisement

El Nino Drought: ‘एल निनो’चा भीषण तडाखा, विहिरी कोरड्या, पिके उद्ध्वस्त, उपासमारीची वेळ

८५ ते १०० टक्के पावसाची तूट, जलाशयांमध्ये केवळ १० टक्के पाणी

गॅलवेला याया (Sri Lanka) : यंदाच्या मोसमात युरोपने भाजून काढणारा उन्हाळा, घरदार उध्वस्त करणारा पावसाळा दक्षिण आशियाने तर जंगले नष्ट करणारे वणवे आफ्रिकेने अनुभवले. हवामान बदलाच्या फटक्यात आता श्रीलंका सापडला आहे. श्रीलंकेला ‘एल निनो’ (El Nino) मुळे गेल्या काही दशकांतील सर्वात भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

देशातील प्रमुख शेती क्षेत्रांमध्ये सरासरीच्या तुलनेत तब्बल ८५% ते १००% पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. अतिउष्णतेमुळे श्रीलंकेतील उत्तर, पूर्व आणि दक्षिण भागातील नद्या, तलाव आणि छोटे पाण्याचे साठे कोरडेठाक पडले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, शेकडो जलाशयांची पाणी पातळी अवघी १० टक्क्यांवर आली आहे.

ग्रामीण भागात आणि महामार्गांवरील घरांमध्ये दर ३ ते ५ दिवसांनी टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. मात्र, दुर्गम भागातील नागरिकांना पाण्यासाठी २३-२३ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, यंदाचा ‘एल निनो’ हा आजवरचा सर्वात तीव्र (‘सुपर एल निनो’) ठरण्याची शक्यता असून यामुळे आगामी काळात अन्न आणि पाण्याचे संकट आणखी गंभीर होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न शून्यावर

पाण्याच्या तुटवड्यामुळे पिके करपली असून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न पूर्णपणे थांबले आहे. शेतकरी पथमासेना यांनी सांगितले की, दुष्काळापूर्वी ते चवळीच्या लागवडीतून महिन्याला २०,००० श्रीलंकन रुपये (सुमारे ६० अमेरिकन डॉलर्स) कमावत होते. मात्र, पिके नष्ट झाल्यामुळे आता त्यांना जगण्यासाठी मजुरी करावी लागत आहे. मोणरागाला या जिल्ह्यातील नागरिक निळ्या प्लास्टिकच्या ड्रमसह पाण्याच्या टँकरची वाट पाहत उभे असतात, तर कपडे धुण्यासाठी व आंघोळीसाठी लोक कूपनलिकेवर गर्दी करत आहेत.

उपासमारीची वेळ

उष्णतेमुळे आणि पाण्याच्या अभावामुळे त्यांच्या मुलाचा पोल्ट्री फार्म (कुक्कुटपालन) बंद पडला आहे. ‘ज्या दिवशी काम मिळत नाही किंवा घरात काही नसते, त्या दिवशी आम्हाला उपाशी झोपावे लागते,’ अशी व्यथा शेतकरी पथमासेना यांनी मांडली.