Ad Advertisement Ad Advertisement

Senior Citizen Care in India : संध्याछाया भिवविती हृदया…

Senior Citizen Care in India : कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजेच एआय आणि इंटरनेटयुक्त सोशल मीडियाच्या जगात आज प्रत्येक गोष्ट गतिमान झाली आहे. एकीकडे देशातील गरिबी मोठ्या प्रमाणात कमी होत चालली आहे. पण, त्याचबरोबर बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत विशेषत: ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न फारच बिकट झाले आहेत. विभक्त कुटुंब पद्धती, वाढती महागाई आणि भेसळयुक्त पदार्थ व प्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. नोकरी किंवा शिक्षणासाठी मुले परगावी किंवा परदेशात स्थायिक होत असल्याने अनेक वृद्ध जोडपी किंवा एकटे ज्येष्ठ नागरिक घरात एकाकी जीवन जगत आहेत. सर्वच ज्येष्ठांना काही सर्व सोयी सुविधायुक्त वृद्धाश्रमात राहणे परवडत नाही. निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचे साधन नसतं आणि वाढत्या महागाईमुळे दैनंदिन खर्च व औषधोपचार परवडणं फार कठीण होत जातं. जसजसं वय वाढतं, तसतसे आजार उद्भवतात आणि खासगी रुग्णालयातील उपचारांचा अवाढव्य खर्च हे तर ज्येष्ठांसाठी मोठंच संकट ठरू पाहत आहे. त्यात बँकिंग, बिलं भरणं आणि इतर सरकारी कामं ऑनलाईन झाल्यामुळे, जेष्ठांपुढे अनेक अडचणी येतात. तसंच ऑनलाईन फसवणुकीचे ते सहज बळी ठरत असतात.

एकट्या दुकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांवर होणारे हल्ले आणि मालमत्तेच्या वादातून कुटुंबाकडून होणारी हेळसांड ही चिंतेची बाब बनली आहे. सार्वजनिक वाहतूक, रस्ते आणि इमारतींमध्ये ज्येष्ठांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांची, म्हणजेच रॅम्प, लिफ्ट, बसण्यासाठीची जागा यांची कमतरता जाणवते. अगदी पुण्या-मुंबईचा विचार केला तरी उद्यानांची संख्या किंवा फिरण्याच्या जागा पुरेशा नाहीत. शिवाय वाहतुकीच्या गर्दीमुळे आणि पदपथांवरील आक्रमणामुळे त्यांना चालणंही मुश्कील होतं. एवढंच काय, रस्ता क्रॉस करणंदेखील अवघड जातं. खरं तर ठिकठिकाणी पदापथावर बसण्यासाठी बाकं असणं आवश्यक आहे. परंतु, ते बाकही अनेक ठिकाणी नसतात किंवा त्यावर भिकारी किंवा ड्रग्स घेणारे झोपलेले आढळतात. अगदी बसच्या थांब्यांवरही या मंडळींचा वावर आढळतो. एकीकडे श्रावणबाळ योजना, वयोश्री योजना, ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन इत्यादी उपलब्ध आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे, अशांना सुसज्जता व सेवा पुरवणारे निवारे आज उपलब्ध आहेत. बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्यांना समस्या जास्त भेडसावतात.

एका आकडेवारीनुसार, केरळमध्ये आज लोकसंख्येचाा ढाचा असा तयार झाला आहे की साठ वर्षांवरील लोकांची संख्या २०११ मध्ये १२.६% होती ती आता १८.७ टक्क्यांवर गेली आहे. आज केरळमध्ये जे चित्र आहे, तेच संपूर्ण देशात घडत आहे किंवा घडू पाहत आहे. २०२६-२७ मध्ये केरळ सरकारचे ज्येष्ठ नागरिकांसाठीचं बजेट २२.८% आहे. परंतु, २०३६ पर्यंत तेथील ज्येष्ठांची लोकसंख्या ४२ लाखांवरून ८४ लाखांवर जाऊन पोहोचणार आहे, त्यामुळे हे बजेटदेखील वाढवावं लागणार आहे. केरळ सरकारने २६ ऑक्टोबरला विधानसभेत ‘केरळ सीनियर सिटीजन केअर अँड प्रोटेक्शन ऑफ राइट्स बिल’ मंजूर केलं. ज्येष्ठ नागरिकांसाठीची देखभाल केंद्रं किंवा केअर सेंटर, होम केअर एजन्सीज यांच्यासाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचे अधिकार सरकारकडे घेण्यात आले आहेत. या संस्थांसाठी व्यवस्थापनाची मानकं या कायद्यानुसार निश्चित केली जातील. तसंच ज्येष्ठांना सामाजिक सुरक्षितता देण्याची व्यवस्था मजबूत केली जाईल. केरळमधले मोठ्या प्रमाणातील लोक आखाती देशांत वा अन्य देशांमधून नोकरीधंद्यासाठी जात असतात. अर्थव्यवस्थेतील महिलांचा सहभाग वाढल्यामुळे, घरात काळजी घेणारं कोणीच नाही अशी स्थिती असते. वृद्धांची काळजी घेण्यासाठी परिचारिका पुरवणाऱ्या एजन्सी आहेत. परंतु, कनिष्ठ मध्यमवर्गीय व गरिबांना दर महिन्याला यासाठी लागणारा खर्च परवडत नाही.

