माणशी पाच किलो गहू-तांदूळ देणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुंबई : Maharashtra Farmers Free Grain Cabinet Decision – राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्हा वगळता उर्वरित ३३ जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या शेतकऱ्यांना मोफत धान्य देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याचा फायदा राज्यातील ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकऱ्यांना मिळणार आहे. हे धान्य पुढील ३ महिन्यांसाठी वितरित करण्यात येईल. तसेच त्यापुढील काळासाठी आढावा घेऊन योजना सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी मंत्रालयात पार पडली. त्यात राज्यात अभूतपूर्व अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने सरकारने हा निर्णय घेतला. सध्या राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत 5 कोटी 79 लाख 34 हजार 702 लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य, तर 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील 21 लाख 60 हजार 682 शेतकऱ्यांना दरमहा 170 रुपये दिले जातात. दोन्ही योजनांचा लाभ न मिळणाऱ्या शेतकरी कुटुंबांचा विचार करून त्यांनाही दर महिन्याला माणशी पाच किलो अन्नधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आधार सीडिंग पूर्ण असणे गरजेचे
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत अन्नधान्याचा लाभ तसेच एपीएल-डीबीटी योजनेचा रोख लाभ मिळत नसलेल्या एकूण 33 जिल्ह्यांतील 42,30,783शेतकऱ्यांना माणसी पाच किलो (3 किलो तांदूळ + 2 किलो गहू) या प्रमाणात ३ महिन्यांकरता मोफत धान्य देण्यात येणार आहे. आधार सीडिंग पूर्ण झालेल्या शिधापत्रिकाधारकांना ई-पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक पडताळणी करून दरमहा हे धान्य वाटप करण्यात येणार आहे. उर्वरित लाभार्थ्यांचे आधार सीडिंग पूर्ण करून घेतल्यानंतरच त्यांना बायोमेट्रिक पडताळणीद्वारे हे धान्य देण्यात येईल.
इतर कॅबिनेट निर्णय
- आर्थिक फसवणुकीतील संस्थांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया जलद होणार. विभागीय स्तरावर एमपीआयडी न्यायाधिकरण, 90 दिवसांत प्रकरण निकाली निघणार.
- नर्मदा खोऱ्यातील 26 हजार 526 हेक्टर क्षेत्राला सिंचन करणाऱ्या नंदूरबारमधील नर्मदा तापी वळण योजनेच्या कामांसाठी 5 हजार 548 कोटी रुपयांच्या तरतुदीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता.
- महसूल विभागांतील अर्धन्यायिक कामकाजाकरता महसूल न्यायालय दावा व्यवस्थापन प्रणाली (रेव्ह्यन्यू कोर्ट केस मॅनेजमेंट सिस्टीम) लागू होणार. अशा प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी एक जिल्हा एक अपील तरतूद लागू होणार. त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी.
- आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्त्यात वाढ. शहरी वर्गवारीनुसार 60 हजार, 51 हजार, 43 हजार आणि 38 हजार भत्ता मिळणार.
- शालार्थ प्रणालीतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण सुविधा उपलब्ध करून देणार.
Read About : SEBI ने BSE 200 आणि Nifty CPSE यांचा महत्त्वपूर्ण निर्देशांकांतील दर्जा कायम ठेवला
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.