इचनोस ग्लेनमार्क इनोव्हेशनकडून औषधाच्या मानवी चाचण्यांसाठी IND अर्ज दाखल; नियामक मंजुरी मिळाल्यास २०२७ मध्ये पहिल्या टप्प्यातील चाचण्या सुरू करण्याची योजना.
नवी दिल्ली : ISB 2301 Cancer Drug ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स आणि इचनोस सायन्सेस यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘इचनोस ग्लेनमार्क इनोव्हेशन’ (आयजीआय) या जैवतंत्रज्ञान कंपनीने कर्करोगावरील नव्या औषधाच्या मानवी चाचणीसाठी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाकडे (यूएसएफडीए) अर्ज दाखल केला आहे. ‘आयएसबी २३०१’ असे या प्रयोगात्मक औषधाचे नाव असून, ते शरीरावरील गाठींच्या कर्करोगावर प्रभावी ठरणार आहे.
कंपनीने मंगळवारी उशिरा नियामक मंडळाला दिलेल्या माहितीनुसार, या नव्या औषधासाठी ‘इन्व्हेस्टिगेशनल न्यू ड्रग’ (आयएनडी) अर्ज सादर करण्यात आला आहे. यूएसएफडीएकडून मंजुरी मिळाल्यानंतर २०२७ मध्ये कर्करोगाच्या रुग्णांवर या औषधाची पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणी सुरू करण्याची कंपनीची योजना आहे.
औषधाचे वेगळेपण काय?
- पाच प्रकारची कार्यक्षमता : ‘आयएसबी २३०१’ हे औषध एकाच रेणूमध्ये पाच विविध प्रकारची कार्यक्षमता एकत्रित करते.
- दुहेरी प्रतिकारशक्ती सक्रियकरण: हे औषध कर्करोगाशी संबंधित तीन विशिष्ट घटकांना लक्ष्य करते आणि त्याच वेळी शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीच्या ‘टी-सेल्स’ व नैसर्गिक ‘किलर सेल्स’ या दोन्ही पेशींना कर्करोगाविरुद्ध लढण्यासाठी सक्रिय करते.
- कठीण गाठींवर (सॉलिड ट्यूमर) प्रभावी : कठीण गाठींच्या कर्करोगात पेशींची विविधता आणि रोगप्रतिकारशक्ती दाबून टाकण्याचे गुणधर्म असतात, ज्यावर मात करण्यासाठी या औषधाची विशेष रचना करण्यात आली आहे.
‘आयएसबी २३०१’ साठी आयएनडी अर्ज सादर करणे हा आमच्या कर्करोग संशोधन क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. पूर्व-वैद्यकीय चाचण्यांमध्ये या औषधाचे अतिशय उत्साहवर्धक परिणाम दिसून आले असून, सध्याच्या पारंपरिक उपचार पद्धतींपेक्षा हे औषध अत्यंत वेगळे आणि प्रभावी ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.
— लिडा पाकॉड (अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, आयजीआय)
Read About : Gaganyaan Mission Latest Update : गगनयान मोहिमेला विलंब नाही, इस्रो प्रमुखांचा खुलासा
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.