चीनच्या गॅलियमवरील वर्चस्वाला शह देण्यासाठी अमेरिकेचा मोठा निर्णय; लुईझियानातील ३ कोटी टन रेड मडमधून मौल्यवान धातू काढण्याची योजना
वॉशिंग्टन : US Gallium Extraction Project आधुनिक लढाऊ विमाने, रडार, क्षेपणास्त्र प्रणाली आणि सेमीकंडक्टर चिप्स तयार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गॅलियम या दुर्मीळ धातूच्या पुरवठ्यासाठी अमेरिकन संरक्षण विभाग म्हणजेच पेंटागॉनने आता औद्योगिक कचऱ्यातून खजिना शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. जागतिक गॅलियम पुरवठ्यावर चीनचे ९८ टक्क्यांहून अधिक वर्चस्व असून, चीनने याच्या निर्यातीवर कडक निर्बंध लादल्याने अमेरिकेची कोंडी झाली आहे. या संकटावर मात करण्यासाठी अमेरिकेतील लुईिझयाना येथील एका ॲल्युमिनियम रिफायनरीबाहेर साचलेल्या ३ कोटी टन लाल चिखलाच्या ढिगाऱ्यातून गॅलियम काढण्याचा निर्णय पेंटागॉनने घेतला आहे.
बॉक्साइटपासून ॲल्युमिनियम तयार करताना मोठ्या प्रमाणात रेड मड नावाचा रासायनिक गाळ (कचरा) तयार होतो. लुईिझयाना राज्यातील ग्रामर्सी येथे असलेल्या अमेरिकेतील एकमेव कार्यरत अटलांटिक ॲल्युमिना प्रकल्पाबाहेर अशा लाल चिखलाचे महाकाय डोंगर साचले आहेत. लुईिझयाना स्टेट युनिव्हर्सिटीचे संशोधक अमिताभ रॉय यांच्या संशोधनानुसार, या टाकाऊ चिखलात गॅलियम आणि लढाऊ विमानांसाठी लागणारे स्कँडियम हे मौल्यवान धातू आहेत.
अमेरिकेला दरवर्षी २२ टन गॅलियमची गरज असते. या टाकाऊ गाळातील केवळ १ टक्का गॅलियम जरी बाहेर काढले, तरी अमेरिकेची संपूर्ण वार्षिक गरज भागू शकते. यासाठी पेंटागॉनने एलिमेंट यूएसए कंपनीला प्रायोगिक प्रकल्पासाठी ३ कोटी डॉलर्सचे अनुदान दिले असून, कंपनी तिथे ८५ कोटी डॉलर्सचा भव्य प्रकल्प उभारणार आहे. तसेच, रिफायनरीतून चिखल बाहेर पडण्यापूर्वीच द्रवातून गॅलियम वेगळे करण्यासाठी पेंटागॉनने रिफायनरीला ४० कोटी डॉलर्सची मदत दिली असून, त्यातून वर्षाला ५० टन गॅलियम उत्पादन अपेक्षित आहे.
Read About : SEBI ने BSE 200 आणि Nifty CPSE यांचा महत्त्वपूर्ण निर्देशांकांतील दर्जा कायम ठेवला
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.