वन्यजीव विभागाची उदासिनता, जलसंपदा विभागाचा निष्काळजीपणा : शासनाकडून अवहेलना, लाभ वाटप न झाल्याने रखडली अंतिम अधिसूचना, कारवायांना ब्रेक
छत्रपती संभाजीनगर Jayakwadi Bird Sanctuary Boundary Demarcation : देशातील महत्वाचे पाणथळ आणि देश-विदेशातील पक्ष्यांचे हक्काचे अधिवास क्षेत्र असलेल्या जायकवाडी पक्षी अभयारण्यात वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ लागू असूनही त्याची पूर्णत: अंमलबजावणी होत नाही. तथापि, अभयारण्याचे तब्बल ३८ वर्षांनी देखील न झालेले सीमांकन, अंतिम न झालेले भागधारकांचे लाभ वाटप आणि यामुळे रखडलेली अंतिम अधिसूचना यामुळे येथे कारवाया करताना हात आखडता घ्यावा लागत असल्याचा कांगावा वन्यजीव विभागाने केला आहे. वन प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने यास दुजोरा दिला आहे.
जायकवाडी पक्षी अभयारण्य पैठण, गंगापूर, शेवगाव आणि नेवासा तालुक्यापर्यंत परसलेले आहे. अभयारण्य परिसरात २९ बेटे असून ती पक्ष्यांची प्रजनन केंद्रे आहेत. जवळपास २५० पेक्षा अधिक प्रजातींचे पक्षी येथे आढळतात. तिबेट, मध्य आशिया, मंगोलिया, सैबेरिया, दक्षिण रशिया, पूर्व युरोप, उत्तर आफ्रिका, दक्षिण-पूर्व आशिया या ठिकाणांहून येथे पक्षी येतात. १० ऑक्टोबर १९८६ मध्ये राज्य शासनाने प्रकल्पाच्या ३४१.०५ चौ.किमी. क्षेत्रफळाच्या बुडीत क्षेत्राला अभयारण्य म्हणून अधिसूचीत केले आहे. २०१७ मध्ये इको सेन्सेटिव्ह झोनची घोषणा करण्यात आली. वेटलॅण्ड्स ऑफ इंटरनॅशनल सिग्निफिकन्स तसेच देशातील महत्वाचे जलाशय म्हणून जायकवाडीचा समावेश झाला आहे.
अभयारण्याचा परिघ, बाहेरील सीमा ४५० किमी. इतकी आहे. तर परिसर व्यापाती ३३९७९ हेक्टरमध्ये आहे. एकूण ११८ गावे या अभयारण्य परिसरात आहेत. पैकी ५९ गावे ही अहिल्यानगर तर ५९ गावे ही संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत. असे असतानाही केवळ ११ कर्मचारी अभयारण्याच्या देखरेखीसाठी नियुक्त आहेत. दरम्यान ३८ वर्षांपूर्वी अभयारण्य घोषित झालेले आहे त्यांनतर जलसंपदा व वन्यजीव विभागाने संयुक्त सर्व्हे करून अभयारण्याची हद्द निश्चित करणे (सीमांकन) अभयारण्याचे प्रभावी संरक्षण व व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक होते.
परंतु अजूनही याबाबत दोन्ही विभागात समन्वयाचा अभाव व उदासीनता दिसून येते. तथापि, कारवायांना अडथळा ठरणाऱ्या कारणांत आता सीमांकनाचा विषय ऐरणीवर आणला जात आहे. एकंदर वन्यजीव प्रशासनाचे दुर्लक्ष, जलसंपदा विभागाची उदासिनता, शासनाकडून होणारी अवहेलना, रखडलेले लाभ वाटप आणि अंतिम अधिसूचना नसणे यामुळे जायकवाडीत वन्यजीव कायदा पायदळी तुटवला जात आहे.
