मणिपूरमध्ये २५ दिवसांचा मुक्काम करून अपापांग आणि अलंग यांचा आफ्रिकेकडे प्रवास सुरू; अरबी समुद्रावरील हजारो किलोमीटरच्या उड्डाणाचा शास्त्रज्ञांकडून उपग्रहाद्वारे मागोवा
नवी दिल्ली : Amur Falcon Migration आकाराने लहान, वजन अवघे १५० ग्रॅम; पण प्रवासाचा आवाका हजारो किलोमीटर! अमूर ससाणे या स्थलांतरित पक्ष्यांनी भारतातून आफ्रिकेच्या दिशेने पुन्हा झेप घेतली आहे. उपग्रह यंत्रणा बसवलेल्या अपापांग आणि अलंग या दोन पक्ष्यांसमोर आता अरबी समुद्रावरून सुमारे तीन हजार किलोमीटरचे विनाथांबा उड्डाण करण्याचे आव्हान आहे. या प्रवासात त्यांना विश्रांतीसाठी कुठेही थांबता येणार नाही.
मणिपूरच्या तामेंगलाँग जिल्ह्यातील चिऊलुआन परिसरात हे पक्षी जवळपास २५ दिवस थांबले होते. या काळात त्यांनी वाळवी आणि अन्य कीटक खाऊन पुढील प्रवासासाठी शरीरात चरबीचा साठा तयार केला. आता दोघांनी आफ्रिकेच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले आहे. उपग्रह नोंदीनुसार, अपापांग हा नर पक्षी गोव्याजवळील पश्चिम किनारपट्टीपर्यंत पोहोचला आहे, तर अलंग ही तरुण मादी अरबी समुद्रात बरीच पुढे गेली आहे. त्यांचे अंतिम लक्ष्य सोमालियाचा किनारा आहे.
सहा दिवसांत हजारो किलोमीटरचा प्रवास
अमूर ससाणे पूर्व रशिया, ईशान्य चीन आणि मंगोलियात प्रजनन करतात. हिवाळ्यात ते दक्षिण आफ्रिकेकडे स्थलांतर करतात. मागील प्रवासात अपापांगने सहा दिवस आठ तासांत सुमारे ६,१०० किलोमीटर पार करून टांझानिया गाठले होते. अलंगने सहा दिवस १४ तासांत ५,६०० किलोमीटरचा प्रवास केला, तर अहू या ससाण्याने पाच दिवसांत जवळपास ५,१०० किलोमीटर अंतर कापले होते.
उपग्रह तंत्रज्ञानातून पक्ष्यांच्या प्रवासाचा मागोवा
वन्यजीव संस्थेच्या (डब्ल्यूआयआय) शास्त्रज्ञांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये अपापांग, अलंग आणि अहू या तीन पक्ष्यांना उपग्रह ट्रान्समीटर बसवले होते. त्यांच्या स्थलांतराचे मार्ग, विश्रांतीची ठिकाणे आणि उड्डाणाचा कालावधी अभ्यासणे हा त्यामागील उद्देश आहे.
ईशान्य भारतातील पारंपरिक मुक्कामस्थळांचे संरक्षण या पक्ष्यांसाठी महत्त्वाचे आहे. स्थानिक समुदायांच्या संवर्धन प्रयत्नांमुळे या स्थलांतरित पाहुण्यांना सुरक्षित अधिवास मिळत आहे. आता अरबी समुद्रावरील त्यांची झेप संशोधकांसाठी विशेष लक्षवेधी ठरली आहे.
Read About : Jayakwadi Bird Sanctuary Boundary Issue -तब्बल 38 वर्षांनी जायकवाडी अभयारण्याच्या सीमांकनाचा मुद्दा ऐरणीवर
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.