Ad Advertisement Ad Advertisement

Tribute to Babasaheb Ambedkar – बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी; राज्य सरकारची मान्यता

उपक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांकडे

मुंबई : Tribute to Babasaheb Ambedkar – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर होणाऱ्या अभिवादन सोहळ्यात आता दरवर्षी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली असून, सामान्य प्रशासन विभागाने 23 नोव्हेंबर 2026 रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांना या सोहळ्याचा अनुभव घेता येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होतात. या वेळी शासकीय मानवंदनेसह हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात यावी, अशी मागणी अनुयायांकडून सातत्याने केली जात होती. महाड येथील चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिनानिमित्त 20 मार्च रोजी होणाऱ्या पुष्पवृष्टीच्या धर्तीवर चैत्यभूमीवरील कार्यक्रमासाठीही परवानगी देण्याचा प्रस्ताव मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठवला होता. त्याला आता मंजुरी मिळाली आहे.

शहर जिल्हाधिकारी घेणार आवश्यक परवानग्या

या उपक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. हेलिकॉप्टर उपलब्ध करून घेणे, विमानचालन संचालनालयाकडून आवश्यक परवानग्या आणि सुरक्षाविषयक मंजुरी मिळवणे तसेच कार्यक्रमावेळी हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असेल.

जिल्हाधिकारी कार्यालय करणार खर्च

हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीसाठी येणारा खर्च मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संबंधित आर्थिक वर्षातील उपलब्ध निधीतून करण्यात येणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे चैत्यभूमीवरील जयंती आणि महापरिनिर्वाण दिनाच्या अभिवादन सोहळ्याला आणखी विशेष स्वरूप प्राप्त होणार आहे.

Read About : Schools Property Tax Refund – शाळांकडून वसूल केलेला कोट्यवधींचा मालमत्ता कर व्याजासह परत करा!

E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.