दोन महिन्यांत १० चित्रपट महोत्सवांत निवड
मुंबई (Mumbai) : अभिनेत्री सायानी गुप्ताने (Sayani Gupta) दिग्दर्शकीय पदार्पणातच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे. तिच्या ‘आसमानी’ (Aasmani) या लघुपटाची अवघ्या दोन महिन्यांत अमेरिका, कॅनडा, जपान आणि भारतातील तब्बल १० प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, या लघुपटाने अनेक पुरस्कारही पटकावले आहेत.
वॉशिंग्टन डीसी दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सव, टोकियो आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव, बोस्टनचा भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, शिकागो दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सव आणि अटलांटा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘आसमानी’ची निवड झाली आहे. भारतातील बंगळुरू आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवातही या चित्रपटाचा समावेश झाला.
ह्युस्टन येथील ५९ व्या जागतिक चित्रपट महोत्सवात ‘आसमानी’ला विशेष परीक्षकांचा बाल व कौटुंबिक चित्रपट पुरस्कार मिळाला. ऑस्टिनमधील महोत्सवात प्रेक्षकांच्या पसंतीचा सर्वोत्तम लघुपट पुरस्कारही मिळाला. आजी-नातीच्या हळुवार नात्याभोवती फिरणारी ही कथा प्रेम, विरह आणि मैत्रीचे भावनिक पदर उलगडते. सायानीच्या पहिल्याच दिग्दर्शकीय प्रयत्नाला मिळालेला हा जागतिक प्रतिसाद तिच्या नव्या प्रवासासाठी निश्चितच उल्लेखनीय ठरला आहे.