कारवाईसाठी हात थरथरतात…
आजरोजी अभयारण्य परिसरात वन्यजीव संरक्षण कायद्याला ठेच पोहोचविणाऱ्या कृती घडत आहेत. मात्र कारवाई करताना वन्यजीव विभागाचे हात थरथरतात. भागधारकांचे शासनाकडून न झालेले लाभवाटप आणि अभयारण्याच्या सीमांकनाबाबत संभ्रम ही कारणे अधिकाऱ्यांकडून पुढे केली जात आहेत. शिवाय कारवायांची जबाबदारी जलसंपदा विभागाकडेही ढकलली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जलसंपदा विभागाला वन्यजीव विभागाने वारंवार सांगूनही त्यांनी आजवर सीमांकन (सीमा/हद्द) करून दिलेले नाही. परिणामी वन्यजीव प्रशासनास अडचणींचा सामना करावा लागत आहे.
राजकीय नेत्यांचे प्रेशर
जायकवाडीत कायद्याचा भंग करणाऱ्यांवर कारवाई न करण्यासाठी राजकीय नेत्यांचे मोठे प्रेशर आमच्यावर आहे. यामुळे डोळेझाक करावी लागते अशी माहिती एका वन अधिकाऱ्याने दिली.
‘अभयारण्याचा दर्जा’ हेच मोठे शस्त्र
जायकवाडीला अभयारण्याचा दर्जा मिळालेला असून येथे वन्यजीव सुरक्षा कायदा लागू आहे. हेच या अभयारण्याचे व्यवस्थापन करणाऱ्या वन्यजीव प्रशासनासाठी मोठे शस्त्र आहे. अंतिम अधिसूचना नसणे, सीमांकनाबाबत (हद्द) असलेला संभ्रम आणि अंतिम न झालेले भागधारकांचे लाभ वाटप ही कारवाई करण्यास अडचणीची कारणे ठरूच शकत नाहीत.
– डॉ. रितेश कुमार, संचालक, वेटलॅण्ड इंटरनॅशल, दक्षिण आशिया
भारतीय वन्यजीव संस्थानच्या जायकवाडीबाबतच्या नोंदी आणि सूचना
- हक्क निश्चितीची प्रक्रिया प्रदीर्घ असल्याने, या संरक्षित क्षेत्रावर आसपासच्या समुदायांकडून संसाधनांच्या वापराचा मोठा दबाव कायम आहे. २,००० हून अधिक व्यक्ती बेकायदेशीर पणे मासेमारी करत असल्याचे दिसून येते.
- येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येच्या तुलनेत उपलब्ध सुविधा अपुऱ्या आहेत. कर्मचारी आणि निधीची तीव्र कमतरता असल्याने व्यवस्थापनाची उद्दिष्टे पूर्ण करण्यात अडचणी येतात.
- विविध भागधारकांच्या भिन्न गरजांमुळे या संरक्षित क्षेत्रात प्रशासन आणि स्थानिक लोक यांच्यात संघर्षाची परिस्थिती निर्माण होते. एका व्यवस्थापन आराखड्याची तयारी समाविष्ट आहे, ज्यामध्ये सर्व सरकारी आणि अशासकीय भागधारकांचा सहभाग असेल.
- याद्वारे जलक्षेत्राचे योग्य प्रादेशिक वाटप सुनिश्चित केले जाईल, ज्यामुळे स्थानिक उपजीविकेला आधार मिळेल आणि त्याच वेळी पक्षी व जलचर वन्यजीवांचे संरक्षणही होईल.
- योग्य ठिकाणांपैकी सुमारे १०% भाग ‘संरक्षण क्षेत्र’ म्हणून घोषित करावा. संरक्षण पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे, पक्षी निरीक्षणाशी संबंधित सुविधा व कार्यक्रम विकसित करणे, तसेच जैवविविधतेची नोंद तयार करण्यासाठी आणि जलगुणवत्तेसह पक्ष्यांच्या संख्येवर देखरेख ठेवण्यासाठी स्थानिक व राष्ट्रीय संस्थांना सहभागी करून घेणे आवश्यक आहे.