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाने याबाबत एक अभ्यास अहवाल तयार केला आहे. भारतात देखभाल व शुश्रूषा हे काम आजही बहुतेक करून खासगी स्तरावर चालतं आणि घरातील महिलाच ही जबाबदारी उचलताना दिसतात. व्यावसायिक शुश्रूषा केंद्रांतही बहुतेक महिलाच हे काम करतात. तरीदेखील केरळमध्ये पुरुष परिचारिकांचं प्रमाण गेल्या १५ वर्षांत ११ वरून २१ टक्क्यांवर गेलं आहे. अर्थात, महिला हे काम अधिक प्रेमाने व आस्थेने करू शकतात ही सिद्ध झालेली बाब आहे. केरळमधील कोची इथल्या अर्धवेळ अटेंडंटला ८ ते १५ हजार रुपयांपर्यंत पैसे द्यावे लागतात. ज्येष्ठ आजारी व्यक्तीसोबतच राहून शुश्रूषा करणाऱ्याला ४० ते ६५ हजार रुपयेसुद्धा मिळू शकतात. एवढे पैसे देणं किती लोकांना जमणार आहे? ज्यांना हे जमत नाही, अशा कुटुंबातील व्यक्ती स्वत:च ही जबाबदारी उचलते, त्यामुळे अशा व्यक्तीला मग बाहेर नोकरी करणं शक्य होत नाही. केरळमध्ये हे जे नवीन विधेयक तयार करण्यात आलं आहे, त्यात परवडणाऱ्या दरात होम केअर, डे केअर उपलब्ध करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. दीर्घकालीन केअर इन्शुरन्सला प्रोत्साहन देण्याचीही तरतूद त्यात आहे. या विधेयकाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लक्षणीय स्वरूपात सार्वजनिक गुंतवणूक आणि प्रशिक्षित मनुष्यबळही लागेल.

केवळ केरळचाच विचार करून चालणार नाही. भारतात सर्वत्रच ज्येष्ठ नागरिकांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. मुंबईसारख्या महानगरात लोक दाटीवाटीने राहतात. संध्याकाळी बाहेर जायचं म्हटलं, तरी कधी कोणत्या वाहनाचा धक्का लागेल याची खात्री नसते. रेल्वे अथवा बसने जाताना गर्दी असते. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र जागा राखीव असली, तरी तिथेही गर्दी असतेच. घराजवळ बागा वा मैदानं नसतात. मोकळ्या हवेची वानवा असते. प्रत्येकजण घाईगडबडीत असल्यामुळे म्हाताऱ्या माणसांशी बोलायला कुणाला वेळ नसतो. इष्टमित्र अनेकदा दूरदूर राहणारे असल्याकारणाने मनातलं सांगायचं कोणाजवळ? संवाद कोणाशी व कसा साधायचा? असे प्रश्न असतात. डिमेन्शिया व अल्झायमरच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ‘नटसम्राट’ नाटकात किंवा राजा परांजपेंच्या ‘ऊनपाऊस’सारख्या चित्रपटात वयस्कर व्यक्तींचा हा एकटेपणा आपल्याला पाहायला मिळतो. हा एकटेपणा खायला उठतो. प्रत्येक तरुण व्यक्तीला कधी ना कधी तरी वार्धक्य येणारच. आज भारत हा तरुणांचा देश असला, तरी काही काळाने ही परिस्थिती बदलणार आहे. त्यावेळी देशात ज्येष्ठांची संख्या अधिक असणार आहे. तेव्हा त्यांची काळजी कशी घ्यायची, असा विचार करून डोक्यावरचे केस पांढरे होण्याची वेळ येईल. त्यापूर्वीच केंद्र व राज्य सरकारने या प्रश्नाचा गंभीर विचार केला पाहिजे.

नंदिनी आत्मसिद्ध
nandini.atma@gmail.com

Read About : Fake Gold Hallmark Scam : चकाकते, ते सारे सोने नव्हे!
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.