पॅकेटच्या दर्शनी भागावर प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र षटकोनी चेतावणी चिन्ह लावण्याचे निर्देश; लेबलचा आकार ४ ते ५ टक्के ठेवण्याची सूचना
नवी दिल्ली : Packaged Food Warning Labels पॅकेज्ड खाद्यपदार्थांवर हाय फॅट, हाय शुगर आणि हाय सॉल्ट (अधिक मीठ) असे स्पष्ट चेतावणी देणारे लेबल पॅकेटच्या दर्शनी भागावर लावणे अनिवार्य करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाला दिले आहेत. न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने ग्राहकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे की, अधिक फॅट, साखर आणि मीठ असलेल्या खाद्यपदार्थांसाठी प्रत्येक घटकाचे स्वतंत्र षटकोनी चेतावणी चिन्ह असले पाहिजे. अनेक पोषक घटकांसाठी एकच संयुक्त चिन्ह वापरण्याऐवजी प्रत्येक घटकासाठी वेगळे षटकोनी लेबल असावे. या प्रत्येक षटकोनी चिन्हामध्ये संबंधित पोषक घटकाचे मानक चित्र आणि त्यासोबत हाय फॅट, हाय शुगर किंवा हाय सॉल्ट असे शब्द ठळकपणे लिहिलेले असावेत. तसेच, पॅकेजच्या मुख्य दर्शनी भागाच्या आकाराच्या प्रमाणात प्रत्येक षटकोनी चिन्हाचा आकार ४ ते ५ टक्के इतका असावा, जेणेकरून ते ग्राहकांना सहज दिसेल.
पोषक घटकांची कमाल मर्यादा निश्चित करताना न्यायालयाने FSSAI ला महत्त्वाची सूचना केली आहे. ही मर्यादा ठरवताना केवळ बाहेरून मिसळलेली साखर किंवा फॅट विचारात न घेता, त्या खाद्यपदार्थातील एकूण साखर आणि सॅच्युरेटेड फॅट यांना आधार मानले जावे. या संदर्भात शास्त्रीय पुराव्यांच्या आधारे प्रत्येक पोषक घटकाची पातळी पुन्हा एकदा निश्चित करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
न्यायालयाने नमूद केले की, ही मर्यादा ठरवताना संतुलन राखणे अत्यंत गरजेचे आहे. जर चेतावणी लेबलची मर्यादा खूपच कमी ठेवली, तर जवळपास सर्वच पॅकेज्ड खाद्यपदार्थांवर चेतावणी लेबल लावावे लागेल. यामुळे ग्राहकांमध्ये या लेबलबद्दलची गंभीरता कमी होईल आणि ते त्याकडे दुर्लक्ष करतील. याउलट, जर ही मर्यादा खूप जास्त ठेवली, तर बहुतांश उत्पादने चेतावणीच्या कक्षेतून बाहेर राहतील आणि ग्राहक अनवधानाने साखर, मीठ व फॅटचे धोकादायक प्रमाणात सेवन करत राहतील.
यासोबतच, प्रत्येक षटकोनी चिन्हाच्या आत लिहिलेल्या अक्षरांचा आकार इतका स्पष्ट असावा की, सामान्य खरेदी आणि वापराच्या वेळी संबंधित चित्रासह तो मजकूर सहज वाचता येईल. केंद्र सरकारने अन्न सुरक्षा आणि मानक (लेबलिंग आणि प्रदर्शन) नियमन, २०२० सह इतर विद्यमान नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असेही न्यायालयाने सांगितले आहे.
Read About : Journalists vs Reel Makers : रील बनवणारे पत्रकार नाहीत? दिल्ली पोलिसांचं सुप्रीम कोर्टात मोठं विधान
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.