तांब्याच्या तारांऐवजी प्रकाश लहरींचा वापर; डेटा ट्रान्सफरचा वेग वाढवून विजेचा वापर ३.५ ते ५ पटींनी कमी करण्याचे एनव्हीडियाचे लक्ष्य
वॉशिंग्टन : NVIDIA Silicon Photonics जगातील सुमारे ८५ टक्के एआय चिप्सची निर्मिती करणारी आघाडीची कंपनी एनव्हीडिया आता डेटा सेंटर्समधील हजारो चिप्स एकमेकांशी जोडण्यासाठी तांब्याच्या तारांऐवजी प्रकाशाचा म्हणजेच सिलिकॉन फोटोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. एआयचा वेग आणि क्षमता वाढवण्यासाठी गणिते सोडवण्यापेक्षा चिप्समध्ये डेटाची देवाणघेवाण करणे हे मोठे आव्हान बनले आहे. या समस्येवर मात करण्यासाठी एनव्हीडियाने आपल्या नव्या नेटवर्किंग स्विचेसमध्ये प्रकाश लहरींचा वापर सुरू केला आहे.
गेमिंगसाठी साधारणपणे एकच जीपीयू चिप पुरेशी असते, परंतु आधुनिक एआय मॉडेल्स चालवण्यासाठी हजारो चिप्सना एकत्र येऊन एका महाकाय संगणकासारखे काम करावे लागते. पारंपरिक तांब्याच्या तारांमधून विद्युत संकेतांद्वारे प्रचंड डेटा पाठवताना मोठ्या प्रमाणात वीज खर्च होते, उष्णता निर्माण होते आणि डेटाचा वेग मंदावतो. याला तंत्रज्ञानाच्या भाषेत कॉपर वॉल म्हणतात.
यावर उपाय म्हणून एनव्हीडियाने को-पॅकेज्ड ऑप्टिक्स तंत्रज्ञानावर आधारित क्वांटम-एक्स आणि स्पेक्ट्रम-एक्स हे नवे स्विचेस सादर केले आहेत. यामध्ये ऑप्टिकल इंजिन थेट चिपच्या पॅकेजमध्येच बसवलेले असते. हे तंत्रज्ञान चिपमधील विद्युत संकेतांचे रूपांतर सेकंदाला कोट्यवधी वेळा प्रकाश लहरींमध्ये करते आणि दुसऱ्या टोकाला पुन्हा विद्युत संकेतांत रूपांतरित करते. यामुळे डेटा ट्रान्सफरचा वेग प्रचंड वाढतो आणि विजेचा वापर ३.५ ते ५ पटींनी कमी होतो.
सध्या ब्रॉडकॉम, एएमडी आणि इंटेल यांसारख्या स्पर्धक कंपन्याही या शर्यतीत आहेत. मात्र, एनव्हीडियाने आघाडी घेत कोहेरंट, ल्युमेंटम आणि कॉर्निंग यांसारख्या लेझर व ऑप्टिकल कंपन्यांमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करून संपूर्ण पुरवठा साखळीवर आपली पकड मजबूत केली आहे.
Read About : ISB 2301 Cancer Drug : कठीण गाठींच्या कर्करोगासाठी ग्लेनमार्कचे नवे औषध
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.