- हिवाळ्याच्या काळात बेटांच्या संरक्षणासाठी उपाययोजना राबवल्या पाहिजेत; प्रभावी व्यवस्थापनासाठी निधीची उपलब्धता वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जायकवाडीच्या आरोग्य’पत्रिके’त उदासीनतेचा ‘राहू-केतू’
देश-विदेशातील पक्ष्यांचे महत्त्वाचे आश्रय म्हणजे मराठवाड्यातील जायकवाडीचे (जि. छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर) पाणथळ क्षेत्र होय. तथापि, देशभरातील ६७२ पाणथळांची आरोग्य पत्रिका (हेल्थ कार्ड) केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेली आहे. मात्र जायकवाडीच्या पाणथळ क्षेत्राची आरोग्य पत्रिका अद्याप तयारच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. देशभरातील ६७२ पाणथळांची आरोग्य पत्रिका केंद्रीय वन मंत्रालयाकडून तयार करण्यात आलेली आहे.
यात महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील आडाण जलाशय (वाशिम), अंबा खाडी (रायगड), धामापूर तलाव (सिंधुदुर्ग), कन्नमवार जलाशय (गडचिरोली), लोणार तलाव (बुलढाणा), माकानी जलाशय (धाराशिव), मांजरा जालाशय (धाराशिव), नांदूर मधमेश्वर (नाशिक), पवई तलाव (मुंबई), रंकाळा तलाव (कोल्हापूर), सोनाळा धरण (वाशिम), ठाणे क्रीक (मुंबई), उजनी जलाशय (सोलापूर), वसई क्रीक (ठाणे), वेंगुर्ला बीच (सिंधुदुर्ग), विहार सरोवर (मुंबई), मोयने नदी परिसर (नंदुरबार) या १८ पाणथळांचा समावेश करण्यात आलेला आहे. मात्र जायकवाडीला यात अद्याप स्थान मिळालेले नाही.
या आरोग्य पत्रिकेत संबंधित पाणथळाचे क्षेत्रफळ, प्रकार, जैवविविधता आदी महत्त्वाची माहिती नोंदविली जाते. जायकवाडी पाणथळ परिसरात ग्रेटर फ्लेमिंगो, ब्लॅक हेडेड (व्हाईट) आयबीस, ब्लॅक टेल गॉडवीट, युरेशीयन कर्ल्यू, लीटल स्टींट, ब्लॅक बील्ड टर्न, युरोपियन रोलर या महत्त्वाच्या पक्षी प्रजाती आढळून येतात. असे वैभव प्राप्त जायकवाडीच्या पाणथळाची आरोग्य पत्रिकाच अद्याप तयार नसल्याची माहिती हाती लागली आहे. पाणथळांची तयार झालेल्या आरोग्य पत्रिकेची संबंधित राज्य पाणथळ प्राधिकरणकडून केली जाते. राज्यातील या १९ सदस्यीय समितीची ऑक्टोबर २०२३ मध्ये नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली असून पर्यावरण मंत्री समितीचे अध्यक्ष तर याच विभागाचे प्रधान सचिव उपाध्यक्ष आहेत. राज्यातील एक लाख ५२ हजार ९०० हेक्टर पाणथळाची आरोग्य पत्रिका तयार झालेली आहे.
छत्रपती संभाजीनगरात सर्वाधिक पाणथळे
इराणमधील रामसर शहरात १९७१ मध्ये जगभरातील पाणथळ भूभागांच्या संरक्षणासाठी करायच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत झालेल्या ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते. १९७५ पासून हा ठराव अमलात आला. भारतानेही हा करार मान्य केलेला आहे. रामसर असा आंतरराष्ट्रीय करार आहे ज्याद्वारे पाणथळ क्षेत्रांचे संवर्धनासह शाश्वत उपयोग तसेच आर्थिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक मूल्य जपण्यास मदत होते. मराठवाड्यातील सर्वाधिक पाणथळ क्षेत्रांची संख्या छत्रपती संभाजीनगर (१,६६८) जिल्ह्यात आहेत. यानंतर उस्मानाबाद (१,६६२), तर बीड (१,६५३) तिसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक कमी पाणथळ परभणी (२७६) जिल्ह्यात आहेत.
Read About : Cambridge Word of the Year 2026 : ‘Human’ ठरला वर्षातील शब्द; AI च्या वाढत्या प्रभावाची चिंता
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.