जखमी मालेनाला १९९३ पासून घर देऊन सांभाळणाऱ्या स्टजेपन व्होकिच यांच्याशी क्लेपेटानचे अनोखे नाते; २०२६ मध्ये नव्या जोडीदारासह गावात परतल्याची कहाणी जगभर चर्चेत
झाग्रेब (क्रोएशिया) : Malena and Klepetan Story हजारो किलोमीटरचा प्रवास, ऋतू बदलले तरी कायम राहिलेली ओढ आणि एका जखमी पक्ष्याची आयुष्यभर घेतलेली काळजी… क्रोएशियातील स्टजेपन व्होकिच, मालेना आणि क्लेपेटान यांची कहाणी अनेक वर्षे जगभरातील लोकांना भावूक करत आली. मात्र, या प्रेमकथेचा एक अध्याय संपला असला, तरी तिच्याशी जोडलेला प्रवास आजही सुरू आहे.
१९९३ मध्ये क्रोएशियातील ब्रोडस्की वारोश गावात शाळेचे देखभाल कर्मचारी असलेल्या स्टजेपन व्होकिच यांना शिकाऱ्याच्या गोळीने जखमी झालेली मादी करकोचा आढळली. तिचा पंख कायमचा निकामी झाल्याने ती स्थलांतरासाठी उडू शकत नव्हती. व्होकिच यांनी तिला घरी आणले आणि ‘मालेना’ असे नाव दिले. उन्हाळ्यात घराच्या छतावर घरटे, तर हिवाळ्यात गॅरेजमध्ये उबदार निवारा, अशी तिची व्यवस्था केली. तिचा स्वत:च्या आपत्याप्रमाणे सांभाळ केला. तिची तब्येत हळूहळू सुधारत गेली, पण लांबचा प्रवास करण्याचे बळ तिच्या पंखात नव्हते.
१३ हजार किलोमीटरचा प्रवास करून परतायचा क्लेपेटान
२००२-०३ च्या सुमारास मालेनाच्या आयुष्यात क्लेपेटान आला. दरवर्षी तो आफ्रिकेकडे स्थलांतर करायचा आणि वसंत ऋतूत पुन्हा मालेनाकडे परतायचा. त्याचा हा प्रवास सुमारे १३ हजार किलोमीटरचा होता. या जोडीने मिळून ६६ पिल्लांना जन्म दिला. त्यामुळे त्यांची कहाणी जगभर प्रसिद्ध झाली. त्यावर ‘द ओल्ड मॅन अँड द स्टार्क’ नावाचा चित्रपटही बनवण्यात आला होता.
…जेव्हा लेबनॉनला कायदा बदलावा लागला
२०१७ मध्ये मात्र क्लेपटन परतला नाही. त्यामुळे मालेनाने खूप वाट पाहिल्यांतर खाणपिणेही कमी केले. आपल्या मुलीसमान मालेनाची ही अवस्था पाहून व्होकिच यांचीही अवस्था बिकट झाली. त्यांनी बरीच माहिती घेतल्यानंतर त्यांना कळाले की क्लेपटनचा परतीचा मार्ग लेबनॉनवरून जातो आणि तेथे पक्ष्यांची शिकार मोठ्या प्रमाणात होते. अस्वस्थ होऊन त्यांनी एप्रिल २०१७ मध्ये, लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष मिशेल आऊन यांना एक खुले पत्र लिहिले. या पत्रासोबत त्यांनी क्लेपेटनच्या अंगावरील एक पीसही पाठवले होते.
वोकिच यांनी लेबनॉन सरकारला विनंती केली की, त्यांच्या देशावरून स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांची होणारी मोठ्या प्रमाणावरील हत्या थांबवावी आणि स्थलांतराच्या हंगामात शिकारीवर निर्बंध घालावेत. यामुळे क्लेपेटनसारखे पक्षी सुरक्षितपणे आपला प्रवास पूर्ण करू शकतील. या पत्राकडे आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष वेधले गेले आणि पर्यावरण संवर्धन गटांनीही पाठिंबा दिला. लेबनॉनच्या अधिकाऱ्यांनी शिकारीवर देखरेख ठेवण्याचे आणि बेकायदेशीर गोळीबाराविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पुढे, २०१९ मध्ये सरकारने एक कृती आराखडा तयार केला, ज्या अंतर्गत स्थलांतराच्या मुख्य मार्गांच्या संरक्षणासाठी सैनिक तैनात करण्यात आले.
लेबनॉनने २००४ मध्ये संमत झालेला कायदा क्र. ५८० पुन्हा सक्रिय करून त्याची अंमलबजावणी सुरू केली. या कायद्यामुळे पक्ष्यांच्या शिकारीवर बंदी घालण्यात आली. सप्टेंबर २०१७ मध्ये, लेबनॉनने सुमारे दोन दशकांनंतर पहिल्यांदाच अधिकृत आणि नियंत्रित शिकारीचा हंगाम सुरू केला. यासाठी परवाना आणि चाचणी प्रणाली लागू करण्यात आली. यामध्ये केवळ काही विशिष्ट प्रजातींच्या शिकारीला कायदेशीर परवानगी देण्यात आली, तर सारस, शिकारी पक्षी आणि स्थलांतर करणाऱ्या बहुतेक पक्ष्यांच्या शिकारीवर पूर्णपणे बंदी कायम ठेवण्यात आली. पुढच्या वर्षी मात्र क्लेपटन आश्चर्यकाररीत्या परतला आणि ही प्रेमकहाणी सुरू राहिली.
मालेना गेली; क्लेपेटानला नवी साथ
२९ जून २०२१ रोजी वयाच्या सुमारे २९व्या वर्षी मालेनाचे निधन झाले. तिच्या मृत्यूने व्होकिच यांना मोठा धक्का बसला. मात्र, क्लेपेटानचा परतीचा प्रवास सुरू राहिला. २०२६ मध्ये तो सलग २५व्या वर्षी ब्रोडस्की वारोश येथे परतला. यावेळी त्याच्यासोबत नवी जोडीदार होती. व्होकिच यांनी तिचे नाव ‘स्नायका’ ठेवले असून या जोडीकडून नव्या पिल्लांची अपेक्षा आहे. मालेना आज हयात नाही; मात्र तिची आठवण आणि क्लेपेटानचा प्रवास या गावाच्या स्मृतीत कायम आहे. एका माणसाने जखमी पक्ष्याला दिलेला आधार आणि निसर्गातील नात्यांचा हा विलक्षण प्रवास आजही माणुसकीची जाणीव करून देतो.
Read About : Alexander Litvinenko Murder : पुतिन यांनी पतीची हत्या करवली – मरिना लिटविनेन्को यांचा आरोप
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.