वेट एज-रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशनवरील उपचारांत मोठी क्रांती; नव्या हायड्रोजेल तंत्रज्ञानामुळे वर्षातून एक-दोन इंजेक्शनमध्ये दृष्टी सुरक्षित ठेवण्याची आशा
वॉशिंग्टन : Hydrogel Eye Treatment वाढत्या वयासोबत दृष्टी कमकुवत होणाऱ्या वेट एज-रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन या डोळ्यांच्या गंभीर आजारावरील उपचारांत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. सध्या या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी रुग्णांना दर महिन्याला किंवा दोन-तीन महिन्यांनी डोळ्यात इंजेक्शन घ्यावे लागते. मात्र, आता भविष्यात हायड्रोजेल आधारित नव्या तंत्रज्ञानामुळे वर्षातून केवळ एकदा किंवा दोनदाच इंजेक्शन घेऊन दृष्टी सुरक्षित ठेवता येऊ शकते. ऑक्युलर थेरप्यूटिक्सच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नादिया वाहिद यांनी या नव्या उपचार पद्धतीची माहिती दिली.
या आजारात डोळ्याच्या मागील भागात अनैसर्गिक रक्तवाहिन्या तयार होऊन त्यातून द्रव किंवा रक्त पाझरते. वेळीच उपचार न केल्यास कायमचे अंधत्व येऊ शकते. सध्याच्या अँटी-व्हीईजीएफ इंजेक्शनमुळे आजार नियंत्रणात राहतो, परंतु साठ वर्षांवरील ज्येष्ठ रुग्णांना दर महिन्याला कुटुंबीयांसह रुग्णालयात जाणे अत्यंत कठीण होते. शिवाय, दोन इंजेक्शनमधील कालावधीत औषधाचा प्रभाव कमी होताच डोळ्यात पुन्हा द्रव साचू लागतो. औषधाच्या प्रमाणातील या सततच्या चढ-उतारामुळे दीर्घकाळात रुग्णांची दृष्टी हळूहळू कमी होत जाते.
डॉ. वाहिद यांच्या मते, सध्या प्रायोगिक अवस्थेत असलेले ओटीएक्स-टीकेआय हे नवे उपचार तंत्रज्ञान या समस्येवर प्रभावी उपाय ठरू शकते. यामध्ये पेशींच्या आतून कार्य करणारे औषध एका सूक्ष्म हायड्रोजेलमध्ये ठेवून ते डोळ्यात सोडले जाते. हे हायड्रोजेल डोळ्यात ६ ते ९ महिने (आणि काही रुग्णांत वर्षभर) समान प्रमाणात हळूहळू औषध सोडत राहते, ज्यामुळे आजार पूर्णपणे नियंत्रणात राहतो. विशेष म्हणजे, कालांतराने हे हायड्रोजेल डोळ्यात पूर्णपणे विरघळून जाते आणि कोणताही अवशेष मागे राहत नाही.
हे तंत्रज्ञान अद्याप एफडीएच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असले, तरी भविष्यात ज्येष्ठ नागरिकांना वारंवार होणाऱ्या इंजेक्शनच्या त्रासातून मुक्त करून त्यांची दृष्टी दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी हे वरदान ठरेल, असा विश्वास डॉ. वाहिद यांनी व्यक्त केला आहे.
Read About : AI Heart Scan : नियमित हार्ट स्कॅनमधून ओळखता येणार सडन कार्डियाक डेथचा धोका; संशोधकांनी विकसित केले नवे एआय तंत्रज्ञान
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.