निर्णयाची माहिती एसएमएस, व्हॉट्सॲप किंवा ई-मेलद्वारे कळविणार
मुंबई : Caste Validity Certificate – जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी राज्य शासनाने संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. यापुढे जात वैधता प्रमाणपत्रासाठीचे अर्ज केवळ ‘सीसीव्हीआयएस’ (CVCIS) प्रणालीद्वारेच स्वीकारण्यात येणार आहेत. याबाबत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने बुधवारी शासन परिपत्रक जारी केले आहे.
घरबसल्या अर्जापासून प्रमाणपत्रापर्यंत सुविधा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या सहकार्याने विकसित या प्रणालीद्वारे अर्ज सादर करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अर्जाची स्थिती जाणून घेणे आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेणे शक्य होणार आहे. डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणपत्र ई-मेल तसेच व्हॉट्सॲपद्वारे मिळणार असून, शंकांच्या निरसनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित चॅटबॉटची सुविधाही उपलब्ध असेल. ऑनलाइन अपलोड केलेली कागदपत्रे समिती कार्यालयात पुन्हा जमा करण्याची आवश्यकता राहणार नाही.
60 दिवसांत पडताळणी
अर्ज आणि पुराव्यांची ऑनलाइन पडताळणी करून शक्यतो 60 दिवसांत निर्णय घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अर्जदाराला आवश्यकतेनुसार अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याची तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीची संधी दिली जाणार आहे.
शैक्षणिक, निवडणुकांसाठी शुल्क आकारणी
शैक्षणिक प्रयोजनासाठी 100 रुपये, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 500 रुपये, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तसेच सेवाविषयक प्रयोजन व शासकीय योजनांच्या लाभासाठी एक हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
कामकाजात पारदर्शकता
या सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करता येणार असून वेळेची बचत आणि कामकाजात पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. ही प्रणाली https://www.cvc.barti.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.