एनआयसीडीसीच्या प्रगती अहवालातून विकासाचा वेग स्पष्ट :
राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत २० प्रकल्पांवर काम; शेंद्रा-बिडकीनमध्ये पायाभूत सुविधा पूर्ण, उद्योगांना चाचणी व गुणवत्ता तपासणीची सुविधा
छत्रपती संभाजीनगर :Shendra Bidkin Industrial Area दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरअंतर्गत विकसित होत असलेल्या ऑरिक शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला वेग मिळत असून, छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वाच्या सुविधा उभ्या राहत आहेत. नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने जानेवारी ते जून २०२६ या कालावधीतील प्रसिद्ध केलेल्या वृत्तपत्रिकेतून देशातील औद्योगिक कॉरिडॉर आणि स्मार्ट इंडस्ट्रियल सिटींच्या प्रगतीचा आढावा मांडला आहे.
या अहवालानुसार, शेंद्रा औद्योगिक क्षेत्रातील २ हजार ७३ एकर क्षेत्रातील मुख्य पायाभूत सुविधांची कामे २०१९ मध्ये, तर बिडकीनच्या पहिल्या टप्प्यातील २ हजार ४८७ एकर क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे २०२१ मध्ये पूर्ण झाली आहेत. ऑरिक सभागृहाचेही उद्घाटन झाले असून, वैद्यकीय महाविद्यालय, कौशल्य विकास केंद्र, हॉटेल्स आणि इंधन केंद्रांसारख्या सामाजिक पायाभूत सुविधांची उभारणी सुरू आहे.
शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीची क्षमता असल्याचे राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास महामंडळाच्या (ठकउऊउ) जानेवारी ते जून २०२६ या वृत्तपत्रिकेतील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ऑरिकमध्ये आतापर्यंत ३ हजार ४६२ एकर जमीन वितरित करण्यात आली असून, ३४० औद्योगिक भूखंडांचे वाटप झाले आहे. या औद्योगिक क्षेत्रात ९२ हजार ६४० कोटी रुपयांची गुंतवणूक क्षमता असून, त्यातून ६५ हजार ६६२ रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्रात ३,४६२ एकर जमीन वितरित; ३४० भूखंडांचे वाटप, आणखी ७४३ एकर औद्योगिक वापरासाठी उपलब्ध आहे.
शेंद्रा-बिडकीनमधील जमिनीचा दर १.६२ कोटी रुपये
एनआयसीडीसीच्या अहवालातील जमीन दरांच्या तुलनेत शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्रातील जमिनीचा अंदाजित दर प्रति एकर १.६२ कोटी रुपये आहे. हा दर गुजरातमधील धोलेरा औद्योगिक क्षेत्राइतकाच आहे. गुंतवणुकीसाठी तयार असलेली जमीन तुलनेने आकर्षक दरात उपलब्ध असल्याचेही वृत्तपत्रिकेत नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, देशभरात १०० गुंतवणूकक्षम प्लग-अँड-प्ले औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने भारत औद्योगिक विकास योजना (इऌअश्अ) सुरू केली आहे. या योजनेसाठी ३३ हजार ६६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात २० औद्योगिक पार्क विकसित करण्याचे नियोजन आहे.
उद्योगांसाठी राष्ट्रीय चाचणी प्रयोगशाळा
छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक विकासातील महत्त्वाची घडामोड म्हणजे १९ जून २०२६ रोजी ऑरिक येथे नॅशनल टेस्ट हाऊस (ठळऌ) च्या उपग्रह चाचणी प्रयोगशाळा आणि नमुना संकलन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. एनआयसीडीसीच्या सहकार्याने उभारण्यात आलेली ही सुविधा शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्रासह मराठवाड्यातील उद्योगांसाठी उपयुक्त ठरणार आहे.या केंद्रामार्फत उत्पादनांची चाचणी, कॅलिब्रेशन, नमुना संकलन आणि गुणवत्ता हमी यासंबंधी सेवा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे उत्पादनांच्या चाचणीसाठी लागणारा कालावधी कमी होण्याबरोबरच उद्योगांचा अनुपालन खर्च कमी होऊन उत्पादनांची गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता वाढण्यास मदत होणार आहे.
देशभरात २० औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्प
राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत देशातील १३ राज्यांमध्ये ११ औद्योगिक कॉरिडॉर आणि २० प्रकल्प राबविण्यात येत आहेत. यामध्ये चार स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी विकसित झाल्या असून, आणखी १६ शहरांच्या विकासाचे काम सुरू आहे. या कार्यक्रमाचा एकूण प्रकल्प खर्च ५० हजार ७५९ कोटी रुपये असून, सुमारे १४ लाख रोजगारनिर्मितीची क्षमता अपेक्षित आहे. यासाठी ४९ हजार १२० एकर क्षेत्र निश्चित करण्यात आले असून, गुंतवणुकीची संभाव्यता ५.३५ लाख कोटी रुपये असल्याचे अहवालात नमूद आहे.
ऑरिकमध्ये कोणत्या क्षेत्रांना संधी?
औद्योगिक कॉरिडॉरच्या उद्योगविषयक सादरीकरणात वाहननिर्मिती व इलेक्ट्रिक वाहने, इलेक्ट्रॉनिक्स, ऊर्जा, तेल व वायू, रसायने व औषधनिर्मिती, धातू व साहित्य, पायाभूत सुविधा, अन्नप्रक्रिया तसेच अभियांत्रिकी व उत्पादन क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. टोयोटा, महिंद्रा, एंड्युरन्स, युनो मिंडा, पॉलीकॅब, हायर, सीमेन्स, टोरेंट, गोदावरी पॉवर यांसारख्या कंपन्यांची नावेही उद्योग उपस्थितीच्या सादरीकरणात दिसतात. मात्र ही यादी विविध एनआयसीडीसी शहरांतील उद्योगांची एकत्रित माहिती आहे.
Read About : Mercury to Gold : पाऱ्यापासून सोने बनवणे शक्य आहे का?
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.