७ कोटींच्या सोन्याच्या शवपेटीत झाले अंत्यसंस्कार
लंडन : (Tiny Ubiribo Dies After Cosmetic Procedure in Thailand) लिंगाचा घेर वाढवण्यासाठी थायलंडमध्ये घेतलेल्या कॉस्मेटिक इंजेक्शनच्या प्रक्रियेनंतर ब्रिटिश-नायजेरियन व्यावसायिक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर इघो ‘टायनी’ उबिरिबो यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ६ मार्च २०२६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. मात्र, लंडनमधील चौकशीदरम्यान त्यांच्या मृत्यूचे कारण आता उघड झाले आहे.
लंडनच्या इनर वेस्ट लंडन कोरोनर्स कोर्टात झालेल्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, बँकॉकमधील एका क्लिनिकमध्ये उबिरिबो यांच्या लिंगाच्या घेरात वाढ करण्यासाठी सुमारे ४० मिली हायलुरॉनिक ॲसिड आणि लिडोकेनचे इंजेक्शन देण्यात आले. ५ मार्चला प्रक्रिया झाल्यानंतर ते पत्नी डॅनिएल सिम्बा ॲलन यांच्यासोबत मसाजसाठी गेले.
मसाजदरम्यान उबिरिबो यांच्या छातीत दुखू लागले आणि ते दोनदा बेशुद्ध पडले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना पल्मनरी एम्बोलिझम झाल्याचे निदान झाले. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर १०० मिनिटांहून अधिक काळ हृदय-फुफ्फुस पुनरुज्जीवन प्रक्रिया करण्यात आली; मात्र त्यांचा जीव वाचू शकला नाही.
शवविच्छेदनात इंजेक्शनमधील पदार्थाचा संबंध
चौकशीदरम्यान त्यांच्या फुफ्फुसांमध्ये आढळलेला पदार्थ इंजेक्शनमध्ये वापरलेल्या हायलुरॉनिक ॲसिडशी जुळत असल्याचे सांगण्यात आले.
सोन्याच्या शवपेटीत अंत्यसंस्कार
उबिरिबो सोशल मीडियावर लक्झरी जीवनशैलीसाठी प्रसिद्ध होते आणि त्यांचे १.८५ लाखांहून अधिक इन्स्टाग्राम फॉलोअर्स होते. त्यांच्या मृत्यूनंतर लंडनमध्ये तब्बल ७ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या सोन्याच्या शवपेटीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे वृत्त आहे.